आसामला पुराचा तडाखा ; १५ जणांचा मृत्यू

27 Jun 2020 11:08:21

assam_1  H x W:
 
 
नवी दिल्ली : एकीकडे कोरोणाचा विळखा तर आता आसामला पुराचाही तडाखा बसला आहे. आसाममध्ये संततधार पाऊस सुरू असल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. संततधार पाऊस आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे दिब्रुगड जिल्ह्यातील २५ हजार लोकांना फटका बसला आहे, असे दिब्रुगडचे उपायुक्त पल्लव गोपाल झा यांनी माहिती दिली. राज्यातील १६ जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला असून १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे राज्यातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
 
 
सेवानिवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या घरातही पाणी शिरले असून प्रशासनाने त्यांच्या आईला सुरक्षित स्थळी हलवले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासून दिब्रुगड शहराला पुराचा फटका बसू लागला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये १४ निवारा केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. शहराच्या उत्तरेकडे जाणारे बहुतेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रुपाई टी इस्टेटजवळील डांगोरी नदीवरील आरसीसी पूल वाहून गेला.राज्यातील ६ जिल्ह्यामध्ये प्रशासनाने १४२ निवारागृहे, मदतकेंद्र स्थापन केली आहेत. यामध्ये १८ हजार लोक राहत आहेत, अशी माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0