आशा सेविकांच्या मानधनासाठी अमित ठाकरेंचे राज्य सरकारला पत्र!

    दिनांक  22-Jun-2020 12:26:38
|

Asha worker _1  अजित पवार, राजेश टोपेंना पत्र; राज्यपालांची भेट घेणार अमित ठाकरे


मुंबई : महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. या स्थितीतही आशा वर्कर्स आपल्या जीवाची पर्वा न करता मैदानात उतरून काम करत आहेत. मात्र, त्या तुलनेत त्यांचे मानधन अत्यंत अल्प आहे. आशा सेविकांचे मानधन वाढवून द्यावेत अशा मागणीचं पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवले आहे. फेसबूक पोस्टमध्ये अमित ठाकरेंनी हे पत्र पोस्ट केले आहे.दोन दिवसांपूर्वी आशा स्वयंसेविकांनी कृष्णकुंजवर जाऊन अमित ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अमित ठाकरे यांनी अजित पवार आणि राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. अमित ठाकरेंनी पत्रात लिहीले आहे की, परवा काही ‘आशा’ स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त रु. १६०० मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र ‘आशां’ना दर महिन्याला रु. ४,००० ते १०,००० इतका मोबदला मिळत आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकटकाळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे.
“आशा स्वयंसेविकांच्या मानधनाचा निर्णय घेताना तो महापालिका स्तरावर न घेता संपूर्ण राज्याच्या पातळीवर घ्यावा, म्हणजे विषमता निर्माण होणार नाही” अशी मागणीही अमित ठाकरे यांनी पत्रातून केली आहे. त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहील्याचे अमित ठाकरेंनी पत्रात सांगितले आहे.अमित ठाकरे आज दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेणार आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.