थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला...

26 Jun 2020 21:25:54
uddhav_1  H x W



उद्धवजी, आपण वहीपेन घेऊन नव्हे, खासदार राऊतांना, नव्हे संजयला सोबत घेऊन कोरोनाग्रस्त रुग्णांचे व मरणार्‍या रुग्णांचे आकडे लिहीत बसा व शासनाच्या सक्रियतेची स्तुती करा! उगाचच नाही तुम्हाला ‘बेस्ट मुख्यमंत्री’ म्हणून पाचवा क्रमांक मिळाला. ही कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या आकड्यांचीच किंमत आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, “मी कलाकार आहे. तेव्हाच मी मुख्यमंत्री झालो.” आता खरं तर हे वेगळं सांगण्याची मुख्यमंत्री महोदय तुम्हाला तशी आवश्यकताच नाही. कारण, आपण मुख्यमंत्री ‘होताना’ जे जे काही घडलं, तेव्हाच तुमच्यातला ‘कलाकार’ अख्ख्या महाराष्ट्राला गवसला. परंतु, कलाकार वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही नौटंकी करणारे, काही लोकांना हसवणारे सर्कशीतले विदूषक. परंतु, तुम्ही कुठल्या कलेत निपुण आहात, हे आपणच सांगितले तर आपले कौतुक करणे सोपे जाईल. असो.


उद्धवजी, आपण मुख्यमंत्री झाल्या झाल्या देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. निश्चितच ते आपल्यासाठी एक मोठे आव्हान होते आणि आजही आहे. पण, मुंबईमध्ये आपल्या सरकारच्या गलथान कारभार आणि कृपेने तर मृत्यूचे तांडव अजूनही सुरु आहे. कोरोनातून तर आपले मंत्रिगणही सुटलेले नाहीत. त्यांना मोठमोठ्या रुग्णालयांत चांगली पंचतारांकित ‘ट्रिटमेंट’ही मिळाली. परंतु, जे कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करताहेत, जे रात्रंदिवस पहारा देतात, स्वच्छतेची सेवा देता, त्या ‘कोरोना योद्ध्यां’च्या आरोग्याची काळजी कोण घेणार? आज त्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसे ‘पीपीई किट’नाहीत, चांगल्या दर्जाचे मास्कही नाहीत. त्यातच आज कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढती संख्या पाहता, रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना भरती करण्याकरिता पुरेशा बेड्सची सोय नाही. म्हणूनच पोलिसांनाही कोरोना झाला तरी रुग्णालयात बेड नाकारल्याच्या घटना घडल्या आहेत. म्हणून कित्येकांच्या नशिबी पाय घासत घरीच मरण आले. कोरोनामुळे, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने रस्त्यावरच तडफडून मेलेल्यांची तरी गणतीच नाही.


राज्यातील माध्यमांवरसुद्धा शिवसेनेच्या हुकूमशाही पद्धतीने आपण दडपण आणले. एका खर्‍या बातमीसाठी पत्रकाराला पोलीस ठाण्यात पाच-पाच तास बसवून ठेवले, तर एका मोठ्या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका केली म्हणून, १२ - १२ तास पोलीस ठाण्यात बसविले. वारंवार त्यांना त्रास दिला. त्यांच्यावर मानसिक दडपण आणले. हे राज्यातील अघोषित आणीबाणीचे लक्षणच नाही का? आणीबाणीत वृत्तपत्रांवर व प्रसिद्धी विभागावर असेच अंकुश ठेवून त्यांची कोंडी ४५ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती. आपणही सत्य घटना जनतेसमोर येऊ नये, त्याचे गांभीर्य लोकांना कळू नये म्हणून पत्रकारांची तोंड का बंद करत आहात? परंतु, आजचा जमाना सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे जनतेसमोर खरं-खोटं यायला फारसा वेळ लागत नाही, हे मुख्यमंत्र्यांनी आता तरी लक्षात घ्यावे. कारण, ‘कोंबडं झाकलं तरी दिवस उगवायचा राहत नाही.’


