‘एआय’ विकासासाठी ‘जीपीएआय’मध्ये भारत

19 Jun 2020 21:42:00


GPAI_1  H x W:

 


भारत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात आणखी प्रगती साधण्यासाठी ‘जीपीएआय’ संघटनेत सहभागी झाला आहे. ‘जीपीएआय’मधील भारताच्या समावेशामुळे देशात आणि जागतिक पातळीवरही अत्याधुनिक संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित विकासकामांना चालना मिळेल.

 


मानव केंद्रित विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या (एआय) वापरासाठी भारत नुकताच ‘ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (जीपीएआय) या संघटनेचा संस्थापक सदस्य झाला. भारतासह अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, जर्मनी, मेक्सिको, इटली, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि सिंगापूर यांसारख्या जगातील आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली देशांचा या संघटनेत समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन आणि विकास या मुद्द्यांच्या आधारे ही संघटना काम करणार आहे. जगात कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरुवात होऊन अनेक दशके उलटली असून आता तर त्याची उपस्थिती बहुतांश क्षेत्रात असल्याचे दिसते. उदा. आपल्याला कोणीही ईमेल पाठवल्यास उत्तर देताना, तिथे आधीच काही शब्द वा वाक्ये आढळतात. ही कृत्रिम बुद्धिमत्तेचीच कमाल असते आणि तशी वाक्ये किंवा शब्द तिथे येण्याआधी संबंधित प्रणालीने आपल्या एकूण ईमेल व ईमेलद्वारे इतरांनी संपर्क साधण्याच्या इतिहासाचा अभ्यास केलेला असतो. म्हणजे भूतकाळातील माहिती घेऊन, उत्तर देण्याची पद्धती समजून घेऊन एक साचा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार होतो आणि तो आपल्याला दिसतो. तिथे आपण फक्त संबंधित शब्द किंवा वाक्ये योग्य असल्यास निवडायची असतात. असाच प्रकार आपल्या हातातल्या मोबाईल फोनमध्येही पाहायला मिळतो.
 

 

आपण एकच शब्द वारंवार टाईप करत असू, तर पुढल्या वेळी संबंधित शब्दांतले एखादे अक्षर टाईप केले तरी संपूर्ण शब्द किंवा शब्दांची मालिका आपल्याला मोबाईलमध्ये दिसते, आपण फक्त त्याची निवड करायची. हे आपल्या नेहमीच्या वापरातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे साधेसे उदाहरण, मात्र यापेक्षाही अनेक क्लिष्ट, अवघड क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्ता काम करते किंवा करु शकते. जसे की, एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास, रक्तगट, रक्त तपासणी, रक्तदाब वगैरे माहितीचा अभ्यास करुन, त्यावर प्रक्रिया करुन संबंधित व्यक्तीला कोणता आजार होऊ शकतो व त्यावर कोणते उपचार केले पाहिजे, हेही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने समजते. त्यानंतर डॉक्टरने फक्त संबंधित व्यक्तीची परिस्थिती पाहून कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे सुचवलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचा असतो. तसेच भाषांतर करणे, निरनिराळ्या आर्थिक व्यवहारांतून गडबड-घोटाळा शोधणे, बुद्धिबळ खेळणे किंवा बुद्धीशी संबंधित कामे करणे, यातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतो. ‘कॉम्प्युटर प्रोग्रामिंग’द्वारे हे कार्य होते आणि विविध प्रकारच्या रोबोटमध्येही कृत्रिम बुद्धिमत्ताच वापरली जाते. जसे की, ठराविक शब्द वा वाक्य बोलणारा रोबोट, माणसाशी माणसाप्रमाणे गप्पा मारणारा रोबोट, हॉटेलमध्ये काम करणारा रोबोट, घरगुती साफ-सफाईची कामे करणारा रोबोट ते कारखान्यात काम करणारा रोबोट ते थेट संरक्षण क्षेत्रात सैनिक म्हणून सीमेवर उभा ठाकणारा रोबोट इथपर्यंत जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केला जातो.


आता भारत अशा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात आणखी प्रगती साधण्यासाठी ‘जीपीएआय’ संघटनेत सहभागी झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी यासंबंधीची माहिती नुकतीच ट्विटरद्वारे दिली. जबाबदारीचे भान असलेला सर्वांगीण विकास, कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास, मानवी हक्क, बहुविधता, सर्वसमावेशