चीन आणि पाकिस्तानच्या ‘हायब्रीड युद्धा’ला हवे जशास तसे उत्तर

20 Jun 2020 23:12:24
Chinaa_1  H x W




सध्या पाकिस्तान आणि चीनने भारताच्या राजकीय पक्षांमध्ये ढवळाढवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचे राजदूत काही राजकीय नेत्यांना भेटतात आणि ‘मुत्सद्देगिरी’च्या नावाखाली त्यांना चीनमध्ये भेटीकरिता बोलावले जाते. तिबेटला किंवा मानस सरोवराला भेट, पाकिस्तानमध्ये लाहोरला भेट. काही राजकीय नेत्यांनी पाकिस्तानी आणि चिनी मीडियाला दिलेल्या मुलाखती इंटरनेटवर उपलब्ध आहेत. यामध्ये दिसेल की, काही नेते भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध बोलत आहेत. सरकारविरोधी अनेक पत्रकारांना चीन आणि पाकिस्तानला भेटीवर बोलावले जाते आणि त्यानंतर त्यांच्याकडून भारतीय राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध लेख लिहिले जातात.



लडाख सीमेवर झालेल्या झटापटीत एक भारतीय सैन्य अधिकारी आणि १९ जवान शहीद झाले. भारताच्या प्रत्युत्तरातही चीनचे ४०-४५ जवान शहीद झाले असून ११ जण जखमी झाल्याची माहिती चीनच्या माध्यमांनी दिली आहे. भारतीय बाजूकडूनच चीनच्या हद्दीत घुसखोरी करण्यात आली होती, भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ही झटापट झाली. या झटापटीत गोळीबार झाला नसून दगडफेक झाल्याची माहिती आहे. गलवान खोर्‍यात तणाव निवळण्याची प्रक्रिया सुरू असतानाच चीन आणि भारतीय सैन्यात हिंसक झटापट झाली. १९६७ नंतर पहिल्यांदाच चीनच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले आहेत.

वाटाघाटींमध्ये फसवून चिनी सैन्याच्या या आक्रमक कारवाईला प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे. भारतीय सैन्य अर्थातच योग्य प्रत्युत्तर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी देईल. लष्करी पर्यायाची चर्चा जरुरी नाही. मात्र, अजूनसुद्धा अनेक भारतीयांना चीन हा आपला नंबर एक शत्रू वाटत नाही. पण, चीनवर १३० कोटी भारतीयांनी आर्थिक बहिष्कार घालणे गरजेचे आहे. व्यापारी वर्ग आणि कॉर्पोरेट जगताला ठणकावून सांगावे लागेल की, चिनी मालाशिवाय आर्थिक व्यवहार करायला शिका. कारण, भारतीय बाजारपेठेमध्ये चीन प्रचंड माल विकून प्रचंड नफा कमावतो, ज्यामुळे त्यांचे डीफेन्स बजेट वाढते, ज्यामुळे चिनी सैनिक आधुनिक शस्त्रांनी सज्ज होतात आणि भारताविरुद्ध आक्रमक कारवाई करतात, जशी आता गलवान खोर्‍यामध्ये झालेली आहे. या आक्रमक कारवाईला पैसे पुरवले त्या भारतीयांनी, जे अजूनसुद्धा चिनी सामान विकत घेत आहेत. हे आता थांबायलाच हवे. कारण, आर्थिक फायद्याकरिता राष्ट्रीय हिताला आणि भारतीय सैनिकांना आपण बळी देऊ शकत नाही.



२०१९ नंतर भारताच्या विरुद्ध ‘हायब्रीड युद्ध’
गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये केलेल्या चिनी अतिक्रमणाला मीडियामध्ये खूप महत्त्व दिले जात आहे. मात्र, चीन लडाखशिवाय भारताशी हायब्रीड युद्धही लढत आहे, ज्याविषयी फारसे लिहिले जात नाही. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि चीनचा आक्रमक पवित्रा आपल्याला माहीतच आहे. परंतु, २०१९ नंतर या दोन्ही देशांनी भारताच्या विरुद्ध ‘हायब्रीड’ म्हणजे ‘संकरित युद्ध’ सुरू केले आहे.

