मुंगी उडाली आकाशी...

    दिनांक  20-Jun-2020 22:33:12   
|

uddhav_1  H x Wयुती बहुमतात निवडून आली. युतीचे राज्य काही आले नाही. ते का आले नाही, हे आपण सर्व जाणतो. जर भाजपने शिवसेनेशी युती केली नसती, तर निश्चितपणे भाजपच्या २०० हून अधिक जागा निवडून आल्या असत्या. ज्या राज्यात स्वतःच्या बळावर निवडून येऊन सत्ता स्थापन करण्याची शक्ती ज्या पक्षात नाही, त्या पक्षाच्या पक्षप्रमुखाने ‘शिवसेना भारताचा पंतप्रधान निश्चित करेल,’ असं म्हणणे म्हणजे, ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी’ असं म्हणण्यासारखं आहे.

शिवसेनेच्या ५४व्या वर्धापन दिनानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांना संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधान बनविणार. मला काही पंतप्रधान बनायचे नाही. मात्र, माझा शिवसैनिक या पदावर पोहोचला पाहिजे.” ज्याला राजकारण करायचे आहे, त्याने महत्त्वाकांक्षी असले पाहिजे, त्याशिवाय राजकारणात यशस्वी होता येत नाही. यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांची ही जी महत्त्वाकांक्षा आहे, ती एखाद्या राजकारणी नेत्याला शोभणारी आहे.


असे असले तरी, महत्त्वाकांक्षा ठेवताना आपल्या कुवतीचा आणि क्षमतेचा विचार करावा लागतो. त्यांचे हे बोल मी जेव्हा वाचले, तेव्हा मला संत मुक्ताबाईंचा एक अभंग आठवला.


मुंगी उडाली आकाशी ।
तिने गिळिले सूर्यासी।
थोर नवलाव झाला ।
वांझे पुत्र प्रसवला ।
विंचू पाताळाशी जाय ।
शेष माथा वंदी पाय ।
माशी व्याली घार झाली ।
देखोनि मुक्ताई हसली ।मुक्ताबाईंच्या या अभंगामागे जसा फार मोठा आध्यात्मिक आशय आहे, तसा ‘अगा जे घडणे अशक्य आहे,’ त्याकडे संकेत आहेत.


महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपने २०१९च्या निवडणुकीत एकी केली. तेव्हा ‘मोदी’ या नावाची लाट होती, जादू होती. मतदारांनी मोदींना मतदान केले. युती बहुमतात निवडून आली. युतीचे राज्य काही आले नाही. ते का आले नाही, हे आपण सर्व जाणतो. जर भाजपने शिवसेनेशी युती केली नसती, तर निश्चितपणे भाजपच्या २०० हून अधिक जागा निवडून आल्या असत्या. ज्या राज्यात स्वतःच्या बळावर निवडून येऊन सत्ता स्थापन करण्याची शक्ती ज्या पक्षात नाही, त्या पक्षाच्या पक्षप्रमुखाने शिवसेना भारताचा पंतप्रधान निश्चित करेल, असं म्हणणे म्हणजे, ‘मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी’ असं म्हणण्यासारखं आहे.


सशक्तांशी मैत्री केली की दुर्बलालादेखील असे वाटू लागते की, ‘मी कशाला त्याची लाचारी पत्करू, तो जे काही करतो, ते मी देखील करू शकतो. ही शक्ती माझ्यात देखील आहे. मी देखील पराक्रम करू शकतो,’ असे त्याला वाटू लागते आणि त्यातूनच मग फाजील आत्मविश्वास निर्माण होतो. भगवान गौतम बुद्ध एका जातककथेत हा आशय व्यक्त करतात.


एक सिंह आणि एक कोल्हा यांची मैत्री होते. मैत्रीत असे ठरते की, कोल्ह्याने युक्तीप्रयुक्तीने शिकार सिंहासमोर आणावी. सिंहाने तेव्हा उंच जागी बसून राहावे आणि कोल्ह्याने म्हणावे की, ‘‘महाराज, आपले तेज दाखवा.”


कोल्हा हे काम प्रामाणिकपणे अनेक दिवस करीत राहिला. शिकारीचा भरपूर वाटा त्याला मिळत राहिला. कोल्हा शिकार आणीत असे आणि सिंह त्याची शिकार करीत असे. एकदा कोल्ह्याच्या मनात असे आले की, ‘शिकार मी आणतो, सिंहाला सावध करण्याचे काम मी करतो आणि शिकारीचे सर्व श्रेय मात्र सिंह घेतो. या शिकारीत आहे काय? उडी मारायची आणि प्राण्याला फाडायचे. हे काम मी देखील करू शकतो.’


