छत्रपती शाहू महाराज : द्रष्टा राजयोगी

    दिनांक  27-Jun-2020 21:44:31
|

shahu maharaj _1 &nbशुक्रवार, दि. २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १४६वी जयंती संपन्न झाली. त्यानिमित्ताने शाहू महाराजांच्या शिक्षण, समाजव्यवस्था, कृषी, जलसंपदा, उद्योगधंदे, कला, क्रीडा, अशा विविध क्षेत्रांतील सर्वंकष कार्याचा थोडक्यात परिचय करुन देणारा हा लेख...


स्वातंत्र्यपूर्व काळातील दीडशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीत या देशात समाजप्रबोधन व समाजपरिवर्तन यांची एक समृद्ध परंपरा निर्माण झालेली दिसते. राजा राममोहन रॉय यांच्यापासून सुरु झालेली ही परंपरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानापर्यंत येऊन पोहोचते. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, हा प्रवास महात्मा फुले यांच्यापासून सुरु झाला आणि डॉ. आंबेडकरांपर्यंत अखंड सुरु राहिलेला दिसतो. या प्रबोधनपर्वातील या दोघा महापुरुषांना जोडणारा दुवा म्हणजे कोल्हापूर संस्थानचे अधिपती छत्रपती शाहू महाराज. दि. २६ जून १८७४ रोजी जन्मलेल्या शाहू महाराजांचा मृत्यू दि. ६ मे १९२२रोजी झाला. याचा अर्थ अवघे ४८ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. १८९४ साली त्यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली. म्हणजे केवळ २८ वर्षांच्या कर्त्या आयुष्यात त्यांनी समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रात जे डोंगराएवढे कार्य केले, त्याची तुलना वेगळ्या संदर्भात केवळ छत्रपती शिवरायांच्या युगप्रवर्तक कार्याशीच होऊ शकते. ते कृतिशील म्हणजेच कर्ते सुधारक होते. तसेच ’य: क्रीयावान स पंडित:’ या न्यायाने ते पंडितही होते. पुढील अनेक पिढ्यांना दिशादर्शक ठरेल एवढे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी या छोटेखानी काळात केले. कोल्हापूरचे शाहू महाराज व बडोदे संस्थानचे अधिपती सयाजीराव गायकवाड यांचा अपवाद वगळता भारतातील इतर कोणत्याही संस्थानिकांनी एवढे युगप्रवर्तक, दूरदर्शी व लोककल्याणकारी राज्य केलेले दिसत नाही.


तत्कालीन समाजस्थितीचा विचार केल्याशिवाय शाहूंच्या कार्याचे मोल लक्षात येणार नाही. या समाजव्यवस्थेत मूर्तिपूजा, कर्मकांड आणि जातीयता यांचे बेसुमार तण माजले होते. कर्मठ रूढीने भरलेले धर्माचरण, अंधश्रद्धा, अज्ञान, दारिद्य्र, सामाजिक विषमता आणि अमानुष अस्पृश्यता यांनी जनजीवन नासून गेले होते. ही समाजव्यवस्था जातींच्या उतरंडीवर आधारित होती. त्यात जन्माधिष्टित उच्चनीचता होती आणि भावंडभावनेचा अभाव होता. त्यामुळेच समाजात एकजिनसीपणा व राष्ट्रीय एकात्मता यांचा भाव नव्हता. कनिष्ठ जातीतील व्यक्तीला वरिष्ठ जातीत प्रवेश नव्हता. कारण, जातीव्यवस्था ही कप्पेबंद होती. उच्च वर्णियांची, विशेषतः: ब्राह्मणांची, कनिष्ठ वर्गावर कायम अधिसत्ता होती. या समाजव्यवस्थेत स्त्रियांना सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रात नगण्य स्थान होते. या सर्वात कडी म्हणजे अस्पृश्यता. त्यामुळे अवघे जनजीवन दूषित झाले होते. अशा विपरीत परिस्थितीत