‘हायब्रीड वॉर’ ही एक लष्करी रणनीती आहे, ज्यात पारंपरिक युद्ध हे राजकीय युद्ध, अनियमित युद्ध, सायबर युद्ध आणि मानसिक युद्ध यांचे मिश्रण आहे. ‘हायब्रिड वॉरफेअर’ मुत्सद्देगिरी, निवडणूक हस्तक्षेप यांसारख्या इतर प्रभावी पद्धतींना एकत्र करते. हा लढा केवळ शस्त्रास्त्रांनी लढला जात नाही, तर त्यात लोकांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या युद्धांत अफवा, चुकीची माहिती आणि बनावट बातम्या पसरवल्या जातात. सतत हे केल्याने सर्वसामान्यांचा विचार बदलू लागतो. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात असे करणे पूर्वीपेक्षा सोपे आहे. यामधील काही पैलूंवर आपण या लेखात विचार करू.




‘सायबर स्पेस’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही ‘हायब्रीड वॉर’ची मुख्य शस्त्रे
शस्त्रास्त्रं आणि सैन्याच्या बळावर झालेल्या लढाईत बरेच नुकसान होते. अशी युद्धे खूप महाग असतात. परंतु, ‘हायब्रीड वॉर’ यापेक्षा वेगळे आहे आणि कमी किमतीत आपल्याला शत्रूचे नुकसान करता येते. तो आता आधुनिक युद्धधोरणाचा एक भाग बनत आहे. ‘सायबर स्पेस’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही या युद्धाची मुख्य शस्त्रे आहेत. ‘हायब्रीड वॉरफेअर’चा ताजा शिकार भारत आहे. भारताची अस्मिता, सार्वभौमत्व, सभ्यता, सांस्कृतिक, सामाजिक वातावरण नष्ट करण्याचे ‘हायब्रीड वॉरफेअर’ हे महत्त्वाचे साधन असल्याचे सिद्ध होत आहे.


‘हायब्रीड वॉरफेअर’ हे बाह्यरीत्या उत्तेजन देणारा संघर्ष म्हणून परिभाषित केले जाऊ शकते, जे ऐतिहासिक, वांशिक, धार्मिक, सामाजिक-आर्थिक आणि भौगोलिक शोषणाचा वापर (गैरवापर), हिंसाचार वाढवून अपारंपरिक युद्धात परिवर्तन करण्यासाठी, एकाच वेळेस केले जाते. राजवट बदल/ सरकार बदल किंवा प्रस्थापित सरकारच्या विचारसरणीत बदल केला जातो. भारताला अस्थिर करण्यात पाक आणि चिनी गुप्तचर यंत्रणा सक्रियपणे गुंतल्या आहेत. भारत एक बहुसांस्कृतिक आणि बहुवंशीय राज्य आहे. जाती, जमाती, धर्म, राजकीय विचारसरणीतील मतभेदाचा वापर करून हिंसाचार भडकवला जातो. लष्करी दबाव, आर्थिक युद्ध, कर्जबाजारी करून दबाव टाकणे, चीनला इतर देशांवर लष्करी दबाव टाकून, आर्थिक युद्ध करून, त्या देशाला कर्जबाजारी करून किंवा मानसिकदृष्ट्या दमदाटी करून घाबरवून टाकायला आवडते. त्यामुळे हे देश चीनचे ऐकतात आणि त्यांचे आर्थिक गुलाम बनण्याकरिता तयार होतात. परंतु, चीनची हीच दमदाटी भारताविरुद्ध फारशी उपयुक्त ठरलेली नाही. म्हणून त्यांनी लष्करी ताकदीचा वापर डोकलाममध्ये केला. पण, तिथेही त्यांना फारसे यश मिळाले नाही. सध्या लडाखमधे भारतावर मानसिक दबाव टाकणे सुरू आहे, पण भारतीय सैन्य माघार घेण्यासाठी तयार नाही म्हणून ते ‘हायब्रीड युद्धा’चा पर्यायसुद्धा भारताविरुद्ध वापरत आहेत.




‘डिप्लोमसी’ची लढाई
या ‘हायब्रीड युद्धा’चे अनेक पैलू आहेत. एक पैलू म्हणजे ‘डिप्लोमसी’ची लढाई. यामध्ये चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या संस्थांमध्ये भारतास कसा त्रास देतो, हे आपल्याला माहीत आहे. उदाहरणार्थ, ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’मध्ये पाकिस्तानला एक ‘दहशतवादी राष्ट्र’ म्हणून घोषित करायला अडथळा आणणे वगैरे.



