स्वतःचे अपयश झाकण्यासाठी

    दिनांक  29-Jun-2020 22:36:56
|
Vedh_1  H x W:
“२०११ साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याविषयी आम्हाला अजूनही शंका आहे. त्यामुळे काही खेळाडूंची चौकशी ही व्हायलाच हवी,” असे मत श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगमगे यांनी व्यक्त करत क्रिकेटविश्वातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून काढले. २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना श्रीलंकेने भारताला विकला असल्याचे विधानही त्यांनी केले. २०११ साली भारताने जिंकलेल्या विश्वचषक सामन्याबाबत श्रीलंकेने जवळपास नऊ वर्षांनंतर असे विधान करणे म्हणजे हे खूपच वेदनादायी होते. या सामन्याचे पुनःप्रक्षेपण पाहतानाही अनेकदा श्रीलंकेच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. अगदी नाणेफेकीदरम्यानही जो गोंधळ उडाला, त्याबाबत अनेक क्रिकेट समीक्षकांनी तत्कालीन श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराच्या वागण्यावरच संशय व्यक्त केला होता. एखाद्या सामन्यानंतर नाणेफेक दुसर्‍यांदा करण्याचा प्रकार क्रीडाविश्वातही बहुधा पहिल्यांदाच घडला असावा. दुसर्‍यांदा नाणेफेक झाली, तेव्हा संगकाराने ती जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय खेळपट्ट्या या फलंदाजांसाठी पोषक मानल्या जातात. त्यामुळे येथे प्रथम फलंदाजी करणे हे फार महत्त्वाचे मानले जाते. नाणेफेकीदरम्यान घडलेल्या प्रकारानंतर संगकाराला जे हवे ते मिळाले. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेने २७५ धावांचा डोगर उभारला. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग शून्यावर बाद झाला. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरही १९ धावा करून माघारी परतला. अवघ्या ३० धावांतच दोन महत्त्वाचे गडी तंबूत परतले होते. सामना पूर्णपणे श्रीलंकेच्या बाजूनेच झुकला होता. मात्र, सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि भारताला सामना जिंकून दिला. भारताने आपल्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेतला, हे श्रीलंकेला पचवणे अद्यापही जड जात आहे. म्हणूनच २०११ सालचा विश्वचषक श्रीलंकेने भारताला विकला, अशी विधाने माजी क्रीडामंत्र्यांकडून केली जात आहे. हे म्हणजे स्वतःचे अपयश झाकण्यासाठी दुसर्‍याला दोष देण्यासारखे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


चोराच्या मनात चांदणं!


श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री यांनी महिंदानंदा अलुथगमगे यांच्या या आरोपानंतर क्रिकेट समीक्षकांनी विविध विषयांवर आपले मत मांडले आहे. हे ही मुद्दे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहेत. महिंदानंदा यांच्या म्हणण्यानुसार जर याबाबत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पुरावे दिले असते, तर त्यांच्या म्हणण्यात तथ्य होते. मात्र, त्यांनी तसे काहीही केलेले नाही. त्यामुळे ‘विश्वचषक विकला‘ या म्हणण्याचा नेमका काय अर्थ घ्यावा, असा प्रश्न उपस्थित होतोच. भारत विश्वचषक जिंकावा यासाठी श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी भारताला मदत केली असावी असा जर त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असेल तर ते खेळाडू कोण? कोणत्या आधारावर तुम्ही त्यांच्यावर आरोप करता? आपल्याजवळ पुरावा काय? आणि पुरावे असतील तर ते तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे सादर का केले नाहीत? असा विविध प्रश्नांचा भडिमार भारतासह जगभरातील क्रिकेट समीक्षकांनी महिंदानंदा यांच्यावर केला. या एकाही प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थ ठरलेल्या महिंदानंदा यांना मात्र नंतर आपल्या बोलण्याचा पश्चाताप झाला. आपले बोलणे मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली. जगभरातून चौफेर टीका झाल्यानंतर महिंदानंदा यांना याबाबत खुलासा करावा लागला. “विश्वचषकाच्या अंतिम फेरीविषयी मला संशय आहे. त्यामुळे याबाबत चौकशी व्हावी, इतकीच माझी इच्छा होती. माझ्याकडे असणारे काही पुरावे मी श्रीलंकेचे सध्याचे क्रीडामंत्री दुल्लास अल्हापेरुमा यांच्याकडे सुपूर्द केले असून ते लवकरच यामागील शोध घेतील, अशी आशा आहे,” असे ते आपल्या खुलाश्यात म्हणाले. मात्र, तुम्ही पुरावे ’आयसीसी’कडे का सादर करत नाहीत, या प्रश्नावर त्यांची चुप्पी कायम होती. केवळ संशयाच्या आधारावर इतका मोठा दावा तुम्ही कसे काय करू शकता, असे पत्रकारांनी विचारल्यावर याही प्रश्नाचे उत्तर महिंदानंदा यांना देता आले नाही. त्यामुळे भारत २०११ साली विश्वविजेता झाला हे अद्यापही श्रीलंकेच्या पचनी पडलेले नाही, हे मात्र तंतोतंत खरे असल्याचे आता वाटू लागले आहे. भारतामुळे विश्वचषक न जिंकता आल्याची श्रीलंकेची खंत आजतागायतही कायम असल्याचे हे यामुळे सिद्ध होते.

- रामचंद्र नाईक
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.