नेहरूंनी दिलेले 'चीनी मुक्कु' नाव भारत-चीन संघर्षानंतर बदलणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2020
Total Views |
Neharu_Chini_Mukku _1&nbs




नवी दिल्ली : गलवान घाटीत सुरू असलेल्या भारत चीन विवादामुळे केरळमध्ये एका गावात वेगळीच मागणी जोर धरू लागली आहे. भारत-चीन सीमेवर झालेल्या तणावात २० भारतीय जवान धारातीर्थी पडले. चीनी मुक्कु या गावाने या पार्श्वभूमीवर नाव बदलण्याची मागणी केली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी या गावाचे नामकरण केले होते. स्थानिकांनी हे नाव आता बदलण्याची मागणी केली आहे.


भारत-चीन तणावांनंतर ग्रामस्थांचे म्हणणे आहे, की हे नाव आम्हाला उच्चारताना शरमल्यासारखे वाटत आहे. कोन्नी ग्राम पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या या गावाने नावात बदल करण्यासाठी अर्ज केला आहे. यासाठी ग्रामस्थांनी एक प्रस्ताव तयार केला आहे. कोन्नी पंचायतचे उपाध्यक्ष प्रवीण यांनी पंचायतीत या संदर्भात पत्रक दिले आहे. 


त्यातील उल्लेखानुसार, चीनद्वारे भारताच्या गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या कारनाम्यांमुळे आपले जवान धारातीर्थी पडले. देशात सध्या चीनविरोधातील वातावरण आहे. अनेकांनी चीनी मालावर बहिष्कार टाकण्याची मोहिम सुरू केली आहे. स्थानिक हे नाव बदलू इच्छित आहेत. कोन्नी पंचायत अध्यक्ष, रजनी यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारकडे नावात बदल करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याची तयारी केली जात आहे. सीपीएमसह कुठलाही पक्ष या मागणीला विरोध करणार नाही, अशी आशा त्यांना आहे. हे नाव बददले जावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. 



कसे पडले गावाला चायना मुक्कु नाव ?



कोन्नीमध्ये गेल्या २३ वर्षांपासून राजकारणात असलेल्या काँग्रेस नेते अदूर प्रकाश यांनी या संदर्भात एका वृत्तसंस्थेला माहिती दिली. १९५२ मध्ये ज्यावेळी देशात पहिल्यांदा निवडणूका जाहीर झाल्या. त्या काळात काँग्रेसतर्फे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू केरळमध्ये प्रचार करण्यासाठी पोहोचले होते. पथनमथिट्टा जिल्ह्यातील एका खुल्या जीपमधून ते जात होते. 


चोहोबाजूला काँग्रेसच्या समर्थकांनी झेंडे लावले होते. मात्र, एका गावात केवळ लाल रंगाचे झेंडे दिसू लागले. या भागात कम्युनिस्टांचा पगडा होता. त्यानंतर आपल्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीला नेहरूंनी विचारले हे चीन जंक्शन आहे का ? त्यानंतर या गावाला चीनी मुक्कू असे नाव पडले. आता इतक्या वर्षांनी मात्र, या गावातील नागरीकांनी नाव बदलण्याची मागणी केली आहे.



या संदर्भात सध्या कुठल्याही प्रकारचा ठाम निर्णय झाला नाही. मात्र, पंचायतीत अशाप्रकारचा ठराव संमत करण्यात आला आहे. आता यानंतर पुढील निर्णय राज्य सरकार घेणार आहे. पंचायत पॅनलमध्ये काँग्रेस युडीएफचे बहुमत आहे. एकूण १८ पैकी १३ सदस्य युडीएफचे आहेत पाच सदस्य एलडीएफचे आहेत.







@@AUTHORINFO_V1@@