१९९३ साखळी बॉम्बस्फोटातील दोषी युसूफ मेमनचा कारागृहात मृत्यू

    दिनांक  26-Jun-2020 18:00:00
|

yusuf memon_1  


नाशिक :
१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेला युसूफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. या घटनेने अंडरवर्ल्ड जगतात खळबळ माजली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. मृतदेह धुळे येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनचा युसूफ मेमनचा भाऊ आहे. गेल्या २ वर्षांपासून युसूफ मेमन शिक्षा भोगत होता. आज सकाळी त्याचा हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू झाला.


१९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या बॉम्बस्फोटात सुमारे ८०० जणांचा मृत्यू झाला होता. तर काही हजार नागरिक जखमी झाले होते. या भयावह बॉम्बस्फोटाचा सूत्रधार हा टायगर मेमन होता. मेमन हा माहीम येथे राहत होता. त्याच्या घरात शक्तीशाली बॉम्ब बनवण्यात आले होते. यामुळे या खटल्यात टायगर मेमन याचे अख्ख कुटुंब हे आरोपी होते. यापैकी टायगर मेमन अजूनही फरार आहे. तर याकूबला फाशी देण्यात आली आहे. इसा, रुबिना, युसूफ हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. यापैकी युसूफचा आज नाशिक जेलमध्ये हृदय विकाराने मृत्यू झाला आहे

कारागृह प्रशासनाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मुंबईत १९९३साली झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी तथा इब्राहीम मुश्ताक मेमन उर्फ टायगर मेमन आणि याकुब मेमनचा भाऊ असलेला युसुफ मेमन देखील या बॉम्बस्फोटात दोषी आढळून आला होता. औरंगाबाद कारागृहातून युसुफला २०१८ साली नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून तो या कारागृहात शिक्षा भोगत होता. शुक्रवारी सकाळी कारागृहात युसुफला श्वासोच्छवासाकरिता त्रास होऊ लागल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्याला तत्काळ पोलीस वाहनातून कारागृह प्रशासनाने जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; मात्र उपचारादरम्यान युसुफला वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले,अशी माहिती कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. हृदयविकाराच्या झटक्याने युसुफचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.