आषाढस्य प्रथमदिवसे...

    दिनांक  20-Jun-2020 23:45:28   
|
Kalidas_1  H xवर्षाधारा बरसू लागल्या की आपसुकच महाकवी कालिदासांच्या काव्यरचनांचा स्मृतिदरवळ सुखावून जातो. तेव्हा, उद्या, दि. २२ जूनपासून आषाढ मास सुरु होतोय. त्यानिमित्ताने आषाढाच्या या प्रथमदिवशी कालिदासांच्या पाऊस, विरह आणि मिलनाची भावनिक गुंफण असलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करुया...पाऊस... नेमाने येणारा पाऊस... आपल्या परिचयाचा, आपल्या सवयीचा पाऊस... तो आपल्या रुटीनमध्ये मस्त मुरला आहे. आपलं वर्ष ‘वर्षाच्या’ लहरीप्रमाणे चालतं. आपले खाणं-पिणं, सण-उत्सव, उपासतापास, यात्रा-प्रवास, उठणं-बसणं, कीर्तन-पारायणं, नाच-गाणं, संगीत-काव्य, चित्र आणि चित्रपटसुद्धा अगदी पावसाच्या तालावर नाचतात.

पाहा ना, हा पाऊस एकदा आला की ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद हे चार महिने राहतो. फार पूर्वीपासून या चातुर्मासात भारतातील जनजीवन ठप्प होत असे. सर्वात आधी बाहेरगावचा प्रवास बंद होत असे. चिखला-मातीच्या रस्त्याने प्रवास केला तरी तो फक्त गरजेपुरता असे. थोड्या दूरच्या प्रवासातील अडचण म्हणजे नदी-ओढ्यांना येणारे पूर. ते ओलांडणे महाकठीण. समुद्रात अशा पावसाळी वातावरणात जहाज सोडणे तर त्याहून कठीण! मग या चार महिन्यांत सहजच सर्व प्रकारचे प्रवासी घरी थांबत. नर्मदा परिक्रमा करणारे या चार महिन्यांत, आहे त्या ठिकाणी थांबत. यात्रेला गेलेले यात्रेकरू, या चार महिन्यांत असतील त्या धर्मशाळेत वा मंदिरात मुक्काम करत. तीन दिवसांच्या वर एका ठिकाणी न राहण्याचे, व्रत पाळणारे बौद्ध भिक्षू पण वर्षावासात राहत असत. कामानिमित्त परगावी गेलेले लोक, पावसाळा सुरू होण्याच्या आधी आपापल्या गावी परतत. व्यापारी, जहाजावर काम करणारे, वाहतुकीशी संबंधित असलेले, कामधंद्यानिमित्त लहान-मोठे प्रवास करणारे असे सगळेजण पाऊस सुरू होण्याच्या आधी घरी परत येत.


या परगावी गेलेल्या पथिकाची प्रेयसी विरहाच्या ग्रीष्माने कोमेजून जात असे. तहानलेल्या नेत्रांनी ती वर्षा ऋतूच्या आगमनाची वाट पाहत असे. पहिला पाऊस प्रियकर घरी येण्याचा संकेत मानत असे. पावसाची पहिली सर आणि प्रियकराचे येणे यांचे भारतीय भावविश्वात अद्वैत जडले. लोकागीतांपासून अभिजात काव्यापर्यंत आणि रागदारी संगीतापासून हिंदी चित्रपटातील संगीतापर्यंत हे अद्वैत दिसत राहते.


‘गाथा सप्तशती’ हा पहिल्या शतकातील लोकगीत संग्रह. सातवाहन राजा हालने राज्यातील सामान्य लोकांकडून गाथा मागवल्या व त्यातील ७०० उत्तम गाथा निवडून, हा काव्यसंग्रह तयार केला. यामध्ये देखील पावसाच्या आणि प्रियकराच्या येण्याचा संबंध जोडणार्‍या गाथा सापडतात. कामानिमित्त परगावी निघालेला पती, महिनोन्महिने प्रवास करत असे. त्या काळात खुशाली कळायचे काही साधन नव्हते आणि सुखरूप परत येणे दैवावर सोडले होते! अशा लांबच्या प्रवासाला निघालेल्या पतीला जड अंत:कारणाने निरोप देणारी पत्नी सखीला म्हणते –अज्जं पि ताव एक्कं मा मं वारेहि पिअसहि! रुअन्तिम् ।
कल्लिं उण तम्मि गए जइ ण मुआ ता ण रोदिस्सम् ॥ ५०२ ॥
 

अर्थात, “सखे, आज मला मनसोक्त रडू दे ग, मला थांबवू नकोस. उद्या ते प्रवासाला गेले ना की, मी नाही रडणार. कारण, विरहाने मी एक तर मरेन तरी, नाहीतर माझे अश्रू तरी आटतील.”

