सुविधाच नाही ऑनलाईन शिक्षण देणार कसे ?

21 Jun 2020 18:46:57

प्रातिनिधिक फोटो : rural



मुंबई :
करोना विषाणूच्या संसर्गामुळे यावर्षी शाळांचा श्रीगणेशा हा ऑनलाईन पध्दतीने झाला आहे व तशा ऑनलाईन शिकवण्या सुरू करण्याचे शासनाने सुद्धा आदेश दिले आहेत मात्र ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी बहुतेक ठिकाणच्या विद्यार्थी व पालक यांच्याकडे स्मार्ट मोबाईल, इंटरनेटची सुविधा यासह इतर सुविधा उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत



मागील दोन दिवसांपूर्वी विविध ठिकाणच्या शाळेतून शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपात शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. परंतु सर्वच मुलांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने यातील बहुतांश मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे. तसेच ज्या मुलांकडे मोबाईल आहे तिथेही इंटरनेटची सुविधा नाही, तर काही ठिकाणी नेटवर्क मिळत नाही अशा स्थितीत विद्यार्थ्यांना शिकविणे कठीण होऊन बसले आहे.


सध्या मुलांना मेसेज व फोन करून कोणत्या वेळेस कोणता अभ्यास वर्ग घेतला जात आहे याची माहिती विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिली जाते. त्यानुसार शिकवणी सुरू केली आहे. यंदाच्या दहावीच्या बॅच साठी ५५ विद्यार्थी आहेत त्यातील केवळ ३५ ते ४० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्टर केले आहे. त्यातील सर्वच मुलं ही व ऑनलाईन तासिके साठी उपस्थित नसतात. तर सकाळच्या वेळेस काही विद्यार्थ्यांचे पालक कामाला जाताना मोबाईल सोबत घेऊन जात असल्याने मोबाईल हातात मिळत नाही तर ज्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी काहीच सुविधा उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे. तसेच काही विद्यालयात ऑनलाईन साठी जवळपास ७० टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यातील त्यामध्येही केवळ ४० टक्केच विद्यार्थी ऑनलाईनसाठी बसतात. कारण काही जणांकडे मोबाईल नाहीत तर पालक आपल्या मुलांना मोबाईल घेऊन देईलच असे नाही त्यामुळे थोड्याफार प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत.


कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षकवर्ग प्रयत्न करीत आहेत. परंतु जे काही विषय प्रॅक्टिकल व फळ्यावर शिकविण्यासारखे विषय आहेत त्यामध्ये गणित, विज्ञान हे विषय ऑनलाईन स्वरूपात विद्यार्थ्यांना कितपत समजतात याबाबतही शंका आहे. वसई तालुक्यातील बहुतेक परिसर हा ग्रामीण भागात येत असल्याने अनेक शाळांतील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले असल्याने कोणत्या पालकांकडे स्मार्ट फोन, टीव्ही, लॅपटॉप , इंटरनेट सुविधा आहे व घरी राहून किती विद्यार्थी शिकू शकतात याची माहिती प्रत्येक शाळांकडून जमा करण्यात आली असल्याचे वसई तालुका गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांनी सांगितले आहे


पालकांना खर्च परवडेना


करोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वच पालक वर्गाची आर्थिक स्थिती बिकट आहे. .ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना स्मार्ट मोबाईल घेणे , त्यामध्ये नेट पॅक मारणे आदी सारख्या गोष्टी हातावर पोट असलेल्या पालकांना परवडणारे नसल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे. आधीच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत बहुतेक पालक आहेत त्यामुळे या साऱ्या गोष्टी आर्थिक दृष्ट्या कठीण होऊन बसले आहे


१)ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यां सोबतच शिक्षकांनाही अडचणी निर्माण होत आहेत. सगळ्यांकडे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे असे नाही. बहुतेक जण ग्रामीण भागातील आहेत त्यामुळे तेवढ्या पुरेशा सुविधा नाहीत त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे.

- बॅरी डाबरे, अध्यक्ष तालुका शिक्षक संघटना वसई


२) ऑनलाईन शिक्षण घेणे सर्वांना शक्य नसल्याने अडचणी आहेत. याबाबत केंद्रप्रमुखांना सूचना देऊन सर्व शाळेतील विद्यार्थ्यांची स्थिती जाणून घेतली आहे व तसा अहवाल तयार करून जिल्हा शिक्षण विभागाला दिला आहे

-माधवी तांडेल, गटशिक्षणाधिकारी वसई


Powered By Sangraha 9.0