आणीबाणीच्या विरोधातील संघर्षात नाशिक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2020
Total Views |

anand pathak_1  



दि. २५ जून, १९७५ च्या मध्यरात्री देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीमुळे नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार गोठविण्यात आले. त्यामुळे देशात आणीबाणीच्या रूपाने दडपशाहीचा वरवंटा देशावर फिरु लागला. दि. १ ऑगस्ट, १९७५ रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सार्वजनिक वाचनालय, नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकाणी प्रदीप मुळे या अकरावीतील विद्यार्थ्याने ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ या लो. टिळकांच्या अग्रलेखाची पत्रके वाटली आणि आणीबाणी विरुद्धच्या लढ्याचे रणशिंग फुंकले.



दि. २५ जून, १९७५ च्या मध्यरात्री देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीमुळे नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार गोठविण्यात आले. त्यामुळे देशात आणीबाणीच्या रूपाने दडपशाहीचा वरवंटा देशावर फिरु लागला. दि. १ ऑगस्ट, १९७५ रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सार्वजनिक वाचनालय, नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकाणी प्रदीप मुळे या अकरावीतील विद्यार्थ्याने ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ या लो. टिळकांच्या अग्रलेखाची पत्रके वाटली आणि आणीबाणी विरुद्धच्या लढ्याचे रणशिंग फुंकले. यानंतर पत्रके वाटणे, पोहोचविणे, वितरीत करण्याचा धडाकाच सुरु झाला. घरात, बाजारात, रिक्षात, बसमध्ये, बस स्थानकांवर, कंपन्यांच्या द्वारावर, यात्रेत जिथे जमेल तिथे पत्रक वाटली जात होती. त्यावेळी बस वाहतूक रविवार पेठेतून होत असल्याने व तेथे बसचा वेग कमी होत असल्याने बसच्या खिडकीतून पत्रके आत फेकण्याचे काम आम्ही केले. तेव्हा भद्रकालीहून नाशिक रोडसाठी बसे सुटत असे. रिकाम्या उभ्या असलेल्या बसमध्ये प्रत्येक सीटवर पत्रक ठेवणे व नंतर प्रवासी त्या बसमध्ये बसल्यावर व त्यांनी पत्रके वाचली की त्यांच्या प्रतिक्रिया पाहणे हे आमचे काम असे. हाच प्रकार सीबीएस येथीहीही होत असे. काही वेळेस पत्रके उधळण्याचाही कार्यक्रम करण्यात आले. चालत्या रिक्षात पत्रके टाकण्यातदेखील स्वयंसेवक आघाडीवर असे. त्याचप्रमाणे आणीबाणीविरोधी पोस्टर गावभर चिकटविणे हेदेखील चालू होते.




रात्री पोलिसांची गस्त कडक असल्याने हा कार्यक्रम संध्याकाळी करण्यावर भर देण्यात आला होता. यासाठी पोस्टर तयार करणे हे महत्त्वाचे काम बाळ गायधनी यांच्या घरी होत असे. त्यासाठी आवश्यक साहित्य जमविणे, तसेच पोस्टर चिकटविण्यासाठी खळ मिळविणे किंवा तयार करणे, हे देखील मोठे काम होते. तीन-चारच्या गटांनी शहराच्या विविध भागात जाऊन भिंतीवर, खांबांवर जिथे जागा मिळेल, तिथे पोस्टर चिकटविले जात. यासाठी सांघिकरित्या काम करत असू. पोस्टर चिकटविण्यात व पत्रके वाटण्यात माझ्याबरोबर नेहमीच राजू लेले, राजू तांबट व रमाकांत कुलकर्णी हे असायचे. भिंतीबरोबरच एखाद्या रात्री रस्त्यावरच पोस्टर चिकटवली जात. त्यातूनच रस्त्यावर आणीबाणीविरोधी घोषणा रंगविण्याचे ठरले. त्यासाठी ऑईल पेंट, ब्रश रंगासाठी डबे इ. व्यवस्था करण्यात आली व एक दिवस रात्री रस्ते रंगविण्यात आले. त्यावेळी मात्र पोलिसांशी लपाछपीचा खेळ खेळावा लागला. रस्त्यावर पोस्टर चिकटविल्यावर आणि रस्ते रंगविल्यावर दुसर्‍या दिवशी ते पोलिसांकडून धुण्याचा कार्यक्रम होत असे. त्यामुळे गर्दी होऊन आमचा उद्देश सफल होत असे. याच दरम्यान १४ नोव्हेंबरपासून सत्याग्रह सुरु झाला होता. राजाभाऊ गायधनींच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम निश्चित केला. ‘मधुकर’, ‘दामोदर’, ‘प्रभात’ व ‘हेमलता’ या चित्रपटगृहात दि. ३१ डिसेंबर, १९७५ रोजी मध्यंतराच्यावेळी बाल्कनीतून पत्रके खाली फेकायची व निघून यायचे असे ठरले. त्यानुसार मी, राजू तांबट, राजू लेले व रमाकांत कुलकर्णी यांनी ‘मधुकर’ चित्रपटगृहात ‘मिली’ चित्रपट पाहण्याच्या निमित्ताने प्रवेश केला.



