१९६५ मधील युद्धकाळात विरोधी पक्षांची भूमिका

27 Jun 2020 21:51:16

 1965_1  H x W:


१९६५ मध्ये पाकिस्तानच्या आक्रमक खुमखुमीला तेवढेच चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्ष असणार्‍या भारतीय जनसंघाने सरकारच्या समर्थनार्थ थेट संसदेवर विराट मोर्चा काढून तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींना सर्व प्रकारचा पाठिंबा राष्ट्रीय भावनेतून आणि नि:संदिग्धपणे कशा प्रकारे व कुठल्या स्वरूपात व्यक्त केला होता, त्याचा पडताळा सद्यःस्थितीत निश्चितच उद्बोधक ठरावा.



भारत-चीन सीमेवर लडाखमधील गलवान खोर्‍यात दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आले आणि त्या झटापटीत आपले २० जवान हुतात्मा झाले. चीनने त्यांच्या मृत सैनिकांची आकडेवारी घोषित केली नसली तरी ही संख्या ४०-५०च्या घरात असल्याचे सांगितले जाते. एकही गोळी, शस्त्रास्त्राचा वापर न करता, भारतीय सैनिकांनी केलेल्या या कारवाईचे करावे तेवढे कौतुक कमीच. पण, दुर्देवाने आपल्या देशात यावरुनही राजकारणाला तोंड फुटले. यंदा इतर पक्षांनी आम्ही पंतप्रधानांसोबत या बिकट प्रसंगी एकदिलाने उभे आहोत, अशी ग्वाही दिली. पण, काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवाराने मात्र या घुसखोरीवरुन उलट पंतप्रधानांवरच वेळोवेळी निशाणा साधला. ‘सर्जिकल स्ट्राईक’, ‘एअर स्ट्राईक’च्या वेळीही जसे प्रश्न सैन्यावर उपस्थित करण्यात आले, तीच बाब यंदाही दिसून आली. त्यामुळे देशातील एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला आपली भूमिका, नैतिकता याचा सर्वोपरी विसर पडलेला दिसतो. त्यानिमित्ताने १९६५ साली भारत-पाकिस्तानच्या युद्धादरम्यान तत्कालीन विरोधी पक्ष असणार्‍या जनसंघाने घेतलेली भूमिका आणि सरकारला दिलेले समर्थन याचे स्मरण करणे क्रमप्राप्त ठरते. १९६५मध्ये पाकिस्तानच्या आक्रमक खुमखुमीला तेवढेच चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्ष असणार्‍या भारतीय जनसंघाने सरकारच्या समर्थनार्थ थेट संसदेवर विराट मोर्चा काढून तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींना सर्व प्रकारचा पाठिंबा राष्ट्रीय भावनेतून आणि नि:संदिग्धपणे कशा प्रकारे व कुठल्या स्वरूपात व्यक्त केला होता, त्याचा पडताळा सद्यःस्थितीत निश्चितच उद्बोधक ठरतो.भारतीय जनसंघाने सर्व मतभेद बाजूला सारून देशावर आक्रमक स्वरूपात संकट आले असता, संसदेवर काढलेल्या ’त्या’ ऐतिहासिक घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार बनून बातमीदारी करताना बापूसाहेब पुजारी लिहितात, “पाकिस्तानच्या आक्रमक भूमिकेला उत्तर म्हणून भारताला पण युद्ध छेडावे लागलेच, तर आपण युद्ध जिंकू शकू का, अशा काहीशा संभ्रमावस्थेत तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री होते.” असे होण्याचे अन्य महत्त्वाचे कारण म्हणजे, त्यावेळी पाकिस्तानने कच्छच्या रणात घुसखोरी व काश्मीरमध्ये उघड युद्ध छेडले होते.


या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी युद्ध करावेच लागल्यास सारा देश पंतप्रधानांच्या पाठीशी एकजूट व ठामपणे उभा राहील, असा ठाम विश्वास निर्माण करण्यासाठी पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय जनसंघाच्या वतीने सरकारला पाठिंबा देण्यासाठी एक लाख कार्यकर्त्यांचा मोर्चा काढण्याची घोषणा केली. मोर्चा यशस्वीपणे हाताळण्याची सर्व सूत्रे स्व. नानाजी देशमुख यांनी स्वीकारली. त्यांनी या राष्ट्रीय मुद्द्यावरील मोर्चामध्ये किमान एक लाख कार्यकर्ते उपस्थित राहतीलच, असा संकल्प सोडला. ठरलेल्या दिवशी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये एक लाखांपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित झाले. जनसंघाच्या त्या मोर्चाची लांबी सुमारे सहा किमी इतकी होती. प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोक्यावर केशरी टोपी व खांद्यावर केशरी झेंडा होता. शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा तो मोर्चा म्हणजे राष्ट्रभक्तांची शोभायात्राच वाटत होती. मोर्चा संसद भवनावर पोहोचला. संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उभारलेल्या व्यासपीठावरून
दिल्लीपती तू जाग रे, तू जाग रे।
तू जाग रे, दिल्लीपती जाग रे॥
अशा प्रकारचा पोवाडा अत्यंत खड्या आवाजात महाराष्ट्र शाहीर योगेश गात होते. व्यासपीठावरून संसदेच्या दर्शनीय भागासह संसद भवनाची गॅलरी दिसत होती. संसदेच्या प्रेक्षागारातील मंडळीच नव्हे, तर आपले आसन सोडून पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण व अन्य मंत्री मोठ्या कुतूहलाने जनसंघाचा मोर्चा पाहत उभे होते. या प्रास्ताविक व स्फूर्तिपर गीतानंतर उपस्थित कार्यकर्त्यांपुढे अटल बिहारी वाजपेयी, भैरोसिंह शेखावत, पं. प्रेमनाथजी डोग्रा व पं. दीनदयाळ उपाध्याय यांची भाषणे झाली. पं. दीनदयाळजींनी संसदेकडे हात करून सरकारला आश्वासन दिले की, “देशाच्या सीमेवर ज्या ज्या ठिकाणी पाकिस्तानने आक्रमण केले आहे, ते हटविण्यासाठी सरकारने जरुर सैन्यदलाचा वापर करावा. कोणताही प्रसंग आला तरी देशाची जनता सरकारच्या पाठीशी सर्व शक्तिनिशी उभी राहिली आहे. ’प्रधानमंत्रीजी, तुम आगे बढो, सारा भारत तुम्हारे साथ हैं’ ही आमची जाहीर घोषणा आहे.” दीनदयाळजींची ही घोषणा ध्वनिवर्धकातून संसद भवनापासून कॅनॉट प्लेसपर्यंत दुमदुमली आणि सार्‍या परिसरातून ’भारतमाता की जय’ असा जयघोष सुरू झाला.




मोर्चा व भाषणे संपल्यावर सर्वत्र कुजबुज सुरू झाली. ठरल्यानुसार एक लाखांवर संख्येत मोर्चा निघाल्याने कार्यकर्ते अर्थातच खुशीत होते. इतक्यात ’बीबीसी’च्या प्रतिनिधीने व्यासपीठावर येऊन विनंती केली की, ‘’मला या ठिकाणी ८ -१०मिनिटे संपूर्ण शांतता हवी. मी बीबीसी-लंडनला या मोर्चाची बातमी लगेच देणार आहे. आम्ही बातमी ‘बीबीसी’वरून लगेच प्रक्षेपित पण करणार आहोत, कृपया शांतता राखावी!” त्या विशाल मोर्चाचे नियंत्रण नानाजी देशमुख यांच्याकडे होते, त्यांनी हा निरोप ऐकला. पं. दीनदयाळांनी त्यांना खुणावून संमती दिली. नानाजी व्यासपीठावर माईकपाशी उभे राहिले आणि चमत्कार घडला. नानाजी माईकवर केवळ एवढेच बोलले, ’‘मी नाना देशमुख बोलतोय! मी माझ्या हाताचे बोट वर केले आहे!” तत्क्षणीच त्या विशाल मोर्चात एकदम व संपूर्ण शांतता पसरली. ’बीबीसी’च्या प्रतिनिधीने आपल्या लंडन मुख्यालयात बातमी सांगितली आणि नानाजींकडे पाहिले. त्यानंतर नानाजींनी एकच शब्द उच्चारला होता, ’‘ऐका!” मोर्चात सामील सर्वांनीच बीबीसी-लंडनने दिल्लीतील जनसंघाच्या यशस्वी व विशाल मोर्चाची थेट बातमी ऐकली. ’बीबीसी’ने प्रसारित केलेल्या ’त्या’ बातमीत शेवटी एक वाक्य आवर्जून व विशेष बाब म्हणून सांगितले होते व ते वाक्य होते- ’ओन्ली वन फिंगर फॉर सायलेन्स!’ यशस्वी मोर्चाच्या दुसर्‍याच दिवशी दिल्लीच्याच सप्रू सभागृहात जनसंघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सुरू झाली.





 व्यासपीठावर पं. दीनदयाळ उपाध्याय, अटलजी, नानाजी, भैरासिंह शेखावत, राजमाता विजयाराजे शिंदे अशी मंडळी उपस्थित होती. प्रतिनिधीसभेत वृत्तनिवेदन सुरू होते. सभेचे संचालन स्वतः दीनदयाळजी करीत होते.त्यानंतर दुसर्‍या दिवशी संसदेत प्रश्नोत्तराच्या काळात तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जी माहिती सांगितली, त्यातलेच काही बारकावे असे होते- काश्मीरला घुसखोरांपासून धोका निर्माण झाला होता, ही गोष्ट खरी आहे. पण, आपल्या संरक्षण दलाच्या तिन्ही विभागांना वेळीच सतर्क केल्यामुळे सैन्यदलाने घुसखोरांचा पूर्णपणे बंदोबस्त केला आहे. याची ग्वाही मी तुम्हालाच नव्हे, तर सार्‍या देशाला देत आहे. काश्मीरच्या धोक्याचा पूर्ण निपटारा करून आता भारतीय सैन्याच्या तुकड्या पाकिस्तान सात किलोमीटर आत घुसून त्यांनी तेथे छावणी टाकली आहे. मी देशाला आश्वासन देतो की, भारत पाकिस्तानबरोबर युद्ध जाहीर करणार नाही, पण पाकिस्तानने आपल्यावर युद्ध लादले, तर भारत समर्थपणे सामोरे जाईल व युद्ध जिंकेल, अशी ग्वाही देशाला देत आहोत.” सभागृह एकदम शांत झाले आणि पुढील सलग पाच मिनिटे लोकसभेत टाळ्यांच्या कडकडाटासह ’भारतमाता की जय’च्या घोषणा देत होत्या.


- दत्तात्रय आंबुलकर
(संदर्भ : ‘राष्ट्रद्रष्टा पं. दीनदयाळ उपाध्याय’ या ग्रंथातील बापूसाहेब पुजारी यांचा ’राष्ट्रहिताचे पाठीराखे - पंडित दीनदयाळ’ हा लेख.)
Powered By Sangraha 9.0