प्रशासनातील समाजशील चेहरा

    दिनांक  29-Jun-2020 22:48:25   
|
sanjay_1  H x W
“मी अधिकारी आहे, पण मी समाजाचा सेवक आहे,” असे म्हणत समाज आणि देशहित कसे साध्य होईल, यासाठी जीवाचे रान करणारे प्रशासकीय अधिकारी धनंजय सावळकर...


चेंबूर येथे पी. एल. लोखंडे मार्गाच्या पुढे आत खाडी भागात अतिक्रमण वाढले. त्या अवैध झोपड्या तोडण्याच्या आदेशाचे पालन धनंजय सावळकर, उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण विभाग) यांनी केले. पण, मेधा पाटकर यांनी याबाबत मुंबईचे प्रशासन त्यातही कारवाई करणारे धनंजय सावळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. बैठका घेतल्या, त्यावर धनंजय इतकेच म्हणाले, “तरतूद नाही म्हणून कायदा मी मोडू शकत नाही मॅडम. माझे कर्तव्य मला पूर्ण करावेच लागेल. संविधानाने सांगितलेला कायदा मानायलाच हवा.” धनंजय सावळकर यांना जानेवारी २०२० साली महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे सहसंचालक म्हणून बढती मिळाली आहे. ती पदोन्नती त्यांच्या कामाला, त्यांच्या राष्ट्रीय सामाजिक बांधिलकीला मिळाली, असेच म्हणावे लागेल. आपण प्रशासकीय अधिकारी नाही, तर कायद्याने जनसेवक आहोत, असे यांचे मत.


रायगडला ‘प्रांत अधिकारी’ असताना ते स्वत: आपल्यासोबत कर्मचार्‍यांना घेऊन कातकरी समाजाच्या वाड्यावाड्यात गेले. बारा-तेरा वाड्यातील शेकडो कातकरी आणि इतर वनवासी बांधवांना योग्य ती शहानिशा करून जातीची प्रमाणपत्रे दिली. आज कितीतरी बांधव या दाखल्यामुळे समाजाच्या मूळ प्रवाहात सामील झाले आहेत. पुढे कल्याणला ‘प्रांत अधिकारी’ म्हणून जबाबदारी मिळाली. त्यावेळी त्यांच्याकडे एक केस आली. आईवडिलांची सगळी संपत्ती बळकावून त्यांना घराबाहेर काढलेल्या मुलाला त्यांच्यामुळे शिक्षा झाली. अशा केसेसमध्ये पाठपुरावा करून न्याय मिळवून देणारी ही पहिलीच घटना. शासनाच्या योजना लोकांसाठी असतात. त्या लोकांनाच समजल्या नाहीत, तर काय उपयोग, असे धनंजय यांचे मत. त्यामुळे त्यांनी ‘शासकीय योजनांची जत्रा’ असा उपक्रम राबवला.


आता धनंजय यांची पर्यटन विभागाच्या सहसंचालकपदावर नियुक्ती झाली आहे. धनंजय म्हणतात, “कोकण किनारपट्टीचा पर्यटन स्तरावर विकास व्हावा. जगभरातून कोकणच्या किनारपट्टीला पर्यटकांची पसंती मिळावी, अशी योजना कालपरवाच पारित झाली. यामुळे भूमिपुत्रांना रोजगाराच्या भरपूर संधी मिळणार आहेत, तसेच स्थानिक परिसराचा विकासही होईल.”


धनजंय हे सातार्‍याच्या फलटणमधील बरड गावचे, धनगर कुटुंबातील. एकूण चार भावंडं. त्यापैकी एक धनंजय म्हणजे धनबा. लहानपणापासून हुशार. वडील ज्ञानेश्वर हे एसटीत चालक, तर आई कौसल्या गृहिणी. पण, घोंगडी बनवण्याचे पारंपरिक कामही त्या करायच्या. शेतातही राबायच्या. आपला धनबा हुशार आहे, त्याने एसटीचे डेपो मॅनेजर व्हावे, असे ज्ञानेदव यांना वाटे. त्यासाठी आठवीला त्यांनी तालुक्याच्या गावी शिकायला पाठवले. तिथे एका खोलीत धनंजय राहू लागले. तिथे फक्त झोपण्याची व्यवस्था. ऊन, वारा, पावसामध्ये मग धनंजय निरेच्या उजव्या कालव्यावर अंघोळीला जायचे. एसटीने घरून दररोजचा डबा यायचा. उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी सुकून जायची. धनंजय परत गावी आले. आई म्हणाली, “धनबा लेका, कष्ट काढ रे. शिकशील तर साहेब बनशील. त्रास काढ लेका.” आईने डोळ्यांत पाणी आणून सांगितले आणि धनंजय यांनी ऐकलेसुद्धा. ते परत तालुक्याला आले. दहावीला एसटी कर्मचार्‍यांच्या मुलांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवत उत्तीर्ण झाले म्हणून त्यांचा एसटी डेपोत सत्कार करण्यात आला. सत्काराच्या वेळी ज्ञानेश्वर एका कोपर्‍यात अभिमानाने अश्रू पुसत उभे होते.आईवडिलांच्या कष्टाने धनंजयना बळ मिळाले. पुढे मोठा भाऊ अशोक यांनी रिक्षा चालवून धनंजयला शिक्षणासाठी मदत केली. धनंजय मुंबईच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयात शिकू लागले. तिथे महाविद्यालयातील मुले लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होत. त्यावेळी धनजंय यांना वाटले की, आपणही परीक्षा द्यावी. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नामध्ये परीक्षा उत्तीर्ण झाले, मुलाखतीलाही गेले. पण केवळ नऊ गुणांसाठी संधी हुकली. त्याचवेळी त्यांनी विक्रीकर निरीक्षकाचीही परीक्षा दिली होती. तिथे दीड लाख मुलांमधून केवळ १०० मुले निवडली गेली. त्यात धनंजय होते. पण, नोकरी करतानाही त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न सोडले नाही. दुसर्‍यांदा परीक्षा दिली. मात्र, अनुत्तीर्ण झाले. रडरडले, पण धीर सोडला नाही. पुन्हा तिसर्‍यांदा परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. आज इतक्या मोठ्या पदावर असतानाही आपला गाव, समाज यांच्याशी नाळ त्यांनी तोडली नाही. गावातील सर्वच शासकीय आणि समाजोपयोगी वास्तूंना सौरऊर्जा त्यांनी मिळवून दिली. गावच्या देवस्थानांचा विकास केला. धनगर समाजमंदिरांच्या विकासाकडे लक्ष दिले. समाजासाठी, देशासाठी इतक्या तळमळीने काम करण्याची प्रेरणा कुठून मिळाली, असे विचारले असता धनंजय म्हणतात की, “स्वामी विवेकानंदांचे विचार माझे प्रेरणास्थान आहे. त्यांनी सांगितले सर्वांमध्ये परमेश्वर आहे. असे मानून सगळ्यांचे कल्याण करण्याची भारतीय संस्कृती परंपरा, मातृभूमीप्रतिची निष्ठा माझ्या जीवनातील सर्वच कर्तव्यांचा पाया आहे.”आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.