गोष्ट दोन इंजिनिअर मित्रांची...

    दिनांक  25-Jun-2020 20:42:55   
|
ARAM HOTEL OWNER _1 


बेरोजगारीचं आधीच संकट असताना कोरोनाने त्यात नोकरीवर सरळ घाला घातला. अनेक युवक आज बेरोजगार झाले. या सर्व परिस्थितीत उद्योग-व्यवसाय हाच एक समर्थ पर्याय आहे. अनिकेत-रोहन यांनी काळाची पावलं ओळखली आणि योग्यवेळी उद्योग उभारला.
दोन इंजिनिअर मित्र. अगदी बालपणापासून एकाच वर्गात अन् एकाच बाकावर बसणारे. दरदिवशी एका ठराविक वेळी चहाच्या टपरीवर भेटायचे. एकाने सिव्हील इंजिनिअरिंग पूर्ण केलं, तर दुसर्‍याने मेकॅनिकल. दोघांनी नोकरीसाठी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या, पण नोकरी काही मिळाली नाही. नोकरीपेक्षा आपण काहीतरी वेगळं करुया, स्वत:चा व्यवसाय करुया, जिथे आपणच आपले मालक असू, जेवढी मेहनत घेऊ तेवढे पैसे कमावू, असा दोघांचा निर्धार झाला. व्यवसाय ठरला. हॉटेल व्यवसाय. दोन वर्षांपूर्वी सातार्‍याच्या कराड शहरात सुरु झालेला हा हॉटेल व्यवसाय आज चांगलाच बहरला आहे. ‘आराम २४ हॉटेल अ‍ॅण्ड लॉजेस’ असं त्या हॉटेलचं नाव. अनिकेत कांबळे आणि रोहन कडव हे दोन्ही बालमित्र आज या हॉटेलचे भागीदार आणि संचालक आहेत.


सातारा शहरातील कराड म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण भाग. यशवंतराव चव्हाणांचं कराड म्हणून या भागाची स्वत:ची ओळख. सहकाराची बीजे येथे खोलवर रुजलेली आहेत. कालचक्र बदललं तशा सर्व कार्यप्रणाली बदलल्या. विचारसरणी बदलल्या. सहकाराचं हे तत्त्व मूलभूत मानून आज येथील तरुण भागीदारीत उद्योग-व्यवसाय करु लागला आहे, हे विकासाचं द्योतक आहे. या कराड भागातील नांदगाव हे एक गाव. या गावातील रघुनाथ कांबळे हे पोलीस खात्यात कार्यरत होते. त्यांची पत्नी साधना या गृहिणी. या दाम्पत्यास दोन कन्या आणि एक पुत्र, एक कन्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड महाविद्यालयात प्राध्यापिका तर दुसरी संगणक विषयात पदवीधर. अनिकेत हा सर्वांत लहान मुलगा.

रोहन मूळचा कराडचाच. तो दहावीत असताना दुर्दैवाने त्याचे पितृछत्र हरपले. रोहनच्या वडिलांचा, अनिल कडव यांचा जनसंपर्क चांगला होता. त्यामुळे कराडच्या सामाजिक-राजकीय वर्तुळात त्यांचे चांगले वजन होते. रोहनच्या आईने, भारती कडव यांनी अनिलरावांची कमतरता जाणवू न देता, तिन्ही मुलांना वाढविले. एकीला वकील बनवले. दुसरी लवकरच फिजिओथेरपिस्ट विषयातील डॉक्टर बनेल. रोहन सिव्हील इंजिनिअर झाला.
अनिकेत-रोहन दोघेही कराडच्या टिळक हायस्कूलचे विद्यार्थी. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे. दोघांनी मिळून अनेक खोड्या पण केल्या. दोघांना वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जाऊन तिथल्या डिशेस चाखण्याची भारी हौस. कितीतरी वेगवेगळ्या चवीच्या मिसळ त्यांनी चाखलेल्या आहेत. भाज्यांचे प्रकार अनुभवलेले आहेत. शाकाहारी-मांसाहारी अशा दोन्ही गटात कुठे चांगल्या डिशेस मिळतात, हे यांना चांगलंच माहीत आहे. दहावी झाल्यावर दोघांनी आनंदराव चव्हाण महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. दोघेही उत्तम गुणांनी बारावी उत्तीर्ण झाले. रोहन सिव्हील इंजिनिअरिंगकडे वळला, तर अनिकेतने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विषयाचा पर्याय निवडला.

