रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांनाच मिळाले नाही उपचार : डॉ. भावे यांचे निधन

    दिनांक  02-Jun-2020 19:00:30
|
DR BHAVE_1  H x


 
 

मुंबई : आयएमए महाराष्ट्र राज्याच्या मुंबई शाखेचे सदस्य आणि मुंबईतील नामवंत इएनटी सर्जन डॉ. चित्तरंजन भावे यांचे कोरोनामुळे निधन झाले. राज्यातील सर्व आयएमए सदस्य डॉक्टरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. ते ६१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते मधुमेहाशी लढत होते. त्यांच्यावर हृदयविकार शस्त्रक्रीया झाली होती. तरीही कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य बजावत होते. शस्त्रक्रिया आणि रुग्णतील तपासण्या अखंडितपणे करत होते.

एका रुग्णाची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना लक्षणे जाणवू लागली. तपासणी करून घेतल्यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉ. भावे हे मुंबईच्या रहेजा रुग्णालयाशी संलग्न असल्यामुळे त्यांनी तिथे फोन करून आपल्याला दाखल व्हायची इच्छा दर्शवली. यावेळी रहेजा रुग्णालयात जागा शिल्लक नसल्याने त्यांना थोडा काळ वात पाहण्यास सांगितले गेले. त्यानंतर डॉ. भावे स्वतःच्याच घरी होते.सुमारे सहा तासांनी त्यांना रुग्णालयातून जागा रिकामी झाल्याचा फोन आल्यावर ते स्वतः आपली कार चालवत रुग्णालयात दाखल झाले. तिथे चार दिवस त्यांच्यावर रूममध्ये उपचार झाल्यावर त्यांची तब्येत खालावल्याने आणि त्यांना प्राणवायूची गरज लागते आहे असे लक्षात आल्याने त्यांना तेथीलच आय.सी.यु.मध्ये हलवण्यात आले. तिथे त्यांना व्हेंटीलेटर आणि डायलिसीसचे उपचार देण्यात आले. पण त्यादरम्यान दुर्दैवाने त्यांचे निधन झाले.


आयएमए महाराष्ट्र राज्याला आज अनेक ठिकाणांहून फोन आले, की डॉ. भावेंना रुगणालयात जागा न मिळाल्याने त्यांना ओपीडीमध्येच १० तास झोपवण्यात आले होते. पण ही अकारण पसरवलेली वदंता आहे, असे आम्ही केलेल्या चौकशीमध्ये दिसून आले. डॉ. चित्तरंजन भावेंच्या मृत्यू बाबत आयएमए महाराष्ट्रातर्फे महाराष्ट्र सरकारला काही विनंतीवजा मागण्या करण्यात आल्या आहेत. डॉ.चित्तरंजन भावे यांच्या प्रमाणेच आजवर आणखी ४ खासगी डॉक्टरांचा मृत्यु ते कोव्हिड-१९ च्या महासाथीशी लढा देताना झालेला आहे. सरकारने या डॉक्टरांना करोना वॉरीयर्स म्हणून जाहीर करावे आणि रणांगण गाजवणाऱ्या सैनिकांना ज्याप्रमाणे वीरचक्र देऊन सन्मानित केले जाते, त्याप्रमाणे येत्या १५ ऑगस्ट रोजी मरणोत्तर करोना वीरचक्र देऊन सन्मानित करावे.


सरकारी डॉक्टर्स, कर्मचारी आणि इतर सेवकांना ५० लाखाच्याविम्याचे संरक्षण दिले आहे. कोरोना विरुध्द लढणाऱ्या खासगी डॉक्टरांचाही यात सामावेश करावा, खासगी डॉक्टरांना प्रमाणित पीपीई किट्स वाजवी दरात उपलब्ध होत नाहीत. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून आणि प्रत्यक्ष भेटी घेऊनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही, प्रमाणित पीपीइ किट्स मेडिकल आणि सर्जिकल स्टोअर्समध्ये त्वरित उपलब्ध करावेत. खासगी डॉक्टर हे प्राण पणाला लावून सरकारच्या खांद्याला खांदा लावून करोनाविरुद्ध लढा देत आहेत. त्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवण्याचे धोरण बदलावे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.