आयुक्तांची बदली करून दोन्ही मंत्र्यांना मोकळे सोडले!

    दिनांक  24-Jun-2020 16:00:42
|

niranjan_1  H x
 

भाजपा आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांची टीका

ठाणे : मुंबईत आयुक्त बदललेत, तर मग ठाण्यात पालकमंत्री बदलणार का?, या भाजपा नेते आशिष शेलार यांच्या सवालाची दखल घेऊन, राज्य सरकारने ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची तडकाफडकी बदली करून, पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोकळे सोडले, अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची अवघ्या ३ महिने ३ दिवसांत ठाण्यातून बदली करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आयुक्तांनाच जबाबदार धरण्यात आले. मुंबईत आयुक्त बदललेत, तर मग ठाण्यात पालकमंत्री बदलणार का, असा सवाल गेल्या १५ जून रोजी भाजपाचे नेते व आमदार आशिष शेलार यांनी केला होता. या सवालाचीच दखल घेत राज्य सरकारने पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठपका येण्याआधीच आयुक्तांना अपयशाचे वारसदार ठरविले, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली.


पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण आहेत. महापालिकेकडून मुंब्रा येथील मृतांची नोंद कमी केली जाते. आपल्या स्वत:च्या मतदारसंघात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात दोन्ही मंत्री अपयशी ठरले. मात्र, त्यांना महाविकास आघाडी सरकारने अभय दिले आहे, अशी टीका आमदार डावखरे यांनी ट्विटरद्वारे केली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.