पालिकेवर आर्थिक संकट गडद!

26 Jun 2020 18:56:52

BMC_1  H x W: 0



कोरोनामुळे मालमत्ताकर वसुली रखडली; करवसुलीसाठी मनुष्यबळ अपुरे

मुंबई : पालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेली जकात बंद झाल्यानंतर ज्याच्यावर महापालिकेची मदार आहे, त्या मालमत्ताकर वसुलीलाही कोरोनाने खो घातला आहे. मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी कोरोना प्रतिबंधाच्या कामात गुंतल्याने करवसुलीस मनुष्यबळ नसल्याने महापालिकेचा पाय अधिक खोलात रुतला आहे.


पालिकेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मालमत्ता कराची वसुली हाच पर्याय पालिकेकडे उरला आहे. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन वाढत चालल्याने आणि मालमता कराची वसुली रखडल्याने पालिकेचा पाय खोलात चालला आहे. सध्या कोरोनाच्या कामासाठी कामगारांना जुंपल्याने कर वसुलीसाठी मनुष्यबळ नसल्याचे समजते.


पालिकेचा आर्थिकस्त्रोत असलेली जकात बंद झाल्यानंतर प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीवर भर दिला आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मनुष्यबळ कमी असल्याने कर वसुलीचे काम अजूनही ठप्प आहे. मुंबई महापालिकेने मालमत्ता कर जास्तीत जास्त वसूल करण्यासाठी कंबर कसली आहे. चालू आर्थिक वर्षात ५ हजार ५०० कोटी एवढ्या रकमेची वसुली मालमत्ता करापोटी होणे अपेक्षित होते. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत केवळ ३ हजार १५४ कोटी एवढीच मालमत्ता कराची वसुली झाली आहे.


मालमत्ता कराची झालेली अल्प वसुली लक्षात घेता यंदा प्रथमच अचल संपत्ती सोबतच चल संपत्तीवर देखील जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली होती. मालमत्ता कर थकबाकीपोटी दुचाकी, चारचाकी, घरातील फर्निचर, टिव्ही, फ्रीज आदी वस्तूंवर देखील कारवाई करण्याचा धडाका पालिकेने सुरू केला होता. काही ठिकाणी कारवाईही करण्यात आली. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही कारवाई ठप्प झाली आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी कर्मचाऱ्यांचाही तुटवडा असल्याने वसुलीचे काम थांबले आहे. त्यामुळे अपेक्षित वसुलीचे लक्ष्य यंदाही प्रशासनाला गाठता आलेले नसल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे पालिकेवर यंदा आर्थिक संकट गडद होत आहे.




Powered By Sangraha 9.0