कोरोना रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होणार

    दिनांक  19-Jun-2020 21:01:57
|
Dy CM Ajith Pawar _1 


पुणे : कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्यांची क्षमता वाढविणे आवश्यक असून त्यादृष्टीने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी १२ कोटी ४४ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत 'कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनां' चा आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोविड-१९ स्राव नमुना तपासणीसाठी लागणा-या साधनसामुग्रीसाठी ८ कोटी ९० लाख ९७ हजार रुपयांचा तर यंत्रसामुग्रीसाठी ३ कोटी ५३ लाख ६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय इतर आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी ७ कोटी १५ लाख ८१ हजार रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. या निधीतून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीची खरेदी करता येणार आहे. याशिवाय परिसेविका व अधिपरिचारिकांच्या भरण्यात आलेल्या पदासाठी आवश्यक निधी देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. कोविड-१९ चाचण्यांचे अहवाल वेळेत देण्याचे निर्देश देत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोवीड-१९ स्राव नमुने तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळासांठी आवश्यक मनुष्यबळ महापालिका प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावे. ससून, नायडू, यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या तसेच मृत्यूसंख्येची माहिती अद्ययावत होत असल्याची खात्री प्रशासनाने करावी. कोविड आणि इतर आजारांच्या रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही,असे स्पष्ट निर्देशही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिले.कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे सांगून अत्यावश्यक बाबींसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून खर्च करावा, तसेच ससून रुग्णालय अद्ययावत यंत्रसामुग्रीयुक्त करा, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्राव नमुने तपासणी तसेच अतिदक्षता विभागातील बेड क्षमतेत वाढ करण्याची गरज असल्याचे सांगून यादृष्टीने महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचे सांगितले. डॉ. सुभाष साळुंखे यांनी गरजूंना खाटा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. 


विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सेवांचे दिवसनिहाय नियोजन करण्यात आल्याने कामात सुसूत्रता आल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुणे शहरानजीक असलेल्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यापूर्वी रुग्ण आढळलेल्या तालुक्यातील रुग्णसंख्या कमी करण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड तसेच श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेच्या वतीने कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.बैठकीत स्राव तपासणी क्षमता, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या, वैद्यकीय पार्श्वभूमी, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या, कंटेन्मेंट झोन निहाय स्थिती, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, ग्रामीण भागातील स्थिती तसेच उपचारसुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.