एके दिवशी कोल्हा सिंहाला म्हणतो, ‘‘महाराज, आता शिकार मी करतो. मी तुमच्या जागी बसतो. शिकार जवळ आली की तुम्ही फक्त एवढेच म्हणा, ‘कोल्होबा, आपले तेज दाखवा.”


याप्रमाणे कोल्हा सावजाच्या प्रतीक्षेत बसून राहतो. शिकारीच्या ठिकाणी एक हत्ती येतो. तेव्हा सिंह कोल्ह्याला म्हणतो, “कोल्होबा, आपले तेज दाखवा.” तेज दाखविण्यासाठी कोल्हा झेप मारतो. त्याची झेप कमी पडते, आणि कोल्हा हत्तीवर पडण्याऐवजी हत्तीच्या पुढे पडतो. हत्ती आपला पाय उचलतो आणि कोल्ह्यावर ठेवतो. शिकार होते, पण ती कोल्ह्याची होते. भगवान गौतम बुद्धांना हे सांगायचे आहे की, आपली शक्ती आणि कुवत बघून दुसर्‍याची बरोबरी करावी. केवळ गर्जना करून काय होणार आहे? एकच होतं, सभेत टाळ्या मिळतात!


उद्धव ठाकरे जसे शिवसेना पक्षप्रमुख आहेत, तसे आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री आहेत आणि काका आणि पुतणे शासन चालवतात. काका चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी प्रवास करतात. पुतण्यादेखील ‘कोविड-१९’च्या प्रभाव क्षेत्रात जाऊन दौरे करतात. मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे भाषण करतात. ‘कोरोनाशी आम्ही लढू, पण कोरोनाची आमच्याशी लढण्याची हिंमत आहे का?’ ‘चक्रीवादळाशी आम्ही सामना करू, आम्हीच एक वादळ आहोत,’ ही वाक्ये चांगली आहेत. अशी वाक्ये उच्चरायला देखील थोडी बहुत प्रतिभा लागते. कथा, कादंबर्‍या, नाटक, काव्य यातून ही वाक्य खुलून दिसतात. चित्रपटाच्या संवादात त्याची मजा येते. अभिनेता राजकुमार याचे, ‘फाडू डायलॉग’ तुम्ही जर युट्यूबवर गेलात, तर भरपूर ऐकायला मिळतील. ते ऐकताना मजा येते.


मात्र, राज्यकर्त्यांना ‘डायलॉगबाजी’ करून चालत नाही. ‘राज्य करणे’ हा काही चित्रपट नव्हे. कोरोनामुळे रोज किती जण मृत्यमुखी पडतात, याची आकडेवारी वृत्तवाहिन्यांवरुन रोज जाहीर केली जाते. तेव्हा प्रश्न असा पडतो की, कोरोनाशी कोण लढतो आहे? एक मंत्री म्हणतो, ‘विमानसेवा सुरू होणार.’ दुसरा म्हणतो, नाही होणार.’ एक म्हणतो, ‘जुलैमध्ये शाळा सुरू होणार.’ शिक्षण मंत्री म्हणतात, ‘ऑक्टोबरपर्यंत शाळा सुरू होणार नाही.’ एक म्हणतो ‘ऑनलाईन शिक्षण देणार.’ एक म्हणतो, ‘नाही जमणार.’ एक म्हणतो, ‘लॉकडाउन शिथील होणार,’ तर दुसरा म्हणतो, ‘नाही नाही, रेड झोन वाढत आहेत, ते अधिक कडक होतील.’ राज्यात नेमके काय चालू आहे, ते नेमके ‘मातोश्री’लाच माहीत!


सामान्य जनता या शासनाविषयी काय बोलते, हे राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. त्याचा नेहमी आढावा घेतला पाहिजे. जिचा राजकारणाशी काहीही सबंध नाही, अशा एका महिला वाचकाने मला फोन केला होता. ती म्हणाली, “आम्ही असे काय पाप केले की, ज्यामुळे असे निष्क्रिय शासन आमच्या माथी येऊन बसले आहे?” मार्चमध्ये ‘लॉकडाऊन’ घोषित झाले. ते घोषित करण्यापूर्वी ज्यांचे कुटुंब रोजच्या कमाईवर चालू आहे, त्यांचे काय होणार, याचा विचार मायबाप सरकारने केला नाही.


