राष्ट्रवादी काँग्रेसची शिवी संस्कृती

    दिनांक  29-Jun-2020 23:05:09
|
agralekh_1  H x

तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी एका प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांना ‘उखाड फेकेंगे’ असे म्हटले होते. पवारांनी मात्र त्याला उत्तर देताना हिंदीतील ‘उखाड फेकेंगे’चे मराठीत भाषांतर केले आणि “कोणाला काय उखडायचे ते उखडा,” असे अत्यंत सभ्य भाषेत सांगितले होते.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शरद पवार महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याच्या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना चांगलीच मिरची झोंबल्याचे दिसते. पडळकरांच्या निषेधार्थ आपण फार मोठे सुसंस्कृत असल्याचा आव आणत राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी जोडे मारणे, पुतळा जाळणे अशी आंदोलनेही पश्चिम महाराष्ट्रातल्या तीन-चार जिल्ह्यात करुन दाखवली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना विरोधाचे हे जुने-पुराणे प्रकार फारसे पसंत पडले नसावेत आणि आम्हीही भाजपवाल्यांना अशा शिव्या देऊ की त्यांना झोपही येणार नाही, अशी धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. मुश्रीफ धमकी देऊनच थांबले नाहीत, तर त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संस्कृती किती महान आहे, हेही ठोकून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी चुकीचे वक्तव्य केले, तर शरद पवार त्या कार्यकर्त्यास माफी मागण्यास भाग पाडतात. इतकेच नव्हे तर पक्षातून त्याची हकालपट्टी केली जाते, असेही हसन मुश्रीफांनी सांगितले. मुळात शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मुश्रीफ जे बोलले, त्यात सत्य आणि तथ्याचा लवलेशही नसल्याचा दाखला पक्षाध्यक्षांपासून इतरांनी केलेली विधाने आणि भाषणेच देत असल्याचे थोड्याफार चौकसपणातून स्पष्ट होते.


शरद पवारांभोवती जमलेल्या हुजर्‍यांनी सातत्याने त्यांची एक ‘सुसंस्कृत’ आणि ‘सभ्य नेता’ अशी प्रतिमा उभी केली. मात्र, गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी संस्कृती, सभ्यता म्हणजे काय, याचा परिचय खुद्द पवारांनीच करुन दिला होता. तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी एका प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांना ‘उखाड फेकेंगे’ असे म्हटले होते. पवारांनी मात्र त्याला उत्तर देताना हिंदीतील ‘उखाड फेकेंगे’चे मराठीत भाषांतर केले आणि “कोणाला काय उखडायचे ते उखडा,” असे अत्यंत सभ्य भाषेत सांगितले होते. दरम्यानच्या काळातच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “आम्ही पहिलवानासारखे मैदानात उतरल्याचे सांगत समोर कोणीही दिसत नसल्याने कुस्ती कोणाशी करायची,” असा प्रश्न विचारला होता. कारण, त्यावेळी भाजपपुढे अन्य कुठल्याही पक्षाचे आव्हान नव्हते आणि युती पुन्हा एकदा सहज सत्तेवर येईल, असेच वातावरण होते. मात्र, फडणवीसांच्या याच विधानावर शरद पवारांनी अशी काही संस्कृती दाखवली की, महाराष्ट्रानेही शरमेने मान खाली घालावी. “कुस्तीगीर परिषदेचा दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेला असल्याने कुस्ती कोणाशी करतात, याची मला चांगली माहिती आहे, पण ‘असल्यांशी’ काय लढणार?” असे म्हणत पवारांनी एखाद्या नटालाही लाजवेल असले हातवारे करुन दाखवले होते. ती ध्वनिचित्रफित पाहिली की त्या हातवार्‍यांचा नेमका अर्थ काय, हे जसे कळते तसेच पवारांचा सुसंस्कृतपणा म्हणजे नेमके काय हेही समजते. आता हसन मुश्रीफ अशा विकृत विधानांबद्दल पक्षाध्यक्षांना माफी मागायला लावतील की, पवार जे बोलतील तीच राष्ट्रवादी काँग्रेसची संस्कृती-सभ्यता असल्याची दवंडी पिटतील?


