आणीबाणी एक अत्याचारच !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2020
Total Views |
Ramesh-Gaidhani_1 &n




जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारताच्या भाळी आणीबाणीच्या रूपाने काळा कलंक लागला होता. विचार, आचार यांचे स्वातंत्र्य नागरिकांच्या जीवनातून हद्दपार करण्यात आले. तेही केवळ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वैयक्तिक अहंकार जोपासणे कामी आणि सत्तालोलुपपनासाठी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांनी अनुभवलेली आणीबाणीची दाहकता आणि नाशिकमध्ये आणीबाणी विरोधी झालेले कार्य, याची आज आणीबाणीला ४५ वर्षं पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रमेशदादा गायधनी यांनी आणीबाणी काळातील व्यक्त केलेले अनुभव...





अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या विरोधात निकाल दिला म्हणून व्यक्तिगत नफ्यासाठी उपयोगात आणलेले अत्याचाररुपी शस्त्र म्हणजे आणीबाणी, असेच आणीबाणीचे वर्णन योग्य आहे. इंदिरा गांधी यांनी आपले पंतप्रधानपद टिकावे यासाठी लाखो लोकांचे आयुष्य, विचार यांना तिलांजली दिली. त्यामुळे अनेकांचे संसार आणि आयुष्य उद्ध्वस्त झाले. लोकशाहीचा गळा घोटणारी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातील काळी घटना म्हणून मी आणीबाणीकडे पाहतो. कारण, ‘मिसा’अंतर्गत तुरुंगवास मी व माझे काका डॉ. त्र्यं. ग. गायधनी आणि अनेकांनी भोगला आहे. ५ जानेवारी १९७६ रोजी माझे अटक वॉरंट जारी करण्यात आले आणि १७ जानेवारी १९७६ रोजी मला अटक करण्यात आली.

वॉरंट जारी करण्यात आलेल्या दिनांकापासून ते प्रत्यक्ष अटकेपर्यंत पोलिसांना माझा सुगावा लागत नसल्याने मला अटक झाली नाही. ‘रमेश गायधनी’ म्हणून माझी नेमकी ओळख ही माझी दुचाकी होती. ती मी वेगळ्या ठिकाणी उभी करत असल्याने आणि वेळप्रसंगी पदस्त भ्रमंतीमुळे माझा सुगावा पोलिसांना लागू शकला नाही. सुमारे १२ पोलीस मला अटक करण्यासाठी दाखल झाले होते. देशात सत्तांतरण होऊन इंदिरा गांधी यांचे सरकार जात नाही आणि ‘मिसा’ रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही ‘मिसानगर’ म्हणजे नाशिक रोड कारागृहात बंदी होतो.

‘मिसा’अंतर्गत जे बंदी होते, त्यातील अनेकांचे आयुष्य आजही ४५ वर्षांनंतर पूर्वपदावर आलेले नाही. ते लोक भक्कमपणे उभे राहू शकलेले नाही. उदाहरणच द्यावयाचे झाल्यास, नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेते असणारे अण्णा गजभार यांची विस्कटलेली आर्थिक घडी अजूनही बसलेली नाही. सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर जे सर्वसामान्य लोक, त्यावेळी ‘मिसा’अंतर्गत कारागृहात गेले होते. त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन इतर लोकांच्या मनातून जाता जात नसल्याचे नंतरच्या काळातदेखील दिसून आले. ज्या घरातील व्यक्ती तुरुंगात गेली आहे, त्या व्यक्तीच्या घरासमोरून जात असतानादेखील नागरिक चेहरा फिरवून जात असत. कारण, केवळ भय! तुरुंगात गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांशी बोललो तर आपणदेखील कारागृहात जाऊ, इतकी पराकोटीचे भय इंदिरा गांधी यांनी देशात निर्माण केले होते. याची दाहकता आम्ही नाशिकमध्ये पदोपदी अनुभवली आहे.




arrest warrant_1 &nb


‘राजबंदी’ म्हणून ‘मिसा’अंतर्गत अटक करण्यात आलेल्या काहींचा झालेला शारीरिक छळ आजही ४५ वर्षं सरली तरी, डोळ्यात पाणी आणतो. मराठवाड्यातील भास्कर ब्रह्मनाथकर आणि माधव गंगोत्री या स्वयंसेवकांना झालेली मारहाण आजही आठवते. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या सभेत सत्याग्रह केला, म्हणून त्यांना पोलिसांनी ‘अमानुष’ हा शब्दालाही लाजवेल इतकी मारहाण केली. अशा प्रकारची हिंमत येते कुठून, हा प्रश्न आजही मनाला सलत आहे. या मारहाणीमुळे त्यांना कायमची शारीरिक व्याधी जडली.

 
आज काही लोक अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे मत मांडतात. अभिव्यक्तीची आणि जीवन जगण्याच्या  स्वातंत्र्याची खरी गळचेपी ही तर आणीबाणी होती. इंदिरा गांधी यांच्या विरोधात एकही शब्द न काढणे, देशातील स्थितीची माहिती होऊच नये म्हणून वृत्तपत्रांवर बंदी अशा प्रकारे गळा घोटणारी स्थिती देशावर लादत इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची लक्तरे बाहेर काढली होती. सध्या ‘भारताचे तुकडे झाले पाहिजे’ इथपर्यंतची भाषा वापरली जाते. तेव्हा हाच प्रश्न निर्माण होतो की, सध्याच्या काळात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी कशी होत आहे?

रविवार कारंजावरील आमचा वाडा हा आणीबाणीशी संबंधित अनेक घटनांचा साक्षीदार आहे. मी नुकताच माझा इलेक्ट्रिकचा व्यवसाय सुरु केला होता. त्याचे अतोनात नुकसान या काळात झाले. कुटुंबातील दोन कमावते पुरुष मी व माझे काका, असे दोघेही तुरुंगात असल्याने कुटुंबाला प्रचंड आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र, आमच्या घरातील महिलांनी या काळात उत्तम सहकार्य करत घराचा पाया मजबूत ठेवला. पापड, चटणी, कुरड्या, अनारसे पीठ विकून घरातील महिलांनी उदरनिर्वाह केला. चार बहिणींनी सकाळी महाविद्यालयात शिक्षण व दुपारी फॉल-पिको असा दिनक्रम आखत भार उचलला. पूर्वी समारंभात बत्तासे वाटप होई. त्यासाठी लागणारे रंगीत आवरण तयार करण्याचे कामदेखील घरातील सर्वच महिलांनी केले. घराचा एक भाग गरज नसताना भाडेतत्त्वावर द्यावा लागला. अशाही स्थितीत नाशिक रोड येथे आपल्या ‘मिसाबंदी’ नातलगांना भेटावयास येणारे १५ ते २० माणसे गायधनी वाड्यात हक्काने निवासास येत. आणीबाणी ही अनपेक्षित होती, ती लोकशाहीच्या मुळावर होती. म्हणून रा. स्व. संघाचा आणीबाणीला विरोध होता. त्यामुळे या काळात सर्वात जास्त बंदी हे संघाचे स्वयंसेवक होते. भारतीय लोकशाहीच्या सुवर्णपर्वातील काळा काळ आणीबाणीच्या रूपाने इंदिरा गांधी यांनी लिहिला असेच वाटते.





रमेशदादा गायधनी







(लेखक रा. स्व. संघ, नाशिकचे पूर्व जिल्हा कार्यवाह आणि हिंदुस्थान प्रकाशन, दिल्लीचे सदस्य आहेत.)

























@@AUTHORINFO_V1@@