रत्नागिरीच्या आरे-वारेतील कांदळवनांमधून शंखाच्या नव्या प्रजातीचा उलगडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2020   
Total Views |

marine_1  H x W


'नासारियस फुस्कस' या प्रजातीची भारतातून प्रथमच नोंद

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - रत्नागिरीच्या आरे-वारे किनारपट्टीवरुन शंखाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) सागरी संशोधकांना यश मिळाले आहे. कांदळवनांच्या परिसंस्थेमध्ये आढळणाऱ्या या नव्या प्रजातीचे नामकरण 'नासारियस आरेवारेन्सिस' असे करण्यात आले आहे. तसेच याच परिसरातून 'नासारियस फुस्कस' या शंखाच्या प्रजातीची भारतातून प्रथमच नोंद करण्यात आली आहे. या शोधामुळे महाराष्ट्राची तटीय आणि कांदळवन परिसंस्थेमधील जैवविविधता समृद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 
 
 
 
'नासारियस आरेवारेन्सिस'
marine_1  H x W 
 
 
 
 
महाराष्ट्रात वाळूकामय, खडकाळ आणि कांदळवन अशा तीन प्रकारचे किनारे आढळतात. राज्यातील प्रत्येक किनाऱ्याचे जैविकदृष्ट्या वैशिष्ट्य वेगवेगळे आहे. या किनारपट्टीवरच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन नव्या संशोधनांमुळे समोर येत असते. रत्नागिरीच्या किनारपट्टीचे जैविक महत्व शंखाच्या नव्या प्रजातीच्या शोधामुळे अधोरेखित झाले आहे. शंखांमधील 'नासारिडी' या गटातील दोन प्रजातींचा उलगडा आरे-वारे किनारपट्टीवरुन झाला आहे. 'बीएनएचएस'च्या शास्त्रज्ञ सायली नेरुरकर, गौरव शिंपी आणि संचालक डाॅ. दिपक आपटे यांनी आर-वारे येथील कांदळवनांमधून या प्रजातींचा उलगडा केला आहे. यापैकी 'नासारियस आरेवारेन्सिस' ही प्रजात विज्ञानासाठी नवीन असून 'नासारियस फुस्कस' या प्रजातीची भारतातून प्रथमच नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी या शोधाचे वृत्त 'जर्नल आॅफ माॅलस्केन स्टडिज' या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले. 
 
 
 
  'नासारियस फुस्कस'
marine_1  H x W 
 
 
 
भारतात शंखाच्या 'नासारिडी' या गटामधील साधारण ११५ प्रजाती सापडतात. या गटातील प्रजाती वाळूकामय आणि कांदळवनातील दलदलीमध्ये अधिवास करतात. इंडो-पॅसिफिक सागरी परिक्षेत्रात 'नासारिडी' हा गट मोठ्या प्रमाणात सापडतो. 'नासारियस फुस्कस' या प्रजातीची नोंद आजवर मध्य इंडो-पॅसिफिक सागरी परिक्षेत्रातील आॅस्ट्रेलिया आणि थायलॅण्ड या देशांमध्येच होती. मात्र, २०१६ साली आम्ही आरे-वारेच्या किनारपट्टीनजीक असलेल्या कांदळवनांमध्ये सर्वेक्षणासाठी गेलो असता, त्याठिकाणी आम्हाला ही प्रजात आढळल्याची माहिती संशोधिका सायली नेरुरकर यांनी दिली. त्यामुळे या प्रजातीची भारतातून प्रथमच नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचठिकाणी 'नासारियस आरेवारेन्सिस' ही विज्ञानासाठी नवीन असलेली प्रजात देखील आम्हाला सापडली. या दोन्ही प्रजातींचा अधिवास कांदळवनामधून दलदलीच्या दिशेने वाहणाऱ्या पाण्याच्या छोट्या प्रवाहांमध्ये असल्याचे, नेरुरकर म्हणाल्या. आकारशास्त्राच्या आधारे केलेल्या निरीक्षणातून 'नासारियस आरेवारेएन्सिस' ही प्रजात विज्ञानासाठी नवीन असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. या प्रजातीचा आकार १२.८ मिलीमीटर असून 'नासारियस फुस्कस' ही प्रजात २६ मिलीमीटर आकाराची आहे.  महाराष्ट्रामध्ये समृद्ध आणि वैविध्यपूर्ण किनारपट्टी आणि सागरी जैवविविधता आहे. त्यात अधिकाधिक नवीन प्रजाती शोधण्याची क्षमता आहे. सागरी विज्ञान क्षेत्रातील एक समर्पित आणि केंद्रित संशोधन हे निसर्गामध्ये नवीन प्रजाती शोधण्यात आणि महाराष्ट्राच्या सागरी संवर्धनात मोलाची भर घालण्यास मदत करत असल्याचे मत कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेन्द्र तिवारी यांनी मांडले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@