"सत्तेच्या हव्यासापोटी एका परिवाराने देशात आणीबाणी लागू केली." :अमित शाह

25 Jun 2020 16:06:40

amit shah _1  H



नवी दिल्ली :
देशात १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. आज त्या आणीबाणीला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आणीबाणीवर भाष्य करताना काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले. "45 वर्षांपूर्वी सत्तेच्या हव्यासापोटी एका परिवाराने देशात आणीबाणी लागू केली. एका रात्रीत संपूर्ण देशाचा तुरुंग केला. प्रसारमाध्यमं, न्यायव्यवस्था यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला होता. त्यावेळी गरीबांवर अत्याचारही करण्यात आले होते"असे अमित शाह यांनी ट्विट केले आहे.




आणीबाणीवरून अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "लाखो लोकांच्या प्रयत्नांनंतर देशातून आणीबाणी हटवण्यात आली होती. देशात पुन्हा स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. मात्र काँग्रेसमध्ये काहीही बदललं नाही. एका कुटुंबाचं हित, पक्ष आणि देशहिताच्या वर ठेवण्यात आले. काँग्रेसमध्ये आजही तीच परिस्थिती आहे" असे म्हणत शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.




पुढे त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची सध्या पक्षात घुसमट होत असल्याचेही म्हटले आहे. "काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काही मुद्दे मांडले होते. मात्र ते दाबण्यात आले. काहीही विचार न करता पक्षाने एका प्रवक्त्याची हकालपट्टी केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांची सध्या पक्षात घुसमट होत आहे" असे देखील त्यांनी म्हटले आहे.तसेच काँग्रेसने भारतातील विरोधी पक्षांपैकी एक म्हणून, स्वतःला हे विचारण्याची आवश्यकता आहे की त्यांची आणीबाणीची मानसिकता आताही का कायम आहे?, एकाच घराण्याच्या लोकांना वगळता अन्य नेत्यांना बोलण्याची परवानगी का नाही? आणि काँग्रेसमध्ये नेते निराश का आहेत? असे प्रश्न विचारण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हंटले.

Powered By Sangraha 9.0