इंजिनिअरिंगची पदवीदेखील दोघांनी उत्तम गुणांनी प्राप्त केली. पदवी मिळाल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. मुलाखती दिल्या. मात्र, नोकरी काही मिळाली नाही. एका चहाच्या टपरीवर अनिकेत-रोहन दर दिवशी भेटायचे. मित्राचं हॉटेल होतं, पण त्याने ते कधीच गांभीर्याने चालवलं नाही, हे या दोघांना उमजत होतं. ते जर मित्राने नीट चालवलं तर हॉटेलचा व्यवसाय चांगलाच चालेल, यावर दोघांची चर्चाही व्हायची.

एकदा असेच चहाच्या टपरीवर चहा पीत असताना अचानक दोघांना सुचलं की, जर आपणच हॉटेल सुरु केलं तर? मग काय, दोघेही कामाला लागले. मार्केट सर्व्हे केला. नेमकं कशाची गरज आहे, याचा अभ्यास केला. सगळंच शून्यातून करायचं होतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, स्वत:च्या कुटुंबाला राजी करणं, मात्र दोन्ही मुलं हुशार आहेत, प्रामाणिक व कष्टाळू आहेत आणि सर्वांमध्ये महत्त्वाचं म्हणजे, स्वत:चं काहीतरी सुरु करु पाहत आहेत, ही बाजू जमेची ठरली. दोघांच्या घरच्यांनी परवानगी दिली.


कराडमध्ये जागा घेऊन पार्किंग आणि इतर सुविधांसह त्यांनी १० खोल्यांचं ‘आराम हॉटेल आणि लॉजेस’ बांधलं. तळमजल्यावर ५० आसन क्षमता असलेलं रेस्टॉरंट सुरु केलं. पहिल्या माळ्यावर रुम्सची सुविधा निर्माण केली. व्यवसायात शिक्षण कामास आले. रोहनने आपल्या सिव्हील इंजिनिअरिंगचा बांधकामात वापर केला. अनिकेत दररोजच्या हॉटेल व्यवस्थापनेमध्ये आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं कसब वापरु लागला. विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या पंचविशीत हॉटेल व्यवसायात उतरलेले हे दोघेही त्यांच्या कुटुंबातील पहिले उद्योजक आहेत. ११ कर्मचारी सध्या या हॉटेलमध्ये कार्यरत आहेत. सेवा आणि स्वच्छता या दोन्ही घटकांवर भर दिल्याने त्यांच्याकडे ग्राहकसंख्या वाढत आहे. भविष्यात थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. कराड हे औद्योगिक शहर म्हणून झपाट्याने उदयास येत आहे. तसेच ‘एज्युकेशन हब’ म्हणून त्याची वेगळी ओळख आहे. त्यामुळेच या क्षेत्रात होणार्‍या विविध व्यावसायिक परिषदा, सेमिनार्स यासाठी एक अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असे बँक्वेट हॉल सुरु करण्याचा अनिकेत-रोहनचा विचार आहे.

व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकीचा त्यांचा विचार देखील तेवढाच स्पृहणीय आहे. गेल्यावर्षी पश्चिम महाराष्ट्राला महापुराने अक्षरश: धुवून काढले होते. महामार्ग-४ हा महापुरात दिसेनासा झाला होता. त्यामुळे कराडमध्येच ट्रक अडविण्यात आले. नेमके हे ट्रक ‘आराम हॉटेल’ समोर उभे होते. एक हजार ते दोन हजार ट्रक्स १० दिवस उभे होते. या ट्रकचालक आणि क्लिनरची अवस्था दयनीय झाली होती. अशावेळी अनिकेत-रोहन यांनी पुढाकार घेत आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने या ट्रकचालक आणि क्लिनर्सना दहा दिवस सकाळचा नाश्ता आणि पाण्याच्या बाटल्या विनामूल्य पुरवल्या होत्या. इतकंच नाही तर सांगलीतील ५० कुटुंबांना अन्नधान्य, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला होता.


बेरोजगारीचं आधीच संकट असताना कोरोनाने त्यात नोकरीवर सरळ घाला घातला. अनेक युवक आज बेरोजगार झाले. या सर्व परिस्थितीत उद्योग-व्यवसाय हाच एक समर्थ पर्याय आहे. अनिकेत-रोहन यांनी काळाची पावलं ओळखली आणि योग्यवेळी उद्योग उभारला. निव्वळ मैत्री केली नाही तर ती निभावली. अनिकेत-रोहनची ही मैत्री, उद्योगातील भागीदारी आणि उद्योग असाच बहरत राहो!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.