पती किती दिवसांनी परत येणार, तितक्या रेघा ती भिंतीवर काढून ठेवते. रोज एक एक रेघ पुसत, त्याची वाट पाहत असते. परदेशी गेलेल्या तिच्या पतीची अवस्थासुद्धा काही वेगळी नाही. त्यालासुद्धा पावसाच्या आधी आपण घरी पोहोचू व पत्नीची भेट होईल, अशी आस लागली असते. ही गाथा अशाच एका पथिकासाठी-


गन्धं अग्घाअन्तअ
पक्ककलम्बाणँ वाहभरिअच्छ।
आससु, पहिअजुआणअ!
घरिणिमुहं मा ण
पेच्छिहिसि ॥ ५६५ ॥वर्षाऋतूतील पहिल्या मेघगर्जनेला कदंबाला बहर येतो. कदंबाचा वृक्ष मोहरतो, त्याला सुवासिक फुले येतात. एक तरूण पथिक गावाकडे परत निघाला आहे आणि रस्त्यातच त्याला एक बहरलेला कदंब दिसतो. कदंबतरूतळी फुले पाहून तो थबकतो. एक फूल वेचतो. त्या फुलाचा गंध घेताना त्याचे डोळे मिटतात आणि अश्रू वाहू लागतात. अरे! पावसाळा आलासुद्धा! आणि मी अजून घरी पोहोचलो नाही. कधी मला माझ्या प्रियेचे मुख पाहायला मिळेल? तेव्हा त्याला गाथाकर्ता म्हणतो, “धीर धर पथिका! तू लवकरच घरी पोहोचशील, आणि तुला तुझ्या गृहिणीच्या मुखाचे दर्शन होईल!”

सीतेच्या शोधात निघालेला रामसुद्धा पावसाचे ढग पाहिल्यावर सीतेच्या आठवणीने व्यथित होतो. माल्यवान पर्वतच्या जवळ जेव्हा राम-लक्ष्मण सीतेच्या शोधात फिरत असतात, तेव्हा वर्षा ऋतूला सुरुवात झाली असते. राम म्हणतो, “त्या गगनचुंबी माल्यवान पर्वताच्या शिखरांवर मेघांनी ढाळलेली पावसाची पहिली सर आणि सीतेच्या विरहात माझ्या नेत्रांनी ढाळलेली अश्रुंची सर, एकाच वेळी कोसळली!”एतग्दिरेर्माल्यवत: पुरस्तादाविर्भवत्यम्बरलेखि श्रुंगम् ।
नवं पयो यत्र घनैर्मया च त्वद्विप्रयोगाश्रू समं
विसृष्टम् ॥ रघुवंश ॥


आणि असाच तो विरहवेदनेने तळमळणारा कालिदासाच्या मेघदुतातील शापित यक्ष. कांतेपासून एक वर्ष दूर राहण्याची शिक्षा भोगत असलेला. हिमालयातील अलकानगरी सोडून, तो रामगिरी पर्वतावरील आश्रमात राहत होता. शिक्षेचे काही महिने उलटून गेले, त्या दरम्यान पत्नीच्या विरहाने तो कृश झाला होता. पण, जेव्हा आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याने आकाशात पावसाचे कृष्णमेघ पाहिले, तेव्हा मात्र तो कोलमडून गेला...


वेड्यासारखे त्या निर्जीव ढगाला, बाष्प, धूळ, धूर, वीज आणि वार्‍याने तयार झालेल्या मेघाला यक्ष म्हणतो,


त्वामारूढं पवनपदवीमुद्गृही हीतालकान्ता:
प्रेक्षिष्यन्ते पथिकवनिता: प्रत्ययादाश्वसन्त्य:।
क: संनद्धे विरहविधुरां
त्वय्युपेक्षेत जायां
न स्यादन्योsप्यहमिव जनो
य: पराधीनवृत्ति:॥तू असा आकाशातून अलकानगरीला पोहोचशील, तेव्हा रस्त्याने चालणार्‍या युवती माना उंचावून तुझ्याकडे पाहतील. शीतल वार्‍याने उडणार्‍या आपल्या कुरळ्या केसांच्या अवखळ बटा कानामागे सारत तुझ्याकडे आशेने बघतील. आता नक्की आपले प्रियतम परतीच्या वाटेवर असतील, असे जाणून त्या विरहिणी किती आनंदी होतील! पण माझी प्रिया? या वर्षी ती तुला पाहून आणखी दु:खी होईल. छे! माझ्यासारखा अभागी मीच, जो या वर्षा ऋतूच्या आधी घरी जाऊन पत्नीला भेटू शकत नाही!


