'मृतांची माहिती कळवा', अन्यथा कठोर कारवाई...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2020
Total Views |


chahal_1  H x W



मुंबई :
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडे ४८ तासांच्या आत कळवणे बंधनकारक आहे. मात्र, अजूनही माहिती न देणाऱ्या रुग्णालयांनी सोमवारपर्यंत माहिती देण्याची शेवटची संधी देण्यात येत आहे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज दिला.




कोरोना मृतांची माहिती खासगी रुग्णालयांकडून योग्य वेळेत मुंबई महानगरपालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडे येत नाही. त्यामुळे भाजपकडून मृतदेह लपवल्याचा राज्य सरकारवर आरोप होत आहे. भाजपच्या आरोपानंतर मृतांच्या संख्येत मागील मृत्यूंची संख्या जमा करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपचा विशेषतः विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सरकारवर भडिमार होत आहे. त्याची दखल पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना घ्यावी लागली आहे. त्यामुळेच त्यांनी खासगी रुग्णालयांना शेवटची संधी दिली आहे.




रुग्णालयांनी सोमवारपर्यंत ही माहिती पालिकेला कळवावी नाहीतर कठोर कारवाई केली जाईल,असा इशाराच इकबालसिंग चहल यांनी दिला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित एका बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, महापालिका रुग्णालयांचे अधिष्ठाता, डॉक्टर यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वारंवार संधी देऊनही माहिती न कळवणाऱ्या रुग्णालयांवर या पुढे ‘साथरोग नियंत्रण कायदा १८९७' नुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची माहिती पालिकेने लपवली नसून रुग्णालयांचे प्रलंबित अहवाल पालिकेकडे उशिराने आल्यामुळे मृत्यूंच्या संख्येत तफावत आढळल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्या पार्श्वभूमीवर, पालिकेने आता मृत्यूंची उशिरा माहिती देणाऱ्या रुग्णालयांना शेवटचा इशारा दिला आहे.



औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करा !


मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये तसेच कोरोना केंद्रांमधील कोरोना रुग्णांना अधिक परिणामकारक वैद्यकीय उपचार मिळावेत याकरिता दर महिन्याला आवश्यक असणाऱ्या औषधांची गरज लक्षात घेऊन टोसिलिझुमॅब, रेम्डेसिल्व्ह यासारख्या औषधांचा महिन्याभरासाठीचा पुरेसा साठा रुग्णालयांनी आपापल्या स्तरावर उपलब्ध करून घ्यावा. औषधे तयार करणाऱ्या उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधून थेट औषधे उपलब्ध करून घ्यावीत,असे निर्देशही आयुक्तांनी रुग्णालयांना दिले.
@@AUTHORINFO_V1@@