सीबीएसई व आयसीएसइ दहावी-बारावीची परीक्षा रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

25 Jun 2020 15:51:40

CBSC_1  H x W:



नवी दिल्ली :
सीबीएसई बोर्डाच्या दहावी व बारावीच्या १ ते १५ जुलै दरम्यान होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सीबीएससी बोर्डाने आपली बाजू कोर्टात मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसई सोबतच आयसीएसइ बोर्डानेही आपल्या दहावी बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द केल्या आहेत.




सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई दहावी व बारावीच्या १ ते १५जुलै दरम्यान होणाऱ्या परीक्षा रद्द केल्या आहेत. काही पालकांनी परीक्षा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर तीन राज्यांनी देखील म्हटले होते की राज्यात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत त्यामुळे सद्यस्थितीत परीक्षा घेतल्या जाऊ शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयात आज यावर सुनावणी होत आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने सीबीएसईला विचारले होते की परीक्षा रद्द करता येतील का? गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना सॉलिसिटर जनरल म्हणाले की, परिस्थिती सामान्य होत असल्यास १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा परत देण्याचा पर्याय मिळेल.



मागील तीन परीक्षांच्या आधारे बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाईल, असेही ते म्हणाले. सीबीएसई बोर्डाने दहावी व बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांच्या हातात निकाल मिळण्याची आशाही वाढली आहे. वास्तविक, सीबीएसई बोर्डाने याआधी लॉकडाऊन होण्याआधी मूल्यांकन करण्यास सुरुवात केली होतीआता उर्वरित परीक्षा रद्द झाल्यानं निकाल लवकर मिळेल अशी अशा विद्यार्थ्यांना आहे. सध्या बर्‍याच शाळांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.



दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांनी परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शविली होती. सीबीएसई बोर्ड शुक्रवारी म्हणजेच उद्या परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती देण्यासाठी अधिसूचना जारी करेल. जुलैच्या अखेरीस मंडळाकडून निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मागील वर्षी १२वीच्या परीक्षेचा निकाल २ मे रोजी जाहीर करण्यात आला होता, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ६ मे रोजी आला होता. दुसरीकडे आयसीएसई बोर्डानेही दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्णपणे रद्द केल्या आहेत. आयसीएसईनेही बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणताही पर्याय देण्यास नकार दिला आहे.
Powered By Sangraha 9.0