२६/११ मुंबईच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणा याला अमेरिकेत अटक!

20 Jun 2020 16:23:36

Tahvur Rana_1  

भारताने केली होती प्रत्यर्पणाची मागणी; अमेरिकेकडून पूर्णपणे सहकार्य

मुंबई : २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणा याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. राणा याला २००९ मध्ये अमेरिकेत पकडण्यात आले होते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात अमेरिकी नागरिकही मारले गेले होते. त्यामुळे तेथे त्याच्यावर खटला चालवला गेला. काही दिवसांपूर्वीच राणाची तेथून सुटका झाली होती.


दरम्यान आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये त्याला अटक केली. भारताने तहव्वूर हुसेन राणा याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. या मागणीला अमेरिकेकडून पूर्णपणे सहकार्य करण्यात येणार असल्याचे ट्रम्प प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार आता तहव्वूर हुसेन राणा याला भारताच्या हवाली केले जाणार आहे.


भारत प्रत्यर्पण प्रकरणात ११ जूनला राणाची कोर्टात पहिल्यांदाच सुनावणी झाली होती. शुक्रवारी कोर्टाने सांगितले की, पुढील सुनावणी ३० जून रोजी होणार आहे. राणाच्या वकिलाला २२ जूनपर्यंत जामीन अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. कोर्टाने २६ जूनपर्यंत अमेरिकन सरकारकडे जाब मागितला आहे.


२६ नोव्हेंबर २००८ रोजी, लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ले केले होते. त्या हल्ल्यात १६६ लोक ठार आणि ३०० जखमी झाले होते. मृत्यू झालेल्यांमध्ये काही अमेरिकन नागरिकही होते. चकमकीत पोलिसांनी ९ दहशतवाद्यांना ठार मारले आणि अजमल कसाबला अटक केली. त्याला २०१२ मध्ये फाशी देण्यात आली होती.


राणाविरूद्ध ऑगस्ट २०१८ मध्ये राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या विशेष कोर्टाने अटक वॉरंटही जारी केले होते. वकिलांच्या म्हणण्यानुसार, राणा हा त्याचा बालपणातील मित्र डेव्हिड कोलमन हेडलीसोबत मुंबई हल्ल्याच्या कटात सामील होता. पाकिस्तानात २००६ ते २००८ या काळात हे षडयंत्र रचण्यात आले होते. यावेळी राणाने लष्कर-ए-तोयबाला मदत मागितली होती.





Powered By Sangraha 9.0