गुलामांच्या मालकांच्या घोडचुका

    दिनांक  24-Jun-2020 21:58:26
|

agralekh _1  H१९६२च्या युद्धात भारतीय सैन्याला बाबा आदमच्या जमान्यातल्या हत्यारांनिशी चिनी सैनिकांशी लढावे लागले. इतकेच नव्हे तर ‘अक्साई चीन’ हा भूभाग चीनने गिळंकृत केल्यानंतर तिथे गवताचे पातेही उगवत नाही, अशाप्रकारे ‘सरेंडर’ होण्यात नेहरुंनी धन्यता मानली. असे असूनही आपल्या मालकांनी कितीही घोडचुका केलेल्या असल्या तरी गुलाम आमचीच लाल म्हणत टाळ्या पिटताना दिसतात.चीनबरोबर साधारणतः दीड महिन्यापासून पँगाँग सरोवर व गलवान खोर्‍यात उद्भवलेल्या सीमासंघर्षादरम्यान सोनिया गांधी-राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या काँग्रेसच्या मालकांनी सातत्याने विघातक वक्तव्ये केली. चीनने भारताची जमीन हडपली, चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली, चिनी सैनिकांशी झालेल्या झटापटीत चीनचा एकही सैनिक मारला गेला नाही आणि अशाचप्रकारे देशविरोधी, सैन्यविरोधी विधाने करत तिन्ही गांधींनी भारतवासियांच्या, सैन्याच्या मनोबलाला सुरुंग लावण्याचे प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेतृत्व सीमावादासंदर्भात देशाला अंधारात ठेवत असल्याचे सांगत आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे कामही त्यांनी केले. स्वतःचे राजकारण चमकावण्यासाठी सीमावादाचा वापर करुन घेता येईल, असा यामागे काँग्रेसचा डाव होता. मात्र, गांधी घराण्याच्या दाव्यांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचे आणि त्यांनी केवळ राजकारणासाठीच हे आरोप केल्याचे वेळोवेळी उघड झाले. बुधवारीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गांधींना आरसा दाखवत त्यांच्या पूर्वजांच्या करतुती समोर आणल्या. आज सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी चीनने अमूक केले, तमूक केले म्हणून तावातावाने बडबडताना दिसतात. पण आपल्या पणज्याने, आजीने, वडिलांनी आणि आपण स्वतः काय दिवे लावून ठेवलेत, हे त्यांना दिसत नाही, आठवत नाही. आपला मालकच असा म्हटल्यावर काँग्रेसी गुलामही बुद्धीचा वापर करण्याऐवजी फक्त हांजी हांजी करण्यातच धन्यता मानतात. अर्थात, गुलामांच्या धडावर त्यांचे डोके नाही आणि जरी डोके असले तरी त्यातल्या मेंदूने कधीचेच गांधी-नेहरु चरणी लोटांगण घातलेले आहे. परिणामी, आपल्या मालकांनी कितीही घोडचुका केलेल्या असल्या तरी ते आमचीच लाल म्हणत टाळ्या पिटताना दिसतात. नड्डा यांनी ट्विटरवरुन गुलाम आणि त्यांचे वर्षानुवर्षे मालक राहिलेल्यांच्या अशाच कुकृत्यांकडे लक्ष वेधले.
भाजपाध्यक्षांचा रोख स्वातंत्र्यापासून गांधी-नेहरु खानदानाने केलेल्या अक्षम्य पापांकडे होता, ज्यामुळे आज पाकिस्तान किंवा चीनसारख्या शेजार्‍यांच्या तोंडात भारताचा एक एक लचका गेल्याचे दिसते. ज्यांच्यामुळे भारतच नव्हे तर ब्रह्मांड अस्तित्वात आले, असे म्हणायलाही काँग्रेसी गुलाम कमी करणार नाहीत, त्या जवाहरलाल नेहरुंचा या कुकृत्यांत सिंहाचा वाटा आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानशी झालेल्या युद्धावेळी भारतीय सैन्याने बलुचिस्तानपर्यंत धडक मारली होती आणि तिथल्या जनतेची भारतात सामील होण्याची इच्छा होती. पण, नेहरुंनी शांतीची कबुतरे उडवत शस्त्रसंधी केली व तिथल्या जनतेच्या आशा-आकांक्षेवर पाणी फेरले. दरम्यानच्या काळात पाकिस्तानने गुलाम काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानवर कब्जा केला होता, पण तो भाग परत मिळवण्यासाठी ना नेहरुंनी कणखरपणा दाखवला ना त्यानंतरच्या काँग्रेस सरकारांनी. उलट जवाहरलाल नेहरुंनी जम्मू-काश्मीरला कलम ३७०लागू करत दोन देशांतील मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेण्याचा प्रताप केला.


इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे केले. मात्र, ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतासमोर समर्पण केले, तेव्हा त्यांच्याकडे पाकव्याप्त काश्मीर व गिलगिट-बाल्टिस्तान ताब्यात घेण्याची संधी होती, पण त्यांनी तीही गमावली. नेहरुंनी चीनबाबतही बोटचेपेपणा किंवा भाबडेपणा बाळगला. प्रारंभी अमेरिकेच्या विनंतीनंतरही संयुक्त राष्ट्रांतील सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व स्वतःकडे घेतले नाही व नंतर हिंदी-चिनी भाई भाई आणि पंचशील कराराच्या नावाखाली गाफिल राहणे पसंत केले. त्यातूनच १९६२ सालच्या युद्धात भारतीय सैन्याला बाबा आदमच्या जमान्यातल्या हत्यारांनिशी चिनी सैनिकांशी लढावे लागले. इतकेच नव्हे तर ‘अक्साई चीन’ हा भलामोठा भूभाग चीनने गिळंकृत केल्यानंतर तिथे गवताचे पातेही उगवत नाही, अशाप्रकारे ‘सरेंडर’ होण्यात नेहरुंनी धन्यता मानली. आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात जवाहरलाल नेहरुंनी देशसुरक्षा धाब्यावर बसवणारे आणखी दोन उद्योग केले. ते म्हणजे अंदमान-निकोबार बेटांजवळील कोको बेटे म्यानमारला ‘गिफ्ट’ दिली आणि मणिपूरच्या काबू व्हॅलीचा प्रदेशही नेहरुंनी म्यानमारला मैत्रीखातर दिला आणि आज चीन त्यांचाच वापर भारताविरोधात करत असल्याचे दिसते.


सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना कदाचित हे आठवत नसेल, पण श्रीलंकेत शांतीसेनेच्या नावाखाली भारताच्या १ हजार ६००पेक्षा अधिक सैनिकांना मृत्यूच्या जबड्यात लोटण्याचे काम तर राजीव गांधींनीच केले होते. स्मरणशक्तीला अजिबात ताण द्यायचा नसेल तर गांधी माय-लेकरांनी ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी संपुआ सरकारच्या काळात संसदेत दिलेले उत्तर तरी पुन्हा एकदा ऐकावे, पाहावे. “सीमाभागात पायाभूत सुविधांच्या उभारणीकडे आम्ही लक्ष दिले नाही, कारण अविकसित सीमा अधिक सुरक्षित असतील,” असे आमचे धोरण असल्याचे म्हणताना हा इसम त्यात दिसतो. विशेष म्हणजे, तेव्हा सोनिया गांधीच मनमोहन सिंग यांच्या आडून देशाचा कारभार पाहात होत्या. त्यामुळे अशाप्रकारची सीमासुरक्षा आपणच एकेकाळी करत असल्याचे समजायला त्यांना वेळ लागणार नाही. इतकेच नव्हे तर २००६ साली जगातील सर्वाधिक उंचावरील समरभूमी सियाचीन ग्लेशियर गमावण्याची वेळही काँग्रेसनेच आणली होती. सोबतच २००८ मध्येच काँग्रेसने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी करार केला होता, तो कशासाठी याचे उत्तर आता तरी गांधींनी द्यावे.


त्याचबरोबर राहुल गांधी यांनी अगदी अलीकडे डोकलाम वादावेळी चीनच्या राजदुताची अंधारात लपतछपत भेट घेण्याचे कामही केले होते, त्याचेही स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. अर्थातच गांधी घराणे यापैकी कुठल्याही मुद्द्यावर क्षणभरही बोलू शकणार नाही, कारण त्यासंदर्भातील कसलेही उत्तर त्यांच्याकडे नाही. पण, तेच आज मोदी सरकारवर टीका करताना आणि सैन्यावरही अविश्वास दाखवताना दिसतात. अशाच उद्योगांमुळे त्यांना जनतेने एकदा नाही दोनदा झिडकारले, तरी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडल्याचे दिसत नाही. राजघराण्याचे असेच असते, काप गेले तरी भोके राहतात, सत्ता गेली तरी तोरा कायम राहतो. सर्वपक्षीय बैठकीत इतर सर्वच पक्ष सरकार आणि सैन्याच्या मागे खंबीरपणे उभे असताना काँग्रेस पक्ष तिथेही विरोधाचेच राजकारण करतो. पण काँग्रेसने एक लक्षात घ्यावे, गांधी घराणे म्हणजे संपूर्ण विरोधी पक्ष नाही, एका घराण्याचे हित म्हणजे देशहित नाही. अन्य पक्षही भाजपविरोधात आहेत, पण देशसुरक्षेच्या विषयात ते सरकार आणि सैन्याबरोबर आहेत. त्यामुळेच काँग्रेसने सरकार व सैन्यावर तथ्यहीन टीका टाळावी; अन्यथा ‘बात निकली तो दूर तक जाएगी’ आणि तेव्हा काँग्रेसींची पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.