गुलामगिरीविरोधी आंदोलनाचे लोण युरोपमध्ये !

    दिनांक  27-Jun-2020 22:25:33
|

george_1  H x Wख्रिश्चन धर्माची निर्मिती कशी झाली, हे सांगणारे जे ग्रंथ आहेत, त्यातील ‘जेनेसिस’ या ग्रंथातील ही गोष्ट आहे. युरोपीय श्वेतवर्णीयांना अनेक पिढ्या आाणि अनेक शतके कृष्णवर्णीयांना गुलाम करण्यास
मान्यता देणारी ही कथा...अमेरिकेतील मिनियापोलीस शहरात जॉर्ज फ्लॉएड या आफ्रिकी-अमेरिकी नागरिकास, त्याच्या किरकोळ गुन्ह्याबाबत, मानेवर गुडघा ठेवून ठार मारण्याच्या विरोधातील आंदोलन सार्‍या जगात पसरत चालले आहे. ‘कोविड-१९’चा प्रसार अधिक की हे आंदोलन मोठे असे वाटावे, एवढा त्याचा विस्तार होत चालला आहे. त्याची इंग्लंडमध्ये जी प्रतिक्रिया उमटत आहे, त्याचा भारताशीही संबंध आहे. त्या आंदोलनाचा भाग म्हणून सोळाव्या शतकातील गुलामांचा व्यापारी आणि रॉयल आफ्रिकन कंपनीचा अधिकारी एडवर्ड कोल्स्टन याचा पुतळा जमावाने पाडला व तो शेजारच्या नाल्यात फेकून दिला. त्यापाठोपाठ ब्रिटनमधील गुलामगिरीविरोधातील जुन्या नेत्यांचे जे पुतळे आहेत, त्या सार्‍याविरोधात मोहीमच सुरू झाली आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून तेथील सरकारने रॉबर्ट मिलिगन याचा पुतळा तातडीने हलवला. दुसर्‍या महायुद्धाचे ब्रिटनचे नेते सर विन्स्टन चर्चिल यांच्या पुतळ्यावरही- ‘हा माणूस गुलामगिरीला गती देणारा होता,’ अशी टिप्पणी लिहिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, भारतात फसवाफसवी करून ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारा रॉबर्ट क्लाईव्ह, वंगभंगाचा कारस्थानी लॉर्ड कर्झन आणि भारतीय संस्कृतीच्या विरोधात इंग्रजी कारकुनी संस्कृती आणणारा लॉर्ड मेकॉले यांच्याही पुतळ्याला विरोध होत आहे.अमेरिकेतील एका घटनेचे पडसाद म्हणून या घटना घडत आहेत, असा जरी घटनाक्रम वाटला तरी त्याची कारणमीमांसा जुनी आहे. साहजिकच त्याची सुरुवात प्रथम जेव्हा पहिला गुलाम अमेरिकेत पाठवला, त्यावेळी म्हणजे सव्वापाचशे वर्षांपूर्वीच होते. त्याच्या विरोधात प्रथम आवाज उठवला तो विसाव्या शतकातील मार्टिन ल्यूथर किंगने. तोपर्यंत आफ्रिकी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठीची विधाने होत असत. त्याचे प्रत्यक्ष आंदोलनात रूपांतर झाले ते १९८५साली. त्या वर्षी युरोपमध्ये, कोलंबसच्या अमेरिका शोधण्याचा पाचशेवा वर्धापनदिन व्यापक प्रमाणावर साजरा करण्याचे ठरले. प्रत्यक्षात कोलंबसने अमेरिका १४९२मध्ये शोधली. युरोपमधील शंभराहून अधिक, कोलंबसच्या जहाजासारखी सजवलेली जहाजे आणि कोलंबसची वेशभूषा केलेले तरुण यांची मिरवणूक काढली जाणार होती. याचा परिणाम युरोपपेक्षा अमेरिकेतील ‘अ‍ॅब ओरिजिनल इंडियन’ संघटनेवरच अधिक झाला आणि त्यांनीही ‘शेवटचा कोलंबस अमेरिकेच्या भूमीवर असेपर्यंत स्वस्थ बसणार नाही,’ असा निश्चय केला. प्रत्यक्षात अमेरिकेतील स्थानिक वंशीय की, जे स्वत:ला ‘अमेरिकेतील मूळचे भारतीय’ समजतात, यांचे संघटन तेवढे भक्कम नव्हते. या प्रक्रियेला 1985 साली सुरुवात झाली. गेल्या 35 वर्षांत ‘अ‍ॅब ओरिजिनल इंडियन’ यांच्या संघटनेने जे काम केले आहे, ते स्पृहणीय आहे. त्या पूर्वीच्या पाचशे वर्षांत युरोपीय नरसंहारातून उरलेल्या स्थानिकांना फक्त दारूची दुकाने आणि कष्टाची कामे यात वाव मिळायचा. पण, त्यांची संघटना भक्कम व्हायला लागल्यावर, त्या तरुण पिढीनेही शिक्षणाची तयारी केली आणि अमेरिकेत जिथे जिथे म्हणून युरोपीय पार्श्वभूमी असलेल्यांची सरकारे आहेत, त्यांना शिक्षण संस्थांतून शिक्षण, संशोधन, प्राध्यापक, बहुराष्ट्रीय कंपन्यांतील जबाबदारीच्या नोकर्‍या यात प्रवेश मिळाला.