दिलासादायक : हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आता कोरोना नियंत्रणात!

    दिनांक  22-Jun-2020 16:46:46
|

Dharavi_1  H xधारावीत कोरोना मृत्यूदरही घटला!


मुंबई : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत रुग्णसंख्या आता नियंत्रणात येत आहे. रोज ४० ते ९० पर्यंत सापडणाऱ्या रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. शनिवारी आतापर्यंत सर्वात कमी ७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २१७० रुग्णांची संख्या झाली असून मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे. १ जून ते २१ जूनपर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.


धारावी ही आशियातील सर्वात मोठी आणि दाटीवाटीने वसलेली झोपडपट्टी आहे. येथे कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर येथील आकडेवारी झपाट्याने वाढली. दाटीवाटीची झोपडपट्टी असल्याने येथे क्लोज कॉन्टॅक्टमुळे संसर्ग वाढत गेला. त्यामुळे आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र पालिका, राज्य सरकारने येथे आवश्यक यंत्रणा उभारून अधिक लक्ष वेधले. कंटेनमेंट झोन जाहिर करून तेथे पोलिस बंदोबस्त वाढवला. रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या संशयितांचा तातडीने शोध घेऊन क्वारंटाईनवर भर दिला.घरोघरी सर्वेक्षण, तपासणी, आरोग्य शिबिरे, कडक लॉकडाऊन, योग्य उपचार पद्धती, नियोजन, रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहण्यासाठी अॅक्टिव्हिटीज राबवणे, संस्था, संघटना, खासगी डॉक्टरांचा मोहिमेत सहभाग आदींमुळे रुग्ण संख्या घटते आहे. शनिवारी सर्वात कमी सात रुग्णांची नोंद झाली. रविवारी १२ रुग्ण आढळले. तर सलग १ जून ते ८ जून व १३ जून ते १६ जून या कालावधीत एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. १जून ते २१ जूनपर्यंत येथे ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाणही घटत असल्याने धारावीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.