पडळकरांच्या प्रतिमेला भाजप कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक

    दिनांक  28-Jun-2020 18:39:23
|

gopichand padalkar_1 बारामती : '
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत' अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येेष्ठ नेेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. मात्र, दुसरीकडे बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला रविवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा अभिषेक घालत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. ठिकठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केले जात आहे. इतकेच नाही तर पंढरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तर सांगलीत पडळकरांचे जंगी स्वागत करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी बारामती शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून शहरातील भाजप कार्यालयासमोर एकत्र येत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तसेच धनगर समाजाकडून पडाळकर यांच्या समर्थनार्थ चंद्रभागेच्या वाळवंटात दुग्धाभिषेक करण्यात आला. गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दूध आणि चंद्रभागेच्या पाण्याने अभिषेक घालून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. पडळकर यांच्या विधानावर आंदोलन करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भ्रष्ट हात आमच्या नेत्यांच्या प्रतिमेला लागल्याने, प्रतिमेला अभिषेक घालून शुद्ध केले, असे यावेळी पडळकर समर्थकांनी सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.