राज्य सरकार कोरोनाशी नाही,आकडेवारीशी लढते आहे : देवेंद्र फडणवीस

    दिनांक  28-Jun-2020 22:42:46
|

devendra fadnavis_1 
राज्यातील अनेक मंत्री केवळ केंद्र सरकारवर टीका करतात ; कर्तृत्व मात्र शून्य : देवेंद्र फडणवीस मुंबई :
मोदी सरकार २.०च्या पहिल्या वर्षाच्या विकासपर्वाची गाथा सांगण्यासाठी आज सायंकाळी झालेल्या मुंबई-कोकण प्रांत विभागाच्या रॅलीत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबरच हजारो ठाणेकरांनी सहभाग घेतला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी वर्षभरात घेण्यात आलेल्या क्रांतिकारक निर्णयांची माहिती दिली. तर वर्षानुवर्षे रखडलेलेले निर्णय घेतल्याने जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "कोरोनाच्या काळात सुद्धा संवादाचे हे उत्तम माध्यम. टाळेबंदी असली तरी केलेल्या कामाचा जनतेला हिशोब देण्याचे काम यातून साध्य होत आहे. मुंबई आणि कोकणातील भाजपा कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात अतिशय मोठे सेवाकार्य केले. मला त्यांचा अभिमान आहे. काही कार्यकर्त्यांचा समाजासाठी काम करताना प्राण सुद्धा गेला. पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहेत.कोकणात निसर्ग चक्रीवादळ आले, तेव्हा सुद्धा शासनाची मदत पोहोचण्यापूर्वी भाजपची मदत पोहोचली आहे. पुढे ते म्हणाले,मजबूत नेता असला की किती वेगाने काम होऊ शकते, याचा आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिला. कोरोनाच्या काळात अतिशय भक्कम काम, प्रत्येक घटकासाठी मोदीजींनी केले.

पुढे माहिती देताना फडणवीस म्हणाले, "कापूस खरेदी होत नसताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भक्कम पाठपुरावा केला. पण राज्य सरकारने त्याचा लाभ घेतला नाही.आज लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) मोठ्या प्रमाणात मदत केली जात आहे. ५० हजार उद्योगांना ४००० कोटींवर मदत मिळाली आहे.कोरोनाच्या हाताळणीमध्ये चुका होत आहेत. चाचणी कमी करून ही लढाई कदापिही जिंकता येणार नाही. परिस्थिती काळजीची आहे. अनेक मंत्री केवळ केंद्र सरकारवर टीका करण्यात धन्यता मानतात. त्यांचे कर्तृत्व शून्य आहे. वीज बिले सावकारांप्रमाणे पाठविण्यात आले आहेत. जनता त्रस्त आहे. मी टीका करीत नसून केवळ सूचना करतो आहे. पण सद्या राज्य सरकार कोरोनाशी नाही, आकडेवारीशी लढते आहे," असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या,"कोरोनाच्या आपत्तीत घेतलेले धाडसी निर्णय, आत्मनिर्भर भारताचा नारा, पीपीई किट्स निर्यातीत यश आदींबरोबरच वर्षभराच्या काळात बालाकोटवरील सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राईकनंतर संपूर्ण जगाने भारताचे शौर्य पाहिले. वन रॅंक वन पेंशन, वन नेशन-वन टॅक्स जीएसटी आदी प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या." तसेच शेतकऱ्यांना उत्तम एमएसपी मिळाली. कलम ३७०, राम मंदिर उभारण्याचा निर्णय, तिहेरी तलाक, नागरिकत्व कायदा आदी निर्णयाने देशात नवा अध्याय रचला गेला, असे स्मृती इराणी यांनी नमूद केले. भारतीय लष्कराच्या मजबूतीसाठी 'चीफ ऑफ डिफेंस पद', मिशन गगनयानची तयारी, पंतप्रधान किसान सन्मान निधी, जल जीवन मिशन, प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहिम, शेतकरी, शेतमजूर, लहान दुकानदार आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना मासिक पेन्शन आदी निर्णयांची माहिती व्हर्च्युअल रॅलीत देण्यात आली.या रॅलीत दिल्लीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व केंद्रीय मंत्री पियुष गोयल सहभागी होते. तसेच मुंबईतून भाजपाच्या प्रभारी सरोज पांडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर भाजपाच्या खोपट येथील कार्यालयातून जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. माधवी नाईक उपस्थित होते. तसेच वेगवेगळ्या भागातील भाजपा कार्यालये, मंडल कार्यालयांबरोबरच शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी या  रॅलीत सहभाग नोंदविला. युट्युब तसेच इतर सोशलमिडिया प्लॅटफॉर्मवरून लाखोंच्या संख्येने नागरिकांनी हि रॅली पहिली. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.