निसर्ग वादळामुळे कोकणातील गिधाडे आणि सागरी गरुडांचा संसार मोडला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2020   
Total Views |
 vulture_1  H x
 
 

पक्ष्यांच्या पुनर्वसानाचा प्रश्न

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - निसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गिधाड आणि पांढऱ्या पोटाच्या सागरी गरुडांंच्या अधिवासाला बसला आहे. म्हसाळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील गिधाडांची जवळपास ६४ घरटी उद्ध्वस्त झाली आहेत. तर काही गिधाडे आणि त्यांची पिल्ले मृत्यूमुखी पडली आहेत. किनारपट्टीभागातील पांढऱ्या पोटाच्या सागरी गरुडांच्या घराट्यांनाही धक्का बसला असून त्यांची साधारण २५ घरटी उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे या पक्ष्यांच्या पुर्नवसानाचा प्रश्न आता वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे.
 
 
 
कोकण किनारपट्टीवरील रायगड आणि रत्नागिरीला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका इथल्या पक्षीवैभवाला बसला आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसाळा आणि श्रीवर्धन तालुक्याच्या आसपासच्या क्षेत्रात गिधाडांचा अधिवास आहे. यापरिसरात पांढऱ्या पाठीची आणि लांब चोचीची गिधाडे आढळतात. नारळ, आंबा, पुनई (जंगली बदाम), साकवीण, वनभेंड, अर्जुन यांसारख्या मोठ्या झाडांवर ते वास्तव्य करतात. मात्र, महिन्याच्या सुरुवातीला रायगड जिल्ह्याला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे गिधाडांची घरटी नष्ट झाल्याचे निरीक्षण 'सिस्केप' संस्थेच्या कार्येकर्त्यांनी नोंदवले आहे. गेल्या काही वर्षांपासून रायगड जिल्ह्यामध्ये गिधाड संवर्धनाचे काम 'सिस्केप' ही संस्था करत आहे. आमच्या निरीक्षणानुसार चिरगाव आणि श्रीवर्धनमधील गिधाडांची एकूण ६४ घरटी उद्ध्वस्त झाली आहेत, अशी माहिती 'सिस्केप'चे गिधाड संवर्धक प्रेमसागर मेस्त्री यांनी दिली. यामधील साधारण १८ घरट्यांमध्ये गिधाडांची २२ ते ३० पिल्ले असल्याचे त्यांनी सांगितले. वादळ शांत झाल्यानंतर 'सिस्केप'च्या स्वयंसेवकांनी वादळात सापडलेल्या पाच गिधाडांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
 
 
 
श्रीवर्धन वन विभागाकडे जखमी अवस्थेत आलेल्या पांढऱ्या पाठीच्या गिधाडाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली. नारळाच्या झाडांवरची गिधाडांची घरटी नष्ट झाल्याने त्याठिकाणी कृत्रिम घरटे तयार करुन गिधाडांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे मेस्त्री म्हणाले. म्हसाळा आणि श्रीवर्धन तालुक्यात साधारण २६८ गिधाडांचा अधिवास होता. वादळानंतर ही गिधाडे नाहीशी झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात दोन वेळा मृत जनावर टाकल्यानंतर त्यावर ९४ गिधाडे आल्याची माहिती मेस्त्री यांनी दिली. गिधाडांबरोबर पांढऱ्या पोटाच्या सागरी गुरुडाची घरटीही उद्ध्वस्त झाली आहेत. किनारपट्टीच्या भागातील सुरुच्या झाडांवरील समुद्री गरुडाची जवळपास सगळीच घरटी नष्ट झाली आहेत. श्रीवर्धन ते रेवदांडादरम्यान केलेल्या सर्वेक्षणात साधारण १८ घरटी नष्ट झाल्याचे निरीक्षण आम्ही नोंदवल्याचे मेस्त्री म्हणाले. तर रत्नागिरी जिल्ह्यातील वेळासच्या किनाऱ्यावरील सागरी गरुडाची तीन घरटी उद्ध्वस्त झाल्याची माहिती कासवमित्र मोहन उपाध्ये यांनी दिली. सारखीच परिस्थिती केळशी आणि आंजर्ले किनारपट्टीवरील सागरी गरुडांच्या घरट्यांची आहे. हे पक्षी एकदाच बांधलेल्या घरट्यांमध्ये वर्षानुवर्षे राहणे पसंत करत असल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@