गेल्या चोवीस तासांत देशांत नव्या १४९३३ रुग्णांची वाढ!

23 Jun 2020 12:49:37

Corona_1  H x W



कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४,४०,२१५ तर १३,६९९ रुग्णांचा मृत्यू; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण 

मुंबई : देशातल्या सर्वच भागांमध्ये कोरोनाने आपले हातपाय पसरले आहेत. प्रथमत: ग्रीन झोनमध्ये असणारे जिल्हे अनलॉकिंगनंतर आता रेड झोनमध्ये जाऊ लागले आहेत. कारण अनलॉकिंगनंतर आता व्यवहार वाढल्याने तसेच माणसांची वर्दळ वाढल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळते आहे.


गेल्या २४ तासांत देशात १४ हजार ९३३ नव्या कोरोना बाधित केस समोर आल्या आहेत. त्यामुळे भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ४ लाख ४० हजार २१५ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत दुर्दैवाने ३१२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


देशात सध्या १ लाख ७८ हजार ०१४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २ लाख ४८ हजार १९० रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.


दुसरीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. दररोज तीन ते साडे तीन हजार रूग्णांच्या जवळपास नव्या कोरोनाबाधितांची वाढ होतो आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.


महाराष्ट्रात कोरोनाच्या ३७२१ नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात ६१ हजार ७९३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात काल १९६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६७ हजार ७०६ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0