प्रबोधनकारांनी व समाजसुधारकांनी आपले बहुमोल कार्य केले. त्यांच्या समोरील आव्हान दुहेरी स्वरूपाचे होते. एका बाजूला समाज जागृतीसाठी विविध मार्गांनी प्रबोधन करायचे व दुसर्‍या बाजूने प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून समाजात सर्वांगीण सुधारणा घडवून आणायच्या. या दोन्ही आघाड्यांवर शाहू महाराजांनी केलेले कार्य क्रांतिकारीच नव्हे, तर अजोड आहे. शाहू महाराज जसे कर्ते सुधारक होते, तसेच ते प्रगतिशील व दूरदृष्टीचे राज्यकर्तेही होते. या नात्याने त्यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय लोकाभिमुख व दूरदर्शी होते. त्यांची त्यांनी आक्रमकपणे अंमलबजावणी केली. त्यामुळे राज्यकारभाराचा आदर्श ते उभा करू शकले. याचाच अर्थ, त्यांनी उभे केलेले कार्य केवळ सामाजिक सुधारणांपुरते मर्यादित नव्हते, तर समाजाच्या सर्वंकष, सर्वसमावेशक (inclusive) व समग्र प्रगतीसाठी आवश्यक असणारी सर्व क्षेत्रे व्यापणारे होते. त्यांच्या या कार्यासाठी साहाय्य्यभूत होणारी बाब म्हणजे, त्यांच्या हातात सत्तेची सर्व सूत्रे होती व त्यातून मिळणारा अधिकारही होता. त्या शक्तीचा त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी रचनात्मक उपयोग करून घेतला, हे त्यांचे मोठेपण. या छोटेखानी लेखात शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा आपण धावता आढावा घेणार आहोत.

समाजस्थितीच्या संदर्भात जमिनीवरील वास्तवाचे अचूक भान व यथातथ्य आकलन शाहू महाराजांना होते, हे त्यांचे वैशिष्ट्य. तत्कालीन सामाजिक परिस्थितीला जातीव्यवस्थेतील विकृती जशा कारणीभूत होत्या, तशीच कनिष्ठ वर्गावर सर्वंकष अधिकार गाजविणारी स्वार्थ मूलक ब्राह्मण्यवृत्तीही कारण होती, हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांचा विरोध ब्राह्मणांना नसला तरी ब्राह्मणशाहीला होता आणि तो मोडून काढणे, हे त्यांच्यासमोरील आव्हान होते. ब्राह्मणेतर कनिष्ठ वर्गाच्या प्रगतीला विरोध करणार्‍या सनातनी मंडळींशी दोन हात करणे आणि जातीव्यवस्थेतील दोष व विकृती दूर करणे, अशा दोन पातळ्यांवर त्यांना संघर्ष करावा लागला. त्यासाठी त्यांनी प्रथमतः ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला व तो आयुष्यभर पाळला. त्यासाठी त्यांनी शाहूपूर्व काळात धार्मिक व सामाजिक क्षेत्रात अडकलेली, महात्मा फुले यांनी स्थापन केलेली, सत्यशोधक चळवळ पुनरुज्जीवित करून अधिक व्यापक व सर्वसमावेशक केली. ही संस्था नव्याने संघटित करून बहुजन समाजात त्याद्वारे जागृती उत्पन्न केली. दुसर्‍या बाजूने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुजन व अस्पृश्य घटकांना शिक्षणाची द्वारे खुली करून दिली. त्यासाठी विविध योजना आखून त्यांची कडक अंमलबजावणी केली. त्याशिवाय या समाजघटकांचे सबलीकरण होणार नाही, तो प्रगती करू शकणार नाही व समाजधारणेत आपले योगदानही देऊ शकणार नाही, याबद्दल त्यांची खात्री पटली होती. म्हणूनच समाजातल्या कनिष्ठ व मागासलेल्या वर्गाचे शिक्षणाद्वारे उन्नयन (Raising up) हे स्वामी विवेकानंदांचे सूत्र त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारात