रामदेव बाबांच्या ‘पतंजली’कडून कोरोनावरील औषध लाँच!

23 Jun 2020 15:03:12

Coronil_1  H x


‘कोरोनिल’, ‘श्वासारी’ने तीन दिवसांत संसर्ग बरा होण्याचा दावा!

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूची लागण होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात बाबा रामदेव यांनी कोरोनावर मात करणार पहिले औषध शोधले असल्याचा दावा केला आहे. ‘कोरोनिल’ आणि ‘श्वासारी’ हे कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी बनवलेले औषध त्यांनी आज लाँच केले.


या विषाणूला हरवण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. आचार्य बालकृष्ण यांनी केलेल्या ट्विटनुसार, कोरोनावर आधारित पहिले आयुर्वेदिक औषध मंगळवारी म्हणजेच आज लाँच केले. हरिद्वारच्या पतंजली योगपीठात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत हे औषध लाँच करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेला बाबा रामदेव यांच्यासह आचार्य बालकृष्ण, औषधी चाचणीस उपस्थित असलेले वैज्ञानिक, संशोधक आणि डॉक्टरही उपस्थित होते. या आयुर्वेदिक औषधावर संशोधन पतंजली रीसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी संयुक्तपणे केले आहे.


आचार्य बालकृष्णांच्या म्हणण्यानुसार, ‘दिव्य कोरोनिल टॅब्लेट’ मध्ये अश्वगंधा, गिलोय, अणुतेल, श्वासारी रस आणि तुळसी यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. कोरोनामध्ये संक्रमित रुग्णांमध्ये या औषधाबद्दल क्लिनिकल चाचण्या घेतलेल्यांमध्ये १०० टक्के निकाल पाहिले गेले आहेत. बाबा रामदेव यांनी असा दावा केला आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण या औषधाच्या वापराने तीन दिवसांच्या आत बरे होतील. पुढच्या सात दिवसांत कोरोना रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी जाईल.


या औषधाच्या मदतीने आम्ही कोरोनाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीवर नियंत्रण ठेवू शकू, असे मत बाबा रामदेव यांनी यावेळी व्यक्त केले. या औषधाच्या साहाय्याने तीन दिवसांच्या आत ६९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर, सात दिवसांमध्ये १०० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या औषधाची चाचणी २८० जणांवर करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0