गेली पाचशे वर्षे युरोपातील प्रामुख्याने स्पेन, पोर्तुगाल आणि ब्रिटन यांनी जगभर जे साम्राज्य केले, ते देशोदेशीच्या गुलामांवरच केले आहे. परिस्थितीनुसार काहींना ‘गुलाम’ म्हटले, तर काहींना ‘मजूर’ म्हटले एवढेच. पण, ऑस्ट्रेलिया, आग्नेय आशिया, भारत आणि फारच मोठ्या प्रमाणावर आफ्रिका या देशांचा समावेश होता. गेल्या पाच-दहा वर्षांत युरोपीय देशांची त्यांनी पूर्वी साम्राज्य केलेल्या देशावरील आणि एकूणच जगाच्या राजकारणावरील आणि अर्थव्यवस्थेवरील पकड ढिली झाली आहे. त्यामुळे त्या त्या देशातील गुलामगिरीची पार्श्वभूमी असणार्‍यांचे संघटन आणि चळवळ वाढली आहे. या सार्‍याला अजून एक कारण म्हणजे जगातील अनेक देशांवरील ख्रिश्चन संघटनांची पकड ढिली पडली आहे. युरोप, अमेरिका, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांत ‘अल्ट्रा ग्लोबलिझम’ नावाच्या संघटनेचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे अनेक शतके ‘ख्रिश्चॅनिटी’च्या नावाखाली सार्‍या जगावर साम्राज्य केलेल्यांची तरुण पिढी त्यांच्याच विरोधात बोलू लागली आहे. ख्रिश्चन धर्माची निर्मिती कशी झाली, हे सांगणारे जे ग्रंथ आहेत, त्यातील ‘जेनेसिस’ या ग्रंथातील ही गोष्ट आहे. युरोपीय श्वेतवर्णीयांना अनेक पिढ्या आाणि अनेक शतके कृष्णवर्णीयांना गुलाम करण्यास मान्यता देणारी ही कथा आहे. त्या कथेनुसार- काही हजार वर्षांपूर्वी एका महाप्रलयात सारे जग बुडाले होते. त्यातून ईश्वर वरदान असणार्‍या काहींना वाचविण्यासाठी त्या महाप्रलयातच एक बोट आली. त्या बोटीत ‘नोहा’ नावाचा एक गृहस्थ आपल्या पत्नीला आणि मुलाबाळांना घेऊन चढला. त्या सार्‍यांना काही दिवस त्या महाप्रलयी पाण्यातच काढावे लागले. नंतर हळूहळू प्रलय शांत झाला आणि त्यांचे जीवन सुरू झाले. मुले मोठी झाल्यावरचा एक प्रसंग आहे. त्याच्या मुलांची नावे ‘साम’, ‘हाम’ आणि ‘जेपेथ’ अशी होती.एकदा नोहा त्याच्या घरात अस्ताव्यस्त अवस्थेत पडला होता. तो दारू प्यायला होता आणि काही प्रमाणात त्याची शुद्ध हरपली होती. त्याला त्याच्या अंगावरील कपड्यांचे भान नव्हते. अशा स्थितीत त्याचा ‘हाम’ नावाचा मुलगा घरात आला. त्याच्या वडिलांची ही विचित्र स्थिती बघून त्याला हसू तर आवरले नाहीच, पण तो वडिलांना म्हणाला, “काय ही तुमची स्थिती? तुम्हाला कपड्यांचीही शुद्ध नाही. हा प्रकार काही बरोबर नाही.” हामने अशी टिप्पणी केल्याबद्दल नोहाला राग आला, तो रागावलाही, पण काही बोलला नाही. पण, त्याचा दुसरा मुलगा ‘साम’ याला वडिलांच्या त्या स्थितीची दुरूनच कल्पना आली. त्याने वडिलांचा अंगरखा हाती घेतला आणि वडिलांच्या त्या स्थितीकडे न बघता, त्यांना देण्यासाठी तो त्या घरात पाठमोरा गेला. वडिलांना तो अंगरखा दिला