सिंधुदुर्गातील तिलारी परिसर 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2020
Total Views |
 tillari _1  H x
 
 


जैवविविधता संरक्षणासाठी पहिले पाऊल

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग वन परिक्षेत्रातील २९.५३ चौरस किमी क्षेत्र हे 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र' (काॅन्झर्वेशन रिझर्व्ह) म्हणून घोषित करण्यात आले आहे. वन विभागाने आज त्यांसदर्भात अधिसूचना काढून हा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे तिलारी परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन होणार असून तिथल्या वाघ-हत्तींसह इतर वन्यजीवांच्या भ्रमणमार्गाचेही रक्षण होण्यास मदत होणार आहे.
 

गेल्या कित्येक वर्षांपासून वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमीकडून तिलारीच्या संवर्धनाच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. आज वन विभागाने अधिसूचना काढून तिलारी हे 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. या संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये तिलारी परिसरातील २९.५३ चौ.किमी राखीव वनक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बांबर्डे, घाटिवडे, केंद्रे, केंद्रे बुद्रूक, पाटिये, शिरंगे, कोनाळ, ऐनवडे, हेवाळे आणि मेढे या गावातील राखीव वनक्षेत्र आहे. संवर्धन राखीव क्षेत्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही प्रादेशिक वन विभागाकडे असते. अभायरण्याच्या दर्जाचे काटेकोर नियम 'संवर्धन राखीव क्षेत्रा'ला लागू होत नाही. स्थानिकांचे जंगलामधील हक्क यामध्ये अबाधित राहतात. 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला' जोडणाऱ्या वन्यजीव भ्रमणमार्गामधील तिलारी हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. कारण, या परिसरात वाघांचे प्रजनन होते. शिवाय रानटी हत्ती, मोठा धनेश, किंग क्रोबा आणि अनेक प्रदेशनिष्ठ उभयसृपांचा या परिसरात अधिवास आहे.
 
 
 
 
'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित केलेले तिलारी हे दक्षिण महाराष्ट्रातील पहिलेच क्षेत्र आहे. तर महाराष्ट्रातील हे सातवे 'संवर्धन राखीव क्षेत्र' आहे. तिलारी परिसर हा महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तीन राज्याच्या सीमेवर स्थित आहे. गोव्यातील म्हादाई अभयारण्य, कर्नाटकातील भिमगड अभयारण्य आणि तिलारी राखीव संवर्धन हे तीन क्षेत्र वन्यप्राण्यांच्या दृष्टीने विशेषत: वाघांच्या भ्रमणमार्गाकरिता अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत. येणाऱ्या कालावधीत आम्ही 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राचा' दहा वर्षांचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे काम हाती घेणार असल्याची माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक व्ही. क्लेमेंट बेन यांनी दिली. यामध्ये कर्नाटक, गोवा आणि राधानगरी अभयारण्यामधून तिलारीशी जोडणाऱ्या वन्यजीव भ्रमणमार्गाच्या संरक्षणाचा मुद्दाही अंतर्भुत असले, असे त्यांनी सांगितले. 
 
 
 
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचे वन्यजीव अभ्यासक गिरीश पंजाबी यांनी अभिनंदन केले आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिकचा काळ पंजाबी हे सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अधिवास करणाऱ्या वाघांवर संशोधनाचे काम करत आहेत. 'तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रा'मुळे निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल. ज्यामधून स्थानिकांना रोजगार प्राप्त झाल्यामुळे त्यांना जंगल संवर्धनाचे महत्व पटेल, असे पंजाबी यांनी सांगितले. 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रा'मुळे या भागातील हत्तींना हक्काचे घर मिळाले असून त्यांच्या संवर्धनाला हातभार लागणार असल्याची भावना सिंधुदुर्गचे मानद वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार यांनी मांडली.
 
 
 
तिलारीच्या रक्षणासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे अभिनंदन. मात्र, तिलारीला अभयारण्य म्हणून घोषित करणे आवश्यक आहे. जैवविविधता संवर्धनाच्या अनुषंगाने २९.५३ चौ.किमी क्षेत्र हे फारच लहान आहे. त्यामुळे तिलारीला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्राचा समावेश यामध्ये करता आला असता. शिवाय तिलारीचा कर्नाटक, गोवा, राधानगरीशी जोडणारा वाघ, हत्ती आणि इतर वन्यजीवांचा भ्रमणमार्गही संरक्षित करणे गरजेचे आहे. - डाॅ. अनिष अंधेरिया, संचालक, वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट इंडिया .
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@