मग प्रश्न आला, अन्य प्रांतातून आलेल्या श्रमिकांचा. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात स्थलांतर करणार्‍या श्रमिकांचा, त्यांच्या रोजीरोटीचा मार्ग बंद झाला. रस्त्यावरून जथ्येच्या जथ्ये आपल्या गावाकडे चालत निघाले. मायबाप सरकारने त्यांच्या अन्न, पाण्याची, प्रवासाची, औषधाची व्यवस्था करणे आवश्यक होते. त्यांना धीर देणे आवश्यक होते, मायबाप सरकारने त्यांना वार्‍यावर सोडले.
त्यांच्या मदतीला संघ स्वयंसेवक धावून गेले. आजही मुंबईसारख्या ठिकाणी ‘कंटेनमेंट झोन’मध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी संघ स्वयंसेवक स्वतःचा जीव धोक्यात घालून ठाण मांडून बसलेले आहेत, त्याची ते प्रसिद्धी करीत नाहीत. कोणत्याही श्रेयाची अपेक्षा ठेवीत नाहीत. त्याचे राजकीय भांडवलही त्यांना करायचे नाही. यावेळी प्रश्न असा निर्माण होतो की, ‘शिवसैनिक कुठे आहेत?’ तो तर राजकीय पक्ष आहे. जेव्हा निवडणूक होतील, तेव्हा त्यांना मते मागायला जायचे आहे, निदान मतांसाठी तरी सेवाकार्य करणे आवश्यक आहे. लोकांमध्ये मिसळणे आवश्यक आहे, ‘कंटेनमेंट झोन’मध्ये जाणे आवश्यक आहे. स्वयंस्फूर्तीने काम करणारे अनेक शिवसैनिक आहेत, त्यांना सलाम केला पाहिजे. ‘कोरोना योद्धा’ म्हणून त्यांचा आदर केला पाहिजे. परंतु, पक्षपातळीवर काय चालले आहे, या प्रश्नाचे उत्तर पक्षाला जनतेला द्यावे लागेल.


‘दिल्ली बहुत दूर है’ असा हिंदीतला एक वाक्प्रचार आहे. पंतप्रधानपदी एखादा मराठी माणूस बसला तर, महाराष्ट्रातला एक मराठी माणूस म्हणून मला आनंदच होईल. परंतु, पंतप्रधानपद हे कुठल्या भाषिकांसाठी राखीव नाही. देशाचा पंतप्रधान बनण्यासाठी ती व्यक्ती ‘देशनायक’ असावी लागते. मध्यंतरी अस्थिरतेच्या कालखंडात कधी व्ही. पी. सिंग, कधी देवेगौडा, कधी गुजराल इत्यादी पंतप्रधान झाले. ‘They also ran’ म्हणजे शर्यतीत हे सुद्धा धावले. अंगी काही कर्तृत्व नाही, जनमान्यता नाही आणि या विशाल देशाची आत्मीय अनुभूती नाही. असे पंतप्रधान काही कामाचे नसतात. आज असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वात अशी क्षमतावान व्यक्ती कोण, हे उद्धवजींनी सांगितले नाही. ते एवढेच म्हणाले की, “मला काही पंतप्रधान बनायचे नाही.” राजकारणी माणसाविषयी असे बोलले जाते की, तो जे काही बोलतो त्याचा अर्थ विरुद्ध करायचा असतो. मुख्यामंत्रिपद मिळाले, तसेच पंतप्रधानपदही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साहाय्याने मिळेल, अशी त्यांची अपेक्षा असेल, तर आपले काही म्हणणे नाही. पण, अशा काही अपेक्षा दिसू लागल्या की, पुन्हा एक गोष्ट आठवते.


एक कोल्हा एका बैलाच्या मागे खूप फिरत राहिला. बैलाचे लोंबणारे वृषण पाहून त्याला असे वाटले की, आज ना उद्या हे गळून पडतील आणि आपल्याला मेजवानी मिळेल. खूप दिवस तो फिरत राहिला. पण, ते वृषण काही पडले नाही. शेवटी भुकेने मरायची वेळ आली, तेव्हा कोल्हा मनात म्हणाला, ‘‘बैलाच्या वृषणाची अपेक्षा सोडून द्यावी आणि कुठे एखादी कोंबडी मिळते का ते बघावे.” शेवटी उद्धवजींच्या महत्त्वाकांक्षेला मनःपूर्वक शुभेच्छा!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.