आणले. अस्तित्वात असलेल्या रेषेसमोर तिच्यापेक्षा मोठी रेषा काढून सामाजिक परिवर्तनातील आपला हेतू व कार्यभाग त्यांनी साध्य केला. तत्कालीन समाजस्थितीतील जातीव्यवस्थेतील वास्तव मान्य करून शाहू महाराजांनी जातवार २२ वसतिगृहांची आपल्या कार्यकाळात स्थापना केली. त्यात अठरापगड जातींचा समावेश होता. विशेष म्हणजे ब्राह्मण, मुस्लीम, ख्रिश्चन व स्त्रिया या समाजगटांसाठीही त्यांनी स्वतंत्र वसतिगृहे काढली. जितक्या जातीजमाती असतील, तितक्या प्रमाणात वसतिगृहे सुरु करण्याची महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी अंमलात आणली. त्यासाठी विद्यार्थ्यांना फी माफी, नादारी, विद्यावेतने, माधुकरी यांची योजना केली. आपल्या संस्थानातील व संस्थानाबाहेरील हुशार व होतकरू मुलांना निवडून त्यांनी शिक्षणासाठी कोल्हापुरात आणले. त्यांची शाळा, महाविद्यालये व वसतिगृहात व्यवस्था केली. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी कोल्हापूर संस्थानातच पाठवले होते.
औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी व्यवसाय शिक्षणाला प्रोत्साहन दिले. आपल्या संस्थानात त्यांनी औद्योगिकीकरणाचा पाया घातला. त्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार व्हावे, म्हणून त्यांनी ‘टेक्निकल स्कूल’ तयार केले. सुधारित शेतीपद्धतीचा प्रसार करण्यासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रीकल्चरल इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. तलाठी शिक्षणासाठी ‘तलाठी स्कूल’ सुरु केले. जुन्या राजवाड्यात ‘छत्रपती संस्कृत विद्यालय’ आणि ‘श्री शिवाजी क्षत्रिय वैदिक विद्यालय’ सुरु करून ब्राह्मणेतरांना या विद्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. ब्राह्मणेतरांना पौरोहित्य शिकविण्यासाठी पुरोहित शाळा काढली. एवढेच नव्हे, तर पुणे, नाशिक, नगर, निपाणी येथे शिक्षणसंस्था काढल्या. पुण्याच्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे तर ते अध्यक्षच होते. स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतंत्र शाळा काढल्या. परदेशांत उच्च शिक्षण घेण्यासाठी जशी डॉ. आंबेडकरांना बडोदा नरेश सयाजीराव गायकवाडांनी मदत केली, तशी भरघोस मदत शाहू महाराजांनीही केली. अनेक बुद्धिमान तरुणांना त्यांनी याप्रकारचे साहाय्य केलेले दिसते. “शिक्षण हाच आमचा तरणोपाय आहे, त्याशिवाय कोणत्याही देशाची प्रगती होणार नाही,” असे शाहू महाराजांचे ठाम मत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या, मोफत व सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. त्याच्या अंमलबजावणीसाठी ५०० ते १०००लोकवस्तीच्या गावांत शाळा काढून पगारी शिक्षकांची नेमणूक केली. 