राज्यातील ठिकठिकाणच्या कोरोना रुग्णांच्या दुर्दशेच्या बातम्या वाचून, ऐकून तर नुसता अंगावर काटा येतो. आज व्हेंटिलेटरची सोय आवश्यकतेनुसार उपलब्ध नाही. जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरसारख्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे किंवा ऑक्सिजन संपल्यामुळे ४० रुग्ण एका वेळी मरतात, एवढी गंभीर घटना घडते. पण, त्यांची साधी चौकशी नाही की मृतांबद्दल सहानुभूतीही नाही. मुख्यमंत्री महोदय, आपण एकदा ‘मातोश्री’च्या सुरक्षा कवचातून बाहेर येऊन अपुर्‍या वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिकांचा तुटवडा, औषधांची कमतरता याकडे जरा डोळसपणे लक्ष द्या. जीवंत असताना कोरोना रुग्णांची ही अशी दयनीय स्थिती आहे आणि मेल्यावरही होणारे हाल ते वेगळेच. मुस्लीम मृतदेह हिंदूंच्या ताब्यात, हिंदूंचे मुस्लिमांकडे असा सावळागोंधळ. त्यामुळे नातेवाईकांच्या मनात आपण आपल्याच आप्तेष्टावर खरंच अंत्यसंस्कार करतो आहोत का, ही भीती. त्यात रुग्णालयात भरती केलेले रुग्ण हरवणे, पळवून जाणे, कोणाचा मृतदेह सात दिवसांनंतर स्वच्छतागृहात सडलेल्या स्थितीत आढळणे, ही माणुसकीला काळीमा फासणारी कृत्ये आहेत. याबद्दल आपल्याला अजिबात खंत, खेद, संवेदना वाटू नये, याचेच दु:ख वाटते. हिंदुहृदयाचा माणूस इतका कठोर कसा असू शकतो? माणुसकी मेलेल्या माणसासारखा कसा होऊ शकतो, याचेच नवल वाटते.


दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. एक लाखांची रुग्णसंख्या महाराष्ट्राने ओलांडली आहे. त्यातील ८३ हजार रुग्ण एकट्या मुंबई, पुणे, ठाणे परिसरातील आहेत. रोजचा आकडाही तीन हजारांनी वाढतोच आहे. जवळपास देशाच्या ३१ टक्के रुग्ण तर एकट्या महाराष्ट्रात आहेत. मुंबई पोलीस दलातील चार पोलिसांचा नव्हे, तर योद्ध्यांचा एकाच दिवशी मृत्यू होतो. त्यांची नावे घोषित करताना वयही सांगितले असते तर बरे झाले असते. तसे न करता, ‘आम्ही ५० वर्षांवरील पोलिसांना कामावर येऊ नका, घरुन काम करा,’ म्हणून सांगितले, हे स्पष्टीकरण देताना सरकारला नेमके काय स्पष्ट करायचे होते? खोटं बोला, पण रेटून बोला, ही आजच्या सत्ताधार्‍यांची सवयच आहे. पण, आज सरकारी अनास्थेमुळे या पोलिसांचा मृत्यू झाला. त्यांचे कुटुंब पोरके झाले. सरकार त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देईलही. परंतु, त्यांचे आईबाप, पत्नी, मुलं यांना घरचा आधार तुम्ही देऊ शकत नाही. त्यांची चूक एवढीच की, ते पोलीस खात्याचे कर्मचारी होते. त्यांना काही मागण्याचा, सत्य सांगण्याचा अधिकारच नाही. तसे केले तर शासनाकडून त्यांना शिक्षा होते. कारण, एका पोलीस शिपायाने (सिंदखेडराजा येथील असावा) विरोधी पक्षनेत्याकडे तक्रार केली की, “आम्ही २४ तास ड्युटी करतो. परंतु, आमच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत आहे. आमच्याकडे सेफ्टी किट नाहीत. चांगल्या प्रतीचे मास्क नाहीत. आमच्याकडे लक्ष द्या!” विरोधी पक्षनेत्यांना त्याने हे जाहीरपणे सांगितले, ही त्या पोलिसाची चूक ठरावी? लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार असताना, त्याला शिक्षा म्हणून त्याची बदली दूर जंगलक्षेत्रात करण्यात आली. हे सत्ताधार्‍यांना शोभणारे वर्तन आहे का? त्यांना सुविधा द्यायच्या सोडून, उलट शिक्षा करणे हे तर हिटलरी वृत्तीचे दर्शन म्हटले पाहिजे. मग ही शिवसेनेची हिटलरशाही म्हणायची का? ‘तोंड उघडाल तर खबरदार’ असेच चित्र सर्वत्र आहे. आजपयर्यंत कोरोनाग्रस्त पोलिसांच्या मृत्यूंमुळे पोलिसांमध्येही भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण आहे. ही बाब राज्यासाठी आणि सत्ताधांर्‍यासाठी निश्चितच भूषणावह नाही. मुंबईत ८८ दिवसांत ९१ योद्ध्यांचा कोरोनाने मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. काही कृती करता येत नसेल, तर किमान विकृतीचे तरी प्रदर्शन तरी करु नका! आता तर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला माणुसकीचीही आठवण करुन दिली आहे. इतकेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाने वस्तुस्थितीची जाणीव करुन दिली व परिस्थितीत सुधारणा करण्याच्या सूचनाही राज्य सरकारला केल्या. कोरोनाबाधित रुग्णांबद्दलच नव्हे, तर कोरोना या गंभीर आजाराबाबतही पुरेपूर व्यवस्था करण्याची तंबीही दिली. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचे तरी मुख्यमंत्री ऐकतील का? कारण, हे सरकार डोळ्यावर झापडं लावून बसले आहे. त्यांना काय दिसणार? कारण, यांना शिवसैनिकांना, त्यांच्या नेत्यांना आदेश देण्याची, हातपाय तोडून टाकण्याची, धमक्या देण्याची फक्त सवय आहे ना. प्राण्यांपेक्षाही कोरोना रुग्णांचे हाल वाईट आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाने म्हणणे म्हणजे सत्ताधार्‍यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे. परंतु, निर्णय घेण्याची क्षमताच मुळी या शासनात नाही. तीन पक्षाचे हे सरकार! ‘एक रुसले दोन बोलेचिना’ अशी स्थिती. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यासाठी या तीन पक्षांची भांडणं. त्यात काँग्रेस तर जाम नाराज. तिकडे मंत्र्याला न विचारता सचिवच निर्णयाचे, आदेशाचे प्रस्ताव थेट मंत्रिमंडळात आणतात! संवेदना नसलेले, स्वत:च्या स्वार्थाकरिता राजकारण करणारे हे विवेकशून्य सरकार! मुंबईतील करोडो लोकांच्या जीवाशी खेळणारे हे सरकार! कोरोनापासून ना ते महाराष्ट्राला वाचवू शकत आणि मुंबईची तर व्यथाच विचारायला नको.


आता यातून काय तो भगवंतच चमत्कार करुन वाचवेल, अशी भाबडी आशा. नाहीतर उद्धवजी, आपण वहीपेन घेऊन नव्हे, खासदार राऊतांना, नव्हे संजयला सोबत घेऊन कोरोनाग्रस्त रुग्णांचे व मरणार्‍या रुग्णांचे आकडे लिहीत बसा व शासनाच्या सक्रियतेची स्तुती करा! उगाचच नाही तुम्हाला ‘बेस्ट मुख्यमंत्री’ म्हणून पाचवा क्रमांक मिळाला. ही कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या आकड्यांचीच किंमत आहे. आपण कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रथम आहात, तर कोरोनाने मरणार्‍या रुग्णांतही प्रथम क्रमांकावरच आहात. ‘उद्धवा, अजब तुझे सरकार!’

- शोभा फडणवीस
Powered By Sangraha 9.0