२०१९च्याच विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवार शिवसेनेबद्दल काय बोलले, हे सर्वश्रूत आहे. पवारांच्या एका सभेत कुत्रा घुसला आणि त्या कुत्र्याकडे हात करत “शिवसेनेचे लोकं आले की काय,” असे ते म्हणाले. आता ही कोणती संस्कृती होती, हे मुश्रीफ सांगतील काय? ते सांगणार नाही किंवा निवडणुकीच्या काळातील टीका असे म्हणून उडवूनही लावतील, पण पवारांनी जातीपातीचे राजकारण तर हयातभर केले. १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील वक्तव्यांपासून ते “पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे, आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात,” या छत्रपती संभाजी राजे यांच्या खासदारकीबाबतच्या विधानांपर्यंत पवारांनी आपला सभ्यपणा दाखवलेला आहे. हे झाले शरद पवारांबद्दल, पण राष्ट्रवादी काँग्रेसची गतही तशीच आहे. हसन मुश्रीफ कितीही म्हणत असले तरी विकृत टीका करणार्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेसने अजिबात पक्षातून बडतर्फ केलेले नाही. उलट विकृतीकारांनाच संस्कृतीवर बोलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले, पडळकरांच्या विधानाला उत्तर देण्यासाठी बोलते केले. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका तरुण कार्यकर्तीने देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि इतरही नेत्यांबद्दल असे काही शब्दधन उधळले की, त्या पक्षाचा सभ्यपणा अगदी जगजाहीर झाला.

 
राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष असलेल्या सक्षणा सलगर या तरुण कार्यकर्तीचे ते भाषण आज हसन मुश्रीफांना आठवत नसेल. पण याच भाषणात सक्षणा सलगर हिने नरेंद्र मोदींना ‘फुटाणा’, देवेंद्र फडणवीसांना ‘वाटाणा’ आणि आदित्य ठाकरेंना ‘बेणे’ व ‘पेंग्विन’, म्हटले होते. विशेष म्हणजे, ही मुलगी आपली संस्कृती-सभ्यता दाखवत असताना मंचावर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारही उपस्थित होते. मात्र, अजित पवार वगळता अन्य कोणालाही तिच्या भाषणात काही वावगे दिसले नाही. शरद पवारही त्याबद्दल काही बोलले नाही आणि सुप्रिया सुळे तर हे भाषण सुरु असताना लोकांना असलीच भाषा आवडते, असे अजित पवारांना सांगत तिची भलामण करत होत्या. हसन मुश्रीफांनी सक्षणा सलगरने तिच्या वाह्यात आणि बेलगाम विधानांमुळे माफी मागितल्याचे वा तिची पक्षातून हकालपट्टी झाल्याचे कधी पाहिले का? की सक्षणा सलगर अजूनही राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आहे, यालाच हसन मुश्रीफ हकालपट्टी समजतात? म्हणूनच हसन मुश्रीफांनी पक्षाच्या संस्कृती व सभ्यतेबद्दल बोलणे सोडून द्यावे आणि ते जे आम्ही इतक्या शिव्या देऊ तितक्या शिव्या देऊ असे म्हणतायत, त्यात विशेष असे काही नाही. कारण वरील उदाहरणांवरुन ते काम राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी वर्षानुवर्षांपासून करत आल्याचेच स्पष्ट होते, त्यात नवीन ते काय? हो, आता सत्तेची मस्ती डोक्यात गेल्याने हसन मुश्रीफांसारखी मंडळी पक्षाच्या ‘शिवीकोषा’त नव्या शिव्या नक्कीच जोडू शकतात आणि म्हणूनच त्यांनी शिव्यांची धमकी दिलेली असावी.


दरम्यान, गोपीचंद पडळकर यांचे शरद पवारांबद्दलचे विधान समर्थनीय नाहीच आणि तसे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही स्वच्छ शब्दांत सांगितलेले आहेच. म्हणजेच भाजपची भूमिका इथेच स्पष्ट होते, पण राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या नेते-कार्यकर्त्यांच्या नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील आदी नेत्यांबाबतच्या याआधीच्या सुसंस्कृत आणि सभ्य विधानांबद्दलची भूमिका कधी स्पष्ट करणार? की तीच संस्कृती आणि सभ्यता पुढेही चालवणार?
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.