कोरोनाला रोखण्यासाठी उत्तर मुंबईत राबवला जाणार धारावी पॅटर्न

    दिनांक  28-Jun-2020 20:22:00
|
Corona_1  H x W

परिसरात मोबाईल क्लिनिकसह, घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करणार!

मुंबई : मुंबईत ठाण मांडून बसलेल्या कोरोनाने लॉकडाऊनमधून शिथिलता मिळताच उपनगरात मुसंडी मारली. त्याने परिमंडळ ७ मधील मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर भागाला विळखा घालायला सुरुवात केली. मात्र त्याला आळा घालायला तेथे धारावी पॅटर्न राबवायला सुरुवात करण्यात आली आहे.


उत्तर मुंबईत कोरोना रोखण्याठी पालिकेने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. यशस्वी झालेल्या धारावी पॅटर्नच्या धर्तीवर प्रशासनाने काम सुरु केले आहे. घरोघरी स्क्रिनिंग, मोबाईल क्लिनिक, कंटेनमेंट आणि प्रभावीपणे क्वारंटाईन मोहीम राबवली जात आहे. ‘मिशन झिरो’ अंतर्गत दहिसर, बोरिवली, कांदिवलीत तीन दिवसांत १६ आरोग्य शिबिरे, १५ मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून १ लाख २६ हजार ३१३ लोकसंख्येच्या परिसरात १ हजार ९५ जणांचे स्क्रिनिंग केले आहे.


कांदिवली, बोरिवली आणि दहिसर विभागात सध्या ‘मिशन झिरो’ अंतर्गत काम सुरू आहे. एखाद्या इमारतीत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करून नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमधील चारपैकी तीन रस्ते सील केले करण्यात आले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेची गैरसोय होऊ नये म्हणून फक्त एक रस्ता सुरू ठेवण्यात येत आहे. कोरानाबाधित आढळल्यास परिसरातील सर्वांचे स्क्रिनिंग, लक्षणे आढळल्यास तातडीने कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये मोबाईल व्हॅनचा मोठा फायदा होत असून सध्या प्रतिदिन सुमारे अडीच ते तीन हजार जणांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. दरम्यान, या तिन्ही विभागात शनिवारपर्यंत ३०५० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून ३२९५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.