ताकीद देऊनही खासगी रुग्णालये पालिकेच्या नियंत्रणबाहेरच!

    दिनांक  24-Jun-2020 15:26:00
|

Private hospitals_1 


सर्वपक्षीय गटनेत्यांनी प्रशासनाला धरले धारेवर

मुंबई : पालिका रुग्णालयांमध्ये तसेच अतिदक्षता विभागात खाटा उपलब्ध आहेत, असे आयुक्त सांगत असले तरी मुंबईकरांना आजही अनेक रुग्णालयात खाटा मिळत नाहीत. खासगी रुग्णालयाकडून सर्वसामान्यांची लूट अद्याप सुरूच आहे. या रूग्णालयांवर पालिकेचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, असा हल्ला मंगळवारी सर्वपक्षीय गटनेत्यांनी चढवला.


पालिकेतील गटनेत्यांची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या बैठकीत पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विविध रुग्णालये व कोरोना केंद्रांमध्ये सध्या सुमारे अडीच हजार कोरोना खाटा सध्या रिक्त आहेत. १,३०० आयसीयू खाटांपैकी ७१ रिक्त आहेत. तर मे महिन्यातील ३,७०० खाटांच्या तुलनेत आता १२ हजार खाटा उपलब्ध आहेत. जूनअखेरपर्यंत १५ हजार तर जुलै अखेरपर्यंत २० हजार खाटा उपलब्ध असतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

 
विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी त्यावर हरकत घेत या संकटाच्या काळात गटनेते पालिकेच्या पाठीशी आहेत, मात्र प्रशासन माहिती देण्यात पुरेशी पारदर्शकता दाखवत नसल्याचा आरोप केला. काही रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत, पण ऑक्सिजन नाही. नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी अनुपस्थित आहेत. त्यामुळे रूग्णांची सेवा करण्यात हलगर्जीपणा होत आहे, असे राजा यांनी सांगितले.

 
गटनेते, स्थायी समितीला अंधारात ठेवून प्रशासन निर्णय घेत असल्याचा हल्ला स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चढवला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका करीत असलेल्या खर्चाची माहिती गटनेत्यांना द्यायला हवी. मुंबईकरांच्या हितासाठी प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता आवश्यक असल्याचे जाधव यांनी सांगितले.


कोरोनावर रेमेडिसीवीर, टॉलिझुमॅब आणि अन्य एक अशी तीन औषधे उपयुक्त ठरत आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पालिकेने ही औषधे खरेदी करावीत व मुंबईकरांचे जीव वाचवावेत, असे आवाहनही रवी राजा यांनी केले आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.