केईएममध्ये ऑक्सिजनची कमतरता ; एकाच दिवसात २१ मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2020
Total Views |

KEM_1  H x W: 0


मुंबई :
रुग्ण रुग्णालयात जातात ते बरे होण्याच्या अपेक्षेने, परंतु मुंबई महापालिकेची रुग्णालये म्हणजे मृत्यूची गुहा ठरत आहेत. केईएम रुग्णालयात तर ऑक्सिजनअभावी एकाच दिवशी २१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या सर्व प्रकरणाची गंभीर चौकशी व्हावी आणि या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केली आहे.


केईएम रुग्णालयात १६ जून २०२० या एकाच दिवशी ऑक्सिजनअभावी तब्बल २१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. १४ जून रोजी ९ रुग्ण, १५ जून : १० रुग्ण, १७ जून : ९ रुग्णांचा मृत्यू, १८ जून : १० रुग्णांचा मृत्यू आणि १९ जून रोजी ५ रुग्णांचा मृत्यू ही मृत्यूची आकडेवारी गंभीर स्थिती दर्शवत आहे. मात्र १६ जून रोजी एकाच दिवशी एक डझनहून अधिक लोकांचे झालेले मृत्यू एबनॉर्मल असल्याचे खुद्द अधिका-यांनीच कबुल केले असून, या महापालिकेचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. या सर्व प्रकरणाची गंभीर चौकशी व्हावी आणि या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.


सोमय्या यांनी शनिवारी केईएम रुग्णालयामध्ये जाऊन परिस्थिती पाहिली तसचे डीन यांचीही भेट घेतली. या आधीही अशीच परिस्थिती याआधी जोगेश्र्वरी ट्रामासेंटरमध्ये उद्भवली होती, तिथेही काही मिनिटांच्या ऑक्सिजन त्रुटीमुळे ७ मिनिटांत ७ मृत्यू झाले होते. रुग्णालय प्रशासनाचा रुग्णांच्या आरोग्याशी खेळ चालू असून या सगळ्या प्रकाराला महापालिकेचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. याआधीही अशा घटना उघडकीस आणल्या गेल्या, पण महापालिका प्रशासन बेफिकीर आणि निष्काळजी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.



ऑक्सिजनअभावी मृत्यू नाही


ऑक्सिजनअभावी झालेल्या 3 मृत्यूप्रकरणी सोमय्या यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली होती. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात ऑक्सिजनअभावी ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. केईएम रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेत कुठलाही तांत्रिक बिघाड झालेला नाही किंवा ऑक्सिजन पुरवठ्याचा दाबही कमी झालेला नाही. रुग्णालयाच्या २ इमारतीतील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणारी ११ हजार लिटरची यंत्रणा उभारण्यात आलेली असून या यंत्रणेमध्ये ऑक्सिजन भरण्याची व्यवस्था सतत सुरू असते. त्यामुळे ऑक्सिजन कमी पडण्याचा मुद्दा उद्‌भवत नाही.



केईएम रुग्णालयात १३ हजार लिटर क्षमतेची नवीन ऑक्सिजन टाकी लावून कार्यान्वित करण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. जनतेत गैरसमज निर्माण होऊन रुग्णांमध्ये भीती निर्माण होईल, असे वृत्त कोणी पसरवू नये, अशी विनंतीही मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान, मात्र २१ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी सोमय्या यांनी केलेल्या आरोपावर रुग्णालय प्रशासनाने वा पालिका प्रशासनाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. या प्रकरणी अधिक जाणून घेण्यासाठी केईएमचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.
@@AUTHORINFO_V1@@