रत्नागिरी जिल्ह्यातील ‘निसर्ग’बाधितांना संघाद्वारे मदतीचा ओघ!

    दिनांक  27-Jun-2020 19:36:06
|
kokan_1  H x W:


दापोली : जूनच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला झोडपून काढले. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर भाग आणि संपूर्ण रायगड जिल्हा या वादळाने प्रभावित झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून या भागांमध्ये मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. रत्नागिरीतील दापोली, आंजर्ले, मुर्डी, केळशी, मंडणगड अशा प्रभावित क्षेत्रांमध्ये हे मदतकार्य सुरु आहे. जवळपास १००० कुटुंबांना विविध प्रकारची मदत प्राप्त झाली आहे.


मदतकार्यापूर्वी स्वयंसेवकांच्या माध्यमातून दापोलीतील ७३ तर मंडणगड तालुक्यातील ६० गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. २३ जून पर्यंत दापोली तालुक्यात ६०० कुटुंबांना तर मंडणगड तालुक्यात ४७९ कुटुंबांना अन्नपाकिटांचे वाटप करण्यात आले. या कामासाठी ११५ सेविका आणि ३० स्वयंसेवकांचा सहभाग होता. या वादळात अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. दापोलीत २३७०० कौलांचे व ५५० पत्र्यांचे तर मंडणगड येथे १८०० कौलांचे व १०० पत्र्यांचे वितरण करण्यात आले. २५ स्वयंसेवकांनी कौले घरावर लावण्याचे काम केले. दापोली तालुक्यात दापोली, लांजा, खेड, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर येथील ५० स्वयंसेवकांच्या श्रमदानातून ४४ घरांच्या वाटा, पायवाटा तयार करण्यात आल्या तर ३१८ स्वयंसेवकांद्वारे ४० बागा स्वच्छ करण्यात आल्या. दापोलीतील ५८ कुटुंबांना सौरदिव्यांचे वितरण करण्यात आले तर ७५ घरांसाठी तीन डीझेल पंप पुरविण्यात आले. ५८३ घरांमध्ये प्रत्येकी पाच किलो कणीक देण्यात आली. १८३ कुटुंबांना टॉर्च, ३३३ कुटुंबांना मेणबत्ती, १८३ कुटुंबांना मच्छर अगरबत्ती अशी मदत करण्यात आली. ३५ कुटुंबांना कपडे वाटप करण्यात आले.


मंडणगड तालुक्यात ७२ स्वयंसेवकांच्या माध्यमातून साडेसहा किमी रस्ते स्वच्छ करण्याचे व १३ बागा स्वच्छ करण्याचे काम करण्यात आले. ५५३ कुटुंबांना टॉर्च, क्लोरीन द्रावण, मेणबत्ती, तुरटी, मच्छर अगरबत्ती अशा स्वरुपात मदत करण्यात आली. दोन इन्व्हरटर पुरविण्यात आले. आजही या भागात सेवा कार्य सुरु असून जनतेने त्यात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.