आणि तो लवकर अंगात घाला, असे सुचविलेही. अशा या प्रसंगात नोहाने हाम याला कृतीबद्दल शाप दिला. तो शाप असा होता की, “तू घर सोडून दक्षिणेकडे जाशील. तेथे तू तर काळा पडशीलच, पण तुझ्या पुढच्या सार्‍या पिढ्या काळ्याच पडतील. त्या सार्‍या पिढ्यांना सामच्या पुढच्या पिढ्यांची सेवा करावी लागेल.” बायबलच्याच भाष्यकारानुसार, हाम पुढे आफ्रिकेत गेला. तेव्हा तो तर काळ पडलाच, पण त्याची मुलेही काळी झाली. इजिप्तपासून दक्षिणेला जोहान्सबर्गपर्यंत तर जेथेे जेथे काळा समाज आहे, तो हामचा वंशज आहे. त्याखेरीज आफ्रिकेतून भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथे जे लोक गेले, तेही हामचेच वंशज आहेत. त्या काळ्या लोकांनी ‘गुलाम’ म्हणून श्वेतवर्णीयांची सेवा करणे, हीच त्यांना बायबलने घालून दिलेली शिकवण आहे. अशा या गोष्टी अनेक देशांत, अनेक पुराणकथांत असतात. पण, युरोपियन लोकांनी युरोपच्या इतिहासाचा हा मुख्य आधार मानून तो त्यांच्या इतिहासाचा मुख्य भाग बनविले. जगातील शंभर देशांपेक्षा अधिक देशांचा इतिहास हा या नोहा कथेवर आधारित आहे. जगातील एक हजार विद्यापीठांपेक्षा अधिक विद्यापीठांत या इतिहासाच्या आधारेच सार्‍या घटनांची मांडणी केली जाते. भारताचा शासकीय इतिहास, शिक्षण क्षेत्रातील इतिहास आणि न्यायालय प्रक्रियेतील सारा इतिहास आजही त्या ‘नोहा’ कथेवर आधारित आहे.
भारताचा इतिहास नोहा कथेवर कसा अवलंबून असेल, याबाबत अनेकांना आश्चर्य वाटेल. पण,ज्याप्रमाणे नोहाचा मुलगा ‘हाम’ हा आफ्रिकेत गेला, त्याप्रमाणे ‘साम’चा वंश, काही युरोपचा भाग आणि काही आशियाचा भाग यात विस्तारला गेला, असे भाष्य आज ख्रिश्चनांच्या वतीने सांगण्यात येते. आपल्याला ‘नोहा स्टोरी’ किंवा ‘सामचा वंश’ म्हटल्यावर कळणार नाही. पण, ‘सामचे वंशज’ म्हणजे सेमेटिक वंशाच्या काही टोळ्या म्हणजे ‘आर्य’ हे भारतात आले, हा ब्रिटिशांनी लिहून घेतलेला इतिहास आपल्याला मान्यच करावा लागला. आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारताचा दक्षिणेकडील काही भाग, हा ‘हाम’ या काळ्या पडलेला मुलापासून वाढला, हा सिद्धांत नाकारणे हे आफ्रिकी आणि ‘अमेरिकी अ‍ॅब ओरिजिनल इंडियन’ विचारवंतांचे मुख्य उद्दिष्टच आहे. युरोपातील नवी पिढीही नोहाचा हा इतिहास मानायला तयार नाही. ख्रिश्चन परंपरेत ही जशी ‘नोहा कथा’ आहे, त्याचप्रमाणे ‘बेबल टॉवर’ही एक कथा आहे. त्यानुसार जगातील सार्‍या भाषा या बायबलमधून तयार झाल्याचा दावा केला जातो. हे सारे दावे आता पुन्हा ऐरणीवर येण्याचा काळ आला आहे.जॉर्ज फ्लॉएडच्या मृत्यूची घटना गेल्या काही दिवसांत जगाने वारंवार पाहिली आहे. आता गुलामगिरीच्या विरोधातील आंदोलनाची दिशा ‘गुलागिरी करणारी साम्राज्यशाही हटावो’ या दिशने निघाली आहे. पुढील चार महिन्यांतील महत्त्वाच्या निवडणुकांत हा विषय प्रामुख्याने आंदोलनाच्या ऐरणीवर असेल, असे दिसते. गुलामगिरीला आणि साम्राज्यशाहीला उचलून धरलेल्यांचे पुतळे ब्रिटनमध्ये जसे आहेत, तसेच ते युरोपातील अन्य देशांतही आहेत, या सार्‍यांच्या दिशेने आता जमाव निघाला आहे, असे चित्र आज दिसते.


- मोरेश्वर जोशी
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.