तीन महिन्यांनी कोरोना प्रयोगशाळेला मुहूर्त

03 Jun 2020 17:29:18
Uddhav Thackeray _1 





रत्नागिरीत सुरू होणार कोरोना चाचणी, मुख्यमंत्र्यांतर्फे उद्घाटन



रत्नागिरी : कोरोनाच्या संकटात वाऱ्यावर सोडलेल्या चाकरमानी आणि कोकणवासीयांचे म्हणणे शासन दरबारी अखेर पोहोचले आहे. रत्नागिरीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना विषाणू प्रयोगशाळेचे ऑनलाईन उद्घाटन रविवार दि. ७ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते केले जाणार आहे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. 


कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कोकणात तपासणीनंतर स्वॅबचे नमुने मिरज आणि कोल्हापूरमध्ये पाठविण्यात येत आहेत. परिणामी कोरोना रुग्णाचा अहवाल येण्यास उशीर होत होता. राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपल्या कोकण दौऱ्यात हा प्रश्न उपस्थित केला होता. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचीही गैरसोय होत होती. रुग्णाला वेळीच उपचार न मिळाल्याने तो दगावण्याची भीतीही होती. कोरोना चाचणी आणि तिचा अहवाल मिळण्याचा वेळ यांच्यातील अंतर कमी व्हावे यासाठी रत्नागिरीत स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात यावी, अशी मागणी कित्येक दिवस केली जात होती. 


अखेर प्रशासन व सरकारला जाग आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रयोगशाळेसाठी मंजुरी दिली. या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी १ कोटी ७ लाख रुपये खर्च आलेला आहे व याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि प्रधान सचिव प्रदीप व्यास हे उपस्थित राहणार असून रत्नागिरीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत उपस्थित असतील.




Powered By Sangraha 9.0