राष्ट्रीय हिताविरुद्ध लिहिणारे
चीनचे दुसरे शस्त्र आहे आपल्या निवडणुकांमध्ये ढवळाढवळ. अशा प्रकारची ढवळाढवळ सोव्हिएत रशियाने १९६०-७०च्या दशकात केली होती. ‘मिट्रोव्हीन’ या केजीबी एजंटच्या पुस्तकामध्ये भारतात नेमके काय केले होते, यावर एक पूर्ण प्रकरण लिहिले आहे. त्यात दिलेली माहिती धक्कादायक आहे. हे पुस्तक इंटरनेटवरही उपलब्ध आहे. सध्या पाकिस्तान आणि चीनने भारताच्या राजकीय पक्षांमध्ये ढवळाढवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचे राजदूत काही राजकीय नेत्यांना भेटतात आणि मुत्सद्देगिरीच्या नावाखाली त्यांना चीनमध्ये भेटीकरिता बोलावले जाते. तिबेटला किंवा मानस सरोवराला भेट, पाकिस्तानमध्ये लाहोरला भेट. काही राजकीय नेत्यांनी पाकिस्तानी आणि चिनी मीडियाला दिलेल्या मुलाखती इंटरनेटवर उपलब्ध आहेत. यामध्ये दिसेल की, काही नेते भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात सातत्याने बोलत आहेत.

सरकारविरोधी अनेक पत्रकारांना चीन आणि पाकिस्तान भेटीवर बोलावले जाते आणि त्यानंतर त्यांच्याकडून भारतीय राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध लेख लिहिले जातात. भारतीय मीडियामध्ये आणि आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये, खासकरून अमेरिका आणि युरोपमधल्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रे किंवा टीव्ही चॅनेल्सवरच्या मुलाखती प्रकाशित होतात. देशात हिंसात्मक आंदोलने, अराजकता निर्माण करून चीनने याआधी ईशान्य भारतामध्ये बंडखोरी करणार्‍यांना, मध्य भारतात माओवाद्यांना कशी मदत केली आहे, हे आपल्याला माहीतच आहे. परंतु, सध्या चीन सायबर युद्धामध्ये भारतातल्या काही सरकारी वेबसाईटवरील माहिती चोरण्याचा प्रयत्न करत आहे.



‘हायब्रीड युद्धा’ला प्रत्युत्तर
लक्षात असावे की, स्वतःचे रक्षण करणे हे नेहमीच कठीण असते. परंतु, अशाप्रकारची ‘ऑपरेशन्स’ आपणसुद्धा चीन आणि पाकिस्तानमध्ये करू शकतो. त्यांना सांगू शकतो की, तुम्ही आमच्या राजकीय पक्षांमध्ये हस्तक्षेप केला, तर आम्हीसुद्धा पाकिस्तानमध्ये असलेले राजकीय पक्ष किंवा पाकिस्तानातील, सिंध, बलुचिस्तान किंवा वजिरिस्तानमधील वेगवेगळ्या मानवधिकार संस्थांशी मिलाप करून त्यांना भारतामध्ये येण्याकरिता निमंत्रण देऊ शकतो. चीनच्या विरुद्ध असलेले काही प्रांत म्हणजे तिबेट, शिनझियांग, हाँगकाँग. इथल्या नेत्यांशी संवाद साधून त्यांना आम्ही राजकीय मदत करू शकतो. त्यांनाही भारतात पर्यटक म्हणून यायला आवडेल.


चीनला जशास तसे हीच भाषा कळते, म्हणून त्यांच्या मानवधिकार संस्था, अल्पसंख्यकांच्या संस्थांशी आणि नेतृत्वांशी बोलून त्यांना राजकीय मदत केली तर तुम्हाला हे तुम्हाला आवडेल का? आवडत नसेल तर तुम्ही भारताच्या राजकीय जीवनामध्ये ढवळाढवळ करणे थांबवा. अंतत: प्रत्येक भारतीयाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून या युद्धात आपले योगदान दिले पाहिजे.


(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
Powered By Sangraha 9.0