जयंत पाटलांच्या मतदारसंघात कर्जाचा पाऊस; घोळ की भ्रष्टाचार ?

    02-Jun-2020
Total Views |

jayant patil_1  
 
 

 
 
सांगली : राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या सांगलीमधील वाळवामध्ये लाखोंचा घोटाळा झाला असल्याची बाब पुढे आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी केला आहे. ज्या व्यक्तींच्या नावावर सात बारा नाही, त्या व्यक्तींच्या नावावर हजारो लाखो रुपये जमा करण्यात आले आहेत. गाव विकास सोसायटीपासून राजकीय नेते ते बँक अधिकाऱ्यांचादेखील यामध्ये समावेश आहे, असा आरोप तेथील नागरिकही करत आहेत. तसेच, हे प्रकरण हिमनगाचे टोक असल्याचे कीर्तीकुमार शिंदे यांनी सांगितले आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून याबाबत तक्रारही केली आहे.
 
 
 
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावामध्ये मागणी न करताही काही लोकांच्या बचत खात्यामध्ये कर्जमुक्ती योजनेतून रक्कम जमा झाल्याची घटना तेथील गावकरी सूरज संभाजी शेवाळे यांनी समोर आणली. याबाबत त्यांनी तलाठीकडे या खातेधाराकांची माहिती मागवली. याला तलाठ्यांनी उत्तर देत म्हंटले की, १६ जणांपैकी ९ जणांच्या नावावर सात बारा आढळत नाही. त्या नऊजणांची नावे तलाठ्यांनी सही-शिक्क्यासह लिहून दिली आहेत. ज्योती दीपक थोरात, राणी दिनकर देसाई, अर्चना दीपक थोरात, सुवर्णा रविद्र थोरात, कांचन शिवाजी गावडे, रुपाली किसन जाधव, रामेजब्बी हनिफ पठाण, विजया भिमराव ढवळे, आणि किसन रंगराव जाधव अशी या व्यक्तींची नवे आहेत. या जणांच्या नावे सात बाराच नाही मात्र, त्यांच्या बॅंक खात्यात शेतकरी कर्जमाफीची रक्कम जमा झालेली आहे. ९४ हजार ते १ लाख ९७ हजार रुपयांपर्यंतच्या रक्कम या लोकांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, यांचा शेतीशी काहीही संबंध नसल्याचेदेखील त्यांनी सांगितले आहे.
 
 
 
कीर्तीकुमार शिंदे यांनी पुढे म्हंटले आहे, ४० गुंठे जमीन असलेल्या हनीफ धोंडी पठाण यांच्या खात्यात तब्बल १,९४,९९० रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या नावावर कुठल्याही बँकेचे कर्ज नाही. त्यांनी कर्जमुक्तीसाठी प्रयत्न केला नाही. तरीही त्यांच्या बँक खात्यात रु. १,९४,९९० इतकी रक्कम जमा झाली आहे. तर त्यांची पत्नी रामेजबी हनिफ पठाण यांच्या नावावर सात बारा उतारा नाही. तरीही त्यांच्या बँक खात्यात रु. १,६७,३९५ इतकी रक्कम जमा झाली आहे. संग्राम संभाजी थोरात, दीपक संभाजी थोरात, सिंधुताई संभाजी थोरात या तीन जणांच्या नावावर फक्त ४-५ गुंठे जमीन आहे. असे असतांना सिंधुताई थोरात यांना रु. १,२९,१८९ आणि दीपक थोरात यांना रु. १,३०,७४७ इतकी रक्कम कर्जमुक्तीच्या नावाखाली देण्यात आली आहे. संग्राम संभाजी थोरात यांच्या दोन बँक खात्यात वेगवेगळ्या रकमा जमा करण्यात आल्या. अत्यल्प जमीन असतानाही मोठ्या रकमेची कर्जमाफी कशी मिळाली? दीपक संभाजी थोरात हे ‘महादेव विविधकारी सोसायटी’चे सचिव आहेत. याच थोरात कुटुंबातील- ज्योती दीपक थोरात, अर्चना दीपक थोरात ह्या दोघींच्या नावावर सात बारा नसताना त्यांनाही अनुक्रमे रु. १,०२,४११ आणि रु. १,३२,०४४ इतकी कर्जमाफीची रक्कम वळवण्यात आली आहे.
 
 
 
‘गोटखिंडी विविधकारी सोसायटी’चे चेअरमन धनाजी दत्तात्रय थोरात यांना एका खात्यात रु. १,९०,६४९ तर दुसऱ्या खात्यात  १,३३,४९४ रुपये अशा दोन वेगवेगळ्या रकमा कर्जमाफीच्या नावाखाली देण्यात आल्या आहेत. संचालक शरद बाबासाहेब थोरात यांच्या खात्यातही रु. ७१,५९३ इतकी रक्कम जमा झाली आहे. ‘गोटखिंडी विविधकारी सोसायटी’चे सचिव अनिल पाटील यांच्या पत्नी मनीषा अनिल पाटील यांच्या नावावर सात बारा नाही, मात्र त्यांच्याही खात्यावर कर्जमाफीची रक्कम आली आहे. सोसायट्यांचे हे पदाधिकारी बोगस व्यवहार करत आहेत, असा गोटखिंडीतील स्थानिक शेतक-यांचा आरोप आहे. कर्जमाफी योजनेतून शासकीय नोकरदारांना वगळण्यात येईल, असे कर्जमुक्ती योजनेत स्पष्ट करण्यात आले होते. असे असतानाही शासकीय सेवेत असलेल्यांच्या बॅंक खात्यातही कर्जमाफीची रक्कम आलेली आहे.