आयआयटी-मुंबई विद्यार्थ्याना देणार ऑनलाईन धडे!

    दिनांक  25-Jun-2020 16:33:20
|

IIT Mumbai_1  H


आयआयटी मुंबई ठरली ऑनलाईन अभ्यास सुविधा देणारी देशातील पहिली इंस्टीट्यूट!

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मुंबई हे ६३ वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येत आहे. यंदाचे हे सेमिस्टर मुंबई आयआयटी पूर्णपणे ऑनलाईन शिकवणार आहे. विद्यार्थ्यांना यंदा कॅम्पसमध्ये न येता घरूनच तंत्रज्ञानाचे शिक्षण घेता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आणि त्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नसल्याचे संचालक चौधरी यांनी सांगितले.


कोरोनाच्या संकटामुळे यंदाचे सेमिस्टर पूर्णपणे ऑनलाईन शिकवणार असल्याचे बॉम्बे आयआयटीच्या प्रमुखांनी सांगितले. बॉम्बे आयआयटीच्या पावलावर पाऊल ठेवत अन्य आयआयटीदेखील ऑनलाईन शिक्षणाच्या पर्यायाचा विचार करतील व बॉम्बे आयआयटीचेच अनुसरण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


संस्थेच्या ६३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे की, कॅम्पसमध्ये विद्यार्थी नसताना नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. जुलै ते डिसेंबरपर्यंतच्या सेमिस्टरसाठी बॉम्बे आयआयटीने हा निर्णय घेतला आहे. सिनेटमध्ये दीर्घ विचारविनिमयानंतर, हा निर्णय घेतल्याचे बॉम्बे आयआयटीच्या प्रमुखांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता व त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न घालवता हा निर्णय घेतल्याचे आयआयटी-बॉम्बेचे संचालक चौधरी यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


आयआयटी मुंबईमध्ये असे काही विद्यार्थी आहेत जे गरीब वर्गातले आहेत. या विद्यार्थ्यांना डिजिटल उपकरणे देण्याचे आवाहनही संचालक चौधरी यांनी केले आहे. ते म्हणाले की जमलेल्या निधीतून विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी केले जातील. व्हर्चुअल प्रवेशासाठी इंटरनेट डेटा देखील दिला जाईल. चौधरी म्हणाले, 'पैशाअभावी कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये अडचण येणार नाही. आम्हाला सुमारे ५ कोटी रुपयांची गरज आहे. माजी विद्यार्थ्यांनी चांगली आर्थिक साथ दिली आहे. परंतु, केवळ यावर गरज पूर्ण होणार नाही. म्हणून मी सर्व लोकांना देणगीचे आवाहन केले आहे.'आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.