मध्यंतराच्या वेळी दिवे लागण्यापूर्वी एक क्षणभर अंधार पडतो. त्यावेळी पत्रके आम्ही उधळली. ती थेट चित्रपटगृहाच्या मध्यापर्यंत आणि पंख्याच्या हवेमुळे सर्वत्र पसरुन खाली गेली. मध्यंतरानंतर निघून जाण्याऐवजी आम्ही पूर्ण चित्रपट पाहण्याचे ठरविले. संपूर्ण चित्रपट पाहून आम्हीही सुखरुप सुटलो. दुसर्‍या दिवशी समजले की, आम्हाला पकडण्यासाठी पोलीस तेथे नियमित चित्रपट सुटण्याच्या वेळेनुसार गेले होते. राजाभाऊ गायधनींनी आम्ही २ जानेवारी,१९७६ला सत्याग्रह करावा, असे सांगितले होते. मात्र, ध्रुव शाखेची स्थापना दि. ५ जानेवारीची असल्याने विनंती करून आम्ही त्याच दिवशी सत्याग्रह केला. त्यानुसार मोदकेश्वर मंदिरात जमावयाचे व तेथून जुने नाशिक परिसरात बॅनर घेऊन पत्रके वाटत आणीबाणीविरोधी घोषणा देत सत्याग्रह करायचे ठरले. घरुन परवानगी मिळणे शक्यच नसल्याने घरात निरोपाची चिठ्ठी ठेवून बाहेर पडलो. मोदकेश्वर मंदिरात मी, बाळ गायधनी, कुमार पाठक, यतिश चिटणीस, संजय दीक्षित, राजू तांबट, प्रदीप मुळे, रमाकांत कुलकर्णी व राजू लेले असे नऊ जण जमलो होतो. यात बाळ २४ व मी २० वयाचे सोडले, तर बाकी सर्व १६ -१७ वर्षांचे होते. राजू लेले हा सर्वात लहान फक्त १५ वर्षांचा होता. हाती फलक घेऊन पत्रके वाटली. आम्ही आणीबाणी विरोधी घोषणा देत निघालो. चौक मंडई परिसरात एक पोलीस होता. पण, आम्ही नऊ जण असल्याने तो गोंधळला. त्याने राजू तांबटला पकडले व त्याच्या हातातील पत्रके घेतली. तेवढ्यात यतिश चिटणीसने ती पत्रके त्याच्या हातातून हिसाकावून उधळून दिली.