1882 साली ‘हंटर कमिशन’ समोर साक्ष देताना, महात्मा फुले यांनी अशी मागणी प्रथम केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी शाहू महाराजांनी पुढे ३० वर्षांनंतर केली. (स्वातंत्र्योत्तर काळात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची घटनात्मक तरतूद करायला एकविसावे शतक उजाडावे लागले. यावरून शाहू महाराजांची दृष्टी काळाच्या किती पुढे होती, हे लक्षात येते.) कराचीपासून धारवाडपर्यंत पसरलेल्या मुंबई इलाख्यात तत्कालीन ब्रिटिश शासन शिक्षणावर जेवढा खर्च करीत होते, त्यापेक्षा जास्त एकटे कोल्हापूर संस्थान करत होते. सुरुवातीला एक लाख रुपये असलेला हा खर्च १९२२पर्यंत तीन लाखांपर्यंत पोहोचला होता. शाहू महाराजांच्या या धोरणात त्यांचे मोठेपण व द्रष्टेपण सामावले आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या या सर्वंकष उपाययोजनांचा परिणाम म्हणजे, त्यांच्या राज्यारोहणाच्यावेळी शासन -प्रशासनात ब्राह्मण व ब्राह्मणेतरांचे प्रमाण 90:10 असे होते, तर त्यांच्या राजवटीच्या अखेरी ते प्रमाण ३०:७० इतके झाले. सामाजिक न्यायाच्या व सम्यक विकासाच्या दृष्टीने हा बदल क्रांतिकारक व लक्षणीय होता. शिक्षण व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे हे साध्य होऊ शकले.शिक्षणाच्या जोडीला जीवनाच्या अन्य क्षेत्रांतही त्यांनी लक्ष घातले. त्यात जलसंपदा, कृषी, उद्योग, सहकार, कला व क्रीडा यांचा समावेश होतो. दुष्काळाच्या संकटावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र पाटबंधारे खाते निर्माण केले. जुन्या विहिरी व तळी यांचे पुनरुज्जीवन केले. नवे बंधारे व तलाव बांधले. त्याकाळी भारतात सर्वात मोठे असणार्‍या राधानगरी या महत्त्वाकांक्षी धरणाचे काम सुरु केले. शेती क्षेत्रात नवनवे प्रयोग करून चहा, कॉफी, कोको, वेलदोडे, रबर अशा अपारंपरिक पिकांना महत्त्व दिले. शेतीवर आधारित उद्योग सुरु केले. त्याला गूळ निर्मिती, औषधी तेल वनस्पती, मधुमक्षिकापालन व काष्टार्क अशा विविध उद्योगांचा समावेश होतो. शेतीमालासाठी ठिकठिकाणी बाजारपेठा तयार केल्या. सुधारित शेतीचा प्रसार करण्यासाठी शेती प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात कापड गिरणी, हातमाग व विणकाम, साखर कारखाना, ऑइल मिल, सॉ मिल, फाऊंड्री, इलेक्ट्रिक कंपनी, मोटार ट्रान्सपोर्ट या उद्योगांना चालना दिली व प्रोत्साहन दिले. प्रशिक्षित कामगार तयार व्हावा म्हणून ‘राजाराम इंडस्ट्रियल स्कूल’ काढले. करवीर नगरीचे उद्योगनगरीत रूपांतर होण्यासाठी जे जे करणे आवश्यक होते, ते ते त्यांनी केले. ‘कोल्हापूर नागरी सहकारी सोसायटी’ची स्थापना करून त्यांनी सहकाराचा पाय घातला. त्यातील लोकसहभागामुळे अर्थकारणाला चालना मिळाली. १९२२ पर्यंत या संस्थानातील सहकारी संस्थांची संख्या २६ पर्यंत पोहोचली व सहकाराचे जाळे विणले गेले. क्रीडा क्षेत्रात कुस्तीसाठी तालमी व मैदाने तयार केली. स्वतः शाहू महाराज कसलेले मल्ल होते. कोल्हापूर संस्थान हे कुस्तीचे माहेरघर मानले जाते. त्यांनी साहसी क्रीडा प्रकारांनाही प्रोत्साहन दिले. तरुणांत साहस, बळ व एकाग्रता वाढावी, यासाठी प्रयत्न केले. नाटक, चित्रपट, गायन व नृत्यकला यांना त्यांनी राजाश्रय दिला. चित्रकला, शिल्पकला यांना त्यांनी प्रोत्साहन दिले. ‘कोल्हापूर’चे रूपांतर ‘कलापुरा’त करण्याचे श्रेय शाहू महाराजांच्या या कलासक्त वृत्तीला जाते. त्यातून रसिक सुसंस्कृत समाजाची जडणघडण कोल्हापुरात होत गेली.


