लॉकडाऊन काळात गैरहजर असलेले बेस्टचे ११ कामगार बडतर्फ!

    दिनांक  25-Jun-2020 17:40:54
|

BEST_1  H x W:


प्रशासनाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष; कामगार संघटनाही संतप्त

मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात गैरहजर राहिलेल्या बेस्टच्या ११ कामगारांना बेस्ट प्रशासनाने बडतर्फ केले आहे. या विरोधात कामगार संघटना संतप्त असून त्यांनी बडतर्फी मागे घेण्याची मागणी केली आहे.


जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना प्रतिबंधासाठी २२ मार्च पासून आजतागायत मुंबईसह संपूर्ण देशात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाने निश्चित केल्याप्रमाणे मुंबई, उपनगर, ठाणे इत्यादी जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तेथे जिल्हा व पोलीस प्रशासनाने कडक निर्बंध लादले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्याकरिता बससेवा सुरू होती. आता १५ जूनपासून उपनगरीय रेल्वे सुरू झाली आहे. केवळ बससेवा पुरेशी नसल्याने या कालावधीत कित्येक कर्मचाऱ्यांना केवळ अपुऱ्या प्रवासी साधनांमुळे कामावर उपस्थित राहता आले नाही. काही परिसरात कोरोना बाधित रूग्ण सापडल्याने सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याने अशा भागात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना होम क्वारनटाइन करण्यात आले होते. काही कर्मचारी जिल्हा व पोलिस प्रशासनाने आंतर जिल्हा प्रवासी वाहतुकीस मनाई केल्याने गावी अडकले आहेत.


वय वर्षे ५५ पूर्ण झालेल्या तसेच उच्च रक्तदाब , मधुमेह तसेच इतर गंभीर आजार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होऊन नये म्हणून कामावर न येण्याचा सल्ला देण्यात आला होता. अशा विविध कारणांमुळे लॉकडाऊन कालावधीत जे कर्मचारी कामावर उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्याविरुद्ध बेस्टने नोटिसा बजावायला सुरुवात केली आहे. शिवाय वेगवेगळ्या आगाराच्या सुमारे ११ कामगारांना गैरहजेरीमुळे बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे कामगार संघटनांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेक कामगार आपल्या राहत्या ठिकाणापासून मुंबईत कामावर हजर होऊ शकले नाही. आजही काही कामगार वाहतुकीचे साधन नसल्यामुळे मुंबईत पोहोचू शकत नाहीत. अशा कामगारांनी बेस्ट उपक्रमाला अनुपस्थितीबाबत लेखी स्वरूपात कळविले आहे. असे असताना त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. कामगारांना बाजू मांडण्याची संधी न देता त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करणे गैर आहे, असे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी संपर्क साधला असता, हे प्रकरण काय आहे ते पाहावे लागेल, असे त्रोटक उत्तर त्यांनी दिले.

बडतर्फी मागे घ्यायला लावणार

वेगवेगळ्या आगाराचे ११ कामगार बडतर्फ करण्यात आले आहेत. हे नियमाला धरून नाही. कामगार कुठल्या अवस्थेत आहे याचा प्रशासनाने विचार करायला हवा. निदान त्या कामगाराला बाजू मांडायची संधी तरी द्यायला हवी. बेस्टच्या मनमानीविरोधात सध्या आमची प्रत्येक आगारासमोर वेगवेगळ्या दिवशी मूक निदर्शने होत आहेत. कामगारांवर लादण्यात आलेली नियमबाह्य बडतर्फीही मागे घेण्यास लावू, असे सांगतानाच सत्ताधाऱ्यांच्या संमतीने बेस्टच्या खासगीकरणाचाही हा डाव असू शकतो, अशी साशंकताही बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी व्यक्त केली.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.