पण, पोलिसाने राजू तांबटला धरुन चालविले. मग मी झटकन निर्णय घेत बाळ गायधनीला राजू तांबट बरोबर जाण्यास सांगितले व मी इतरांसह सत्याग्रह पुढे सुरु ठेवला. सत्याग्रह पाहण्यास आमच्या मागे असलेल्या बालस्वयंसेवकांनी उज्वल केळकर वगैरे. रस्त्यावर पडलेली पत्रके गोळा करून पुन्हा माझ्या हातात आणून दिली. आम्ही फुले मंडई येथे कॉर्नर मीटिंग ही घेतली. तेवढ्यात पोलीस आले व आम्हाला पकडून सरकारवाड्यात घेऊन गेले. सरकारवाड्याच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणांचा आवाज आला आणि बाळ गायधनी व राजू तांबटही आले. त्यानंतर त्या रात्री प्रत्येकाच्या घराच्या झडत्या झाल्या. माझ्याकडे ध्रुव शाखेच्या पटाची वही होती. ती नेमकी पोलिसांच्या हातात लागली. पण, त्याच्या पहिल्या पानावर आम्ही गणपतीच्या कार्यक्रमात बालांचे ‘ए मालिक तेरे बंदे हम’ हे गाणे बसविले होते. ते लिहिलेले आसल्याने पोलिसाने पुढे काही पाहिले नाही व वही बाजूला टाकली. मी खूण करताच माझ्या बहिणीने ती अलगद उचलून थेट शेजारच्या घरात नेऊन दिली. त्यांनी ती ‘अग्नेय स्वाहाः’ केली. ती रात्र पोलीस कोठडीत काढली. नंतर आम्हाला नाशिक सबजेलला पाठविले. तेथून तीन दिवसांनी नाशिक रोड सेंट्रल जेलला पाठाविले. तेथे आमच्या समोरच्या बरॅकमध्ये तेव्हाचे केंद्रीय मंत्री मोहन धारिया व मराडवाड्यातील अधंतराव भालेराव हे होते.



आम्ही ‘मिसाबंदी’ नसल्याने आम्हाला ‘अ’ वर्ग नव्हता. त्यामुळे त्यावेळी तेथे असलेल्या १२००‘मिसाबंदीं’नी आमच्यासाठी त्यांना मिळणारा चहा व नाश्ता वगैरे पाठविला. तो आम्हाला देण्यास गिरीश बापट व इतर काही जण आले होते. दि.१२ जानेवारीला संपूर्ण देशभर जेलमध्ये एक दिवसाचे उपोषण करण्याचे ठरले होते. त्यानुसार आम्ही सब जेलमध्ये उपोषण केले. दि.१४ जानेवारी रोजी मकरसंक्रात असल्याने जेलमध्येच हा उत्सव घेण्याचे ठरले. त्यानुसार १८७ गुळाच्या पोळ्या व ५५५ तीळगुळाचे लाडू जेलमध्ये पोहोचले. सर्व कैद्यांचा एकत्र कार्यक्रम जेलरच्या अध्यक्षतेखाली निवांत पार पडला. तसेच रोज संध्याकाळी आम्ही इतर कैद्यांसोबत शाखा लावून विविध खेळ घ्यायचो. दि. १९ जानेवारी, १९७६ रोजी आमचा खटला न्यायाधीश कासवा यांच्यासमोर चालला व आम्हाला १५ दिवस साधी कैद व एक रुपया दंड अशी शिक्षा झाली. आम्ही दंड भरण्यास नकार दिल्याने आम्हाला एक दिवस जास्तीची कैद सुनावण्यात आली. जेलमध्ये गेल्यावर जेलर मकासरे यांनी सर्व हकिगत ऐकल्यावर सांगितले की, “मी तुम्हाला चांगल्या वर्तणुकीमुळे एक दिवसाची सवलत देत आहे, असे सांगितले. अशा प्रकारे दि. २० जानेवारी, १९७६ रोजी सकाळी ८नंतर आम्हाला सोडण्यात आले. आम्हाला पकडल्यावर रात्री पोस्टर लागली नाहीत, तर आम्हाला त्रास होईल, म्हणून महेश बाम (इ. ७वी) तील विद्यार्थ्याने हायस्कूल ग्राऊंड यशवंत व्यायाम शाळा परिसरात वाटली.

- आनंद पाठक
@@AUTHORINFO_V1@@