काळाच्या पुढे जाणारे प्रागतिक कायदे करून व त्यांची अंमलबजावणी करून शाहू महाराजांनी कठोर प्रशासकाचाही अनुभव जनतेला आणून दिला. विधवा पुनर्विवाहाला मान्यता, विवाहकाली पुरूषाचे वय १८ व महिलेचे वय १४ असणे, घटस्फोटित महिलांना न्याय, देवदासी प्रथेला प्रतिबंध, हिंदू वारसा कायद्यात सुधारणा, महार वतन खालसा करून वेठबिगारीला पायबंद, सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण, गुन्हेगार जमातींना मुख्य प्रवाहात आणणे, अस्पृश्यता हा दखलपात्र गुन्हा, नोकर्‍यांत मागासवर्गासाठी ५० टक्के राखीव जागा असे अनेक समाजाभिमुख कायदे त्यांनी केले व त्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली. असे प्रागतिक कायदे होण्यासाठी देशाला इतरत्र अनेक वर्षे वाट पाहावी लागली; यातच शाहू महाराजांचे द्रष्टेपण दिसते. ‘राष्ट्रवाद’ आणि ‘समाजसुधारणा’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू, एकाच रथाची दोन चाके आहेत, असे शाहू महाराजांचे स्पष्ट मत होते. ते म्हणतात, ”समाजातील जातीपातींनी यादवी माजविली असून आपापसात अविश्वासाच्या भिंती उभ्या केल्या आहेत. हे चित्र प्रखर राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी कधीही अनुकूल होऊ शकत नाहीत.” १५ ऑगस्ट १९२० रोजी भरलेल्या आर्य छात्र परिषदेत ते पुढे म्हणतात, “ज्या समाजात आपण वाढलो, त्या समाजाच्या उन्नतीची काळजी वाहणे योग्यच आहे. परंतु, त्या समाजाच्या बाहेरही एक फार मोठा समाज आहे. त्याचीही सेवा आपण केली पाहिजे. म्हणून जातीचा अभिमान मर्यादित असावा. आपण सारे एक आहोत, देशाची उन्नती करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याची विस्मृती होऊ देता कामा नये. जातीचा अभिमान हा राष्ट्रकार्यास पोषक असावा; राष्ट्रसेवा, राष्ट्रोन्नती नजरेआड करणारा नसावा.”


राष्ट्रउभारणीच्या संदर्भात आपले अत्यंत मौल्यवान विचार शाहू महाराजांनी हुबळी येथे २७ जुलै १९२० रोजी केलेल्या भाषणात मांडले आहेत. ते म्हणतात, “समाजाची नीतिमत्ता वाढणे हे सामाजिक सुधारणेचे एक महत्त्वाचे अंग आहे. वाईट चालीरीती व धर्मभोळेपणा यांच्या योगाने आमच्यामध्ये मद्यपान, बालविवाह, जुलमाचे वैधव्य, देवास मुली वाहणे असे घातक प्रकार सुरु होऊन त्यापासून शारीरीक, मानसिक व बौद्धिक अवनती झाली आहे. ही अवनती दूर करण्यास आपण उपाययोजना करावी. याबाबतीत शील बनविणे हेच मुख्य कर्तव्य आहे. शीलवान नागरिकांशिवाय राष्ट्र बनणे अगर उदयास येणे या गोष्टी शक्यच नाहीत. शारीरिक उन्नतीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. परंतु, केवळ शारीरिक शौर्य, वीर्य कितीही अंगात असले, तर नीतिमत्तेची अवनती झाल्याबरोबरच रोमसारखी बलाढ्य राष्ट्रेही कशी रसातळास मिळाली, हे आपण विसरता कामा नये.” स्वस्थ समाज व संपन्न राष्ट्र यांच्या निर्मितीची शाहू महाराजांची कळकळ या त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित होते. ‘कथनी’ आणि ‘करणी’ यात अंतर नसलेला, ’बोले तैसा चाले’ या वृत्तीने कृतार्थ जीवन जगलेला हा महापुरुष. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!


- प्राचार्य श्याम अत्रे
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.