अगदी प्राचीन काळापासून ग्रीष्माच्या काहिलीने होरपळलेल्या प्रेमी जीवांना कृष्णमेघ संदेश घेऊन येत होता. कालिदासाने त्या मूक मेघाला वाचा काय दिली, की त्यातून ‘मेघदूत’ काव्य पाझरले!


कालिदासाचेच अजून एक काव्य आहे ‘ऋतुसंहार.’ सहा ऋतूंचे वर्णन करणारे. प्रत्येक ऋतूंमधील सृष्टी सौंदर्य टिपणारे आणि प्रत्येक ऋतूतील मानवी जीवन रेखाटणारे. ऋतुसंहारचे धडे गिरावणारी कैक काव्य मध्ययुगात लिहिली गेली. या बोलीभाषेतील काव्याला ‘बाराहमास’ म्हणतात. त्यातील नायिका आधी पतीला बारा महिन्यात येणारे सण व उत्सव रंगवून सांगते व म्हणते, “कोणताच महिना प्रवासाला चांगला नाही, तू प्रवासाला जाऊच नकोस बरे!” अर्थात तरीही त्याला कामानिमित्त परगावी जावेच लागते. तेव्हा प्रत्येक ऋतूतील तिचा विरह ती गीतातून सांगते. त्या गीतांमध्ये ऋतूचे वर्णन, त्या काळात फुलणारी फळे फुले, पक्षी व त्यांचे गुंजन, वातावरण हे सर्व येते. १७व्या शतकातील कवी केशवदास यांनी ‘बाराहमास’ प्रकारचा काव्यासंग्रह लिहिला - ‘कविप्रिया.’ यातील कवितांवर आधारित अनेक चित्र काढली गेली. त्यापैकी हे चित्र आहे, वर्षाऋतूमधील विरहिणीचे. आता विरह संपणार आहे आणि लवकरच आपला प्रियकर परत येणार, म्हणून ती आशेने त्या मेघाकडे पाहत आहे. पण, कडाडणार्‍या विजांना भिऊन ती मेघाला विनंती करते, “माझ्या प्रियकराला सुखरूप घरी आण! मेघा तुला माझ्या गळ्याची शपथ आहे!”


पाऊस आणि मिलनाची परंपरा हिंदुस्तानी संगीतातील कित्येक चीजांमध्ये पण दिसते. ‘देस’ रागाच्या या चीजमधील प्रिया सांगते, “बरखा ऋतू सुरु झाला आहे आणि अजून प्रियकर आला नाही. त्याची वाट पाहण्याची माझी शक्ती वर्षा ऋतूच्या सुरुवातीलाच संपली. आता मी कशी जगेन? अजून किती वाट पाहायची? आणि कशी? इथे तर ती कोकीळ सुद्धा ‘पिया पिया’ असा आवाज करते आणि मी पियाच्या विरहात जगत आहे ...बीती जात बरखा ऋतू
सजन नाही आये ॥
दादुरवा बोले पपीहा बोले
पीहू पीहू कर पुकारत
उमगे जिया पिया के बिना
बिरहिनी पुकारे ॥संगीतातील ‘मल्हार’ राग तर खास वर्षाऋतूसाठी सजतो. ‘मेघ मल्हार’, ‘गौड मल्हार’, ‘नट मल्हार’, ‘सूर मल्हार’च्या रागांच्या सुरात पाऊस भिजतो. ‘मेघ मल्हार’ची ही चीज धो धो कोसळणार्‍या पावसाचे वर्णन करते. पावसाच्या धारा, चमकणार्‍या विजा आणि गार वार्‍याने प्रियकराच्या आठवणी दाटतात...सावन के बदरा आये,
अत घोर घोर घन,
उमड़ घुमड़ कर बरसे,
जोर ज़ोर सों री।
चले सनन सनन पुरवैया,
तनरंग पिया की याद सताए,
बिजुरी चमके ज़ोर ज़ोर सों री ॥


हिंदी चित्रपट गीतेसुद्धा या रागात रंगली आहेत - कहां से आये बदरा, घुलता जाये कजरा (चष्मे बद्दूर), घनन घनन घीर घीर आये बदरा (लगान), बरसो रे मेघा मेघा (गुरु), बोले रे पपीहरा (गुड्डी), गरजत बरसत सावन आयो रे (बरसात की रात) अशी अनेक हिंदी चित्रपटातील गाणी ‘मेघ मल्हार’ रागावर आधारित आहेत.

‘छोटे नवाब’ चित्रपटातील नायिका पतीची वाट पाहात आहे. रात्रीची वेळ आहे. पाऊस कोसळत आहे. अशा वेळी खिडकीतून पडणारा पाऊस न्याहाळत, असावे ढाळत, नायिका म्हणते - पावसाचा आवाज ऐकून मी बावरून गेले आहे, जिवलगा आता घरी येई परतून!घर आजा घिर
आये बदरा साँवरिया ॥
सूना सूना घर मोहे
डसने को आये रे
खिड़की पे बैठी बैठी
सारी रैन जाये रे
टिप टिप सुनत मैं तो
भैइ रे बाँवरिया
घर आजा घीर
आये बदरा साँवरिया॥
(गीत शैलेन्द्र, संगीत - आर डी बर्मन, गायिका - लता मंगेशकर)


तर या गीतातील नायिका पावसाचे वर्णन करताना म्हणते, “आकाशातील काळे ढग पाहून मन अक्षरश: मोरासारखे नाचायला लागते. परदेशी गेलेल्या प्रियाकरांच्या प्रेमाचा संदेश घेऊन पावसाचे ढग आले आहेत.”


जिनके बलम बैरी, गए हैं बिदेसवा
लाई है जैसे उनके,
प्यार का संदेसवा
काली अंधियारी, घटाएं घनघोर
जियरा रे झूमे ऐसे,
जैसे बनमा नाचे मोर ॥
(संगीत - लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक - मुकेश व लता मंगेशकर, चित्रपट – मिलन)तर कोणा एका गावात राहणारी अल्लड प्रेमिका, पावसाच्या धारा तळहातावर झेलत म्हणते- प्रियकराच्या दर्शनासाठी तहानलेले माझे डोळे रोज त्याचेच स्वप्न रंगवत होते. आता हे पावसाचे गडद काळे ढग आकाशात दाटले आहेत, रिमझिम पाऊस येत आहे, अशा वातावरणात त्याची वाट पाहताना रात्र येते, पण डोळ्यात झोप येत नाही.
ओ सजना, बरखा बहार आई
रस की फुहार लाई
अँखियों में प्यार लाई ॥
ऐसी रिमझिम में ओ सजन
प्यासे-प्यासे मेरे नयन,
तेरे ही ख़्वाबों में खो गए
साँवली सलोनी घटा जब-जब छाई
अँखियों में रैना गई, निंदिया ना आई ॥
(चित्रपट - परख, गीत - शैलेंद्र, संगीत - सलील चौधरी, गायिका - लता मंगेशकर)


वर्षा ऋतू प्रियकराला घेऊन येतो, हे समीकरण अध्यात्मात पण वापरले गेले. कृष्णाच्या दर्शनासाठी दिवानी झालेली मीराबाई या रचनेत म्हणते - चारी बाजूंनी काळे ढग जमले आहेत, विजा कडाडत आहेत, गार वारा सुटला आहे आणि पावसाचे बारीक थेंब पडायला सुरुवात झाली आहे. याने माझ्या मनात आनंद दाटला आहे. कारण, या सगळ्यातून मला हरीचे पदारव ऐकू येत आहेत. हरि येत आहे!


बरसे बदरिया सावन की।
सावन की मन भावन की॥
सावन में उमंगयो मेरो मनवा। झनक सुनी हरि आवन की॥
उमड़ घुमड़ चहुँ देस से आयो। दामिनी धमके झर लावन की॥
नन्हे नन्हे बूंदन मेघा बरसे।
शीतल पवन सुहावन की॥
मीरा के प्रभु गिरिधर नगर।
आनंद मंगल गावन की॥तसाच हा ईश्वराच्या भेटीसाठी तळमळणारा भक्त. ईश्वरापासून ताटातूट झालेला, त्याच्या भेटीसाठी आसुसलेला जीव. प्रत्येक दिवशी शबरीसारखा त्याची वाट पाहाणारा. आज येईल कदाचित तो! असे म्हणून आधीच त्याच्या स्वागताची तयारी करून ठेवणारा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत क्षितिजाकडे डोळे लावून बसणारा आणि एक एक दिवस असाच त्याच्या भेटी शिवाय मावळणारा. तो म्हणतो, “अरे! एक एक करत माझ्या आयुष्यातले दिवस संपत चालले आहेत आणि अजूनही माझा प्रियकर आला नाही. अजूनही मला त्याचे दर्शन नाही! क्षणाक्षणाने संपणारे आयुष्य म्हणजे वर्षा ऋतू. तो हरि माझा प्रियकर आणि मी त्याची विरहिणी.” तो भक्त आर्तपणे आपली व्यथा मांडतो-
अजहू न आये बालमा
सावन बिता जाय
मोरी उमर गुजरती जाये
सावन बिता जायमधुरा भक्ती करणारा हा भक्त स्वत: राधा होतो आणि विरहिणीच्या उत्कट प्रेमाने प्रियकराला घेऊन येणार्‍या पावसाची वाट पाहतो...आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.