दिलासादायक : भारतात जवळपास ३ लाख रुग्ण कोरोनामुक्त!

27 Jun 2020 14:56:23

Corona_1  H x W


देशातील कोरोना रिकव्हरी दर ५८%; आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची माहिती


नवी दिल्ली : भारतात कोरोनाचे थैमान सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांच्या पार गेल्याने साहजिकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्यादेखील चांगली असल्याने देशाचा रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत आहे. आतापर्यंत जवळपास ३ लाख रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने देशाचा रिकव्हरी रेट वाढून ५८%पेक्षा अधिक आहे. तर मृत्यू दर सर्वात कमी म्हणजे केवळ ३% आहे. अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. विशेष म्हणजे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग कमी होऊन १९ दिवसांवर आला आहे. लॉकडाऊनपूर्वी रुग्ण दुप्पट होण्यासाठी केवळ ३ दिवसांचा कालावधी लागत होता. अशी माहिती देखील डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.


देशात एकूण ५०९६११ कोरोना बाधित रुग्ण असून २९६१०५ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तर १९७८०४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान १५७०२ रुग्णांचा कोविड-१९ च्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. दर दिवशी वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच नागरिकांनाही सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.
Powered By Sangraha 9.0