कोरोना कहर (भाग-१५) - ‘अँटीम टार्ट’

    दिनांक  29-Jun-2020 20:40:47
|
Antim tart_1  H


सर्वसाधारणपणे मवाळ रुग्णांमध्ये ताप व कोरडा खोकला व अंगदुखी अशी सामान्य लक्षणे दिसतात. परंतु, आजाराची तीव्रता वाढून जेव्हा अजून महत्त्वाच्या अवयवांची लक्षणे दिसू लागतात, तेव्हा ‘अँटीम टार्ट’ (Antim Tart) सारखे औषध मदतीला धावून येते. आपण या ‘अँटीम टार्ट’बद्दल आज माहिती पाहूया. हे औषध ‘अँटीमनी’ या धातू व त्याच्या संयुगांपासून बनवलेले असते. या ‘अँटीम टार्ट’चा मुख्य प्रभाव हा श्वसनसंस्थेवर व प्रामुख्याने श्वासनलिका व फुफ्फुसांच्या श्लेष्मा पटलावर (Mucous Membrane) वर असतो. तसेच रक्ताभिसरण संस्था व हृदयावरही त्याचा परिणाम होत असतो. या औषधाच्या लक्षणात रुग्णाच्या छातीमध्ये व श्वसननलिकेत श्लेष्मा अतिप्रमाणात तयार होतो व त्यामुळे छातीमध्ये तो कफाच्या रुपाने गच्च साठून राहतो व त्याच्याचमुळे मग छाती भरून येते, छातीत घुरघुरायला लागते. श्वसनक्रियेला अडथळा निर्माण होऊन मग श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.


रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागते. रुग्ण तोंडाने श्वास घेऊ लागतो. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली की, रुग्णाचे ओठ काळेनिळे पडू लागतात. जीभ पांढरी पडते व निळसर छटा दिसू लागते. रुग्णाला अतिशय थकवा येऊ लागतो. एक पाऊल पुढे टाकणेही त्रासदायक होऊ लागते. रुग्णाला प्रचंड घाम येतो. ग्लानी येते आणि त्याचे हातपाय व शरीर गळून जाते, ढिले पडते. श्वास घेताना रुग्णाचे पोट जोरात वरखाली उडत राहते. रुग्ण सतत सांगतो की, त्याला घुसमटायला होते. या लक्षणांबरोबरच खोकला चालू होतो. पातळ, छातीत घुरघुर असा आवाज करणारा कफ तयार होतो. छाती या कफाने पूर्ण भरली आहे, अशी रुग्णाची भावना होते. परंतु, फार प्रयत्न करूनही हा कफ नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर निघत नाही. खूप वेळ खोकून प्रयत्न केला असता, थोडासा कफ बाहेर पडतो. खोकून खोकून रुग्णाला वांती होते व ग्लानी येऊन रुग्ण झोपतो. रुग्ण जर चिडला किंवा काही कारणाने रागावला असेल तर त्यास जास्त खोकला येतो. लहान मुलांच्या दम्यावर हे एक फार उपयुक्त औषध आहे. परंतु, त्या लहान मुलाची इतर जनरल लक्षणेही तशी मिळतीजुळती असली पाहिजेत. फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते, ब्रॉन्कायटीस, न्यूमोनिया, एमफायसीमा यांसारख्या आजारांची लक्षणे रुग्णामध्ये दिसू लागतात. म्हणूनच या आजारावर ‘अँटीम टार्ट’ हे अतिशय उपयुक्त असे औषध आहे.तापाच्या लक्षणामध्ये प्रथम रुग्णाला फार थकवा आणि ग्लानी (Drowsiness) येते. खूप घाम येऊन रुग्णाचे शरीर थंड पडते. त्यास थंडी वाजू लागते. परंतु, शरीराची मात्र आग होऊ लागते. तापामध्ये रुग्ण फार चिडचिडा होतो. लहान मुल असल्यास सतत उचलून घ्यायला सांगते. परंतु, नुसते उचलून त्याचे समाधान होत नाही, तर त्यास खांद्यावर सरळ उचलून घ्यावे लागते, तेव्हाच त्याचा दम कमी होतो. तापात भूक मंदावते व तहान अतिशय कमी लागते. लहान मूल असल्यास दूध अजिबात पित नाही. ‘अँटीम टार्ट’ ज्याला लागू पडते, अशा रुग्णाच्या जिभेवर जाडसर पांढरा थर असतो. जणू काही रुग्णानेच त्याची जीभ पांढर्‍या रंगाने रंगवली आहे. रुग्णाचा घसाही दुखत राहतो. मानसिकदृष्ट्या देखील ‘अँटीम टार्ट’मध्ये काही लक्षणे दिसतात. जसे रुग्णाला फार भीती आणि एकटेपणाची भीती वाटते. तापामध्ये रुग्ण भ्रमावस्थेत बडबडतो. अतिशय चिडचिडा स्वभाव असतो. जे लोक त्यांची काळजी घेतात, त्यांना हे लोक अक्षरशः पकडून ठेवतात. खालील गोष्टींनी रुग्णाला बरे वाटते. जसे- कफ बाहेर काढल्यावर त्यास आराम वाटतो. सरळ ताठ बसल्यावर त्यास आराम वाटतो. उलटी केल्यावर तसेच ढेकर आल्यावर व उजव्या बाजूस झोपल्यावर रुग्णास आराम वाटतो. तसेच खालील गोष्टींनी रुग्णाला त्रास होतो. जसे- उष्ण हवा, बंद, दमट उष्ण खोलीत त्यास त्रास होतो. थंड व दमट हवा, सतत हालचाल केल्याने, तसेच अचानक बसल्या जागेवरून उठल्याने, आडवे पडल्याने रुग्णाला त्रास होऊ लागतो. कोरोना संसर्गित झालेल्या व फुफ्फुसाला संसर्ग झालेल्या रुग्णांना ‘अँटीम टार्ट’ हे औषध वरदानच आहे. परंतु, त्यांची सर्व लक्षणे व चिन्हे जर जुळून आली, तरच होमियोपॅथीक तज्ज्ञ ते देतात, हे लक्षात ठेवावे. पुढील भागात आपण अजून एक औषधाबद्दल थोडक्यात पण महत्त्वाची माहिती पाहू.
(क्रमशः)- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.