ज्येष्ठ नागरिकांची प्रिस्क्रिप्शनशिवाय घरीच होणार चाचणी

24 Jun 2020 16:24:13

sinior citizens_1 &n



मुंबई :
सत्तर वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रपत्र (प्रिस्क्रिप्शन) शिवाय कोणत्याही वैद्यकीय प्रयोगशाळेकडून कोरोना चाचणी करुन घेता येईल. अशा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत असलेल्या कोणत्याही एका मदतनीसालाही आवश्यक असल्यास चाचणी करुन घेण्याचा पर्याय खुला ठेवण्यात येणार आहे.



कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून वेगवान उपाययोजना केल्या जात आहेत. केवळ संशयित बाधा असलेल्या व्यक्तीच नव्हे तर, बाधा निष्पन्न झालेल्या रुग्णांच्या अत्यंत जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचीदेखील चाचणी करण्याची क्षमता वाढवली जाणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या निर्देशानुसार अतिजोखीम (हाय रिस्क) गटातील व्यक्तींची ५ ते १० दिवसांमध्ये चाचणी करण्यात येते. अशा व्यक्तिंच्या प्रतिदिन सुमारे २ हजार अतिरिक्त चाचण्या आता केल्या जातील. यामुळे सध्याच्या सरासरी साडेचार हजार आणि अतिरिक्त २ हजार अशा सुमारे साडेसहा हजार चाचण्या होतील.



बाधित रुग्णाच्या अत्यंत नजीकच्या संपर्कात असलेल्या (हाय रिस्क कॉन्टॅक्ट) व्यक्ती घरी अलगीकरणात असल्यास, त्यांना आता कोणत्याही वैद्यकीय प्रयोगशाळेतून चाचणी करुन घेण्याचीही मुभा देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रपत्र (प्रिस्क्रिप्शन) शिवायदेखील कोणत्याही वैद्यकीय प्रयोगशाळेकडून कोरोना चाचणी करुन घेता येईल. अशा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत असलेल्या कोणत्याही एका मदतनीसालाही आवश्यक असल्यास चाचणी करुन घेता येणार आहे. तर, डॉक्टरांकडून प्रत्यक्ष वैद्यकीय प्रपत्र (फिजिकल प्रिस्क्रिप्शन) ऐवजी ई-प्रीस्क्रीप्शन मिळाले तरी त्याच्याआधारे देखील नागरिकांच्या घरी जाऊन प्रयोगशाळांना चाचणी करुन घेता येईल, असे निर्देशही आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे चाचण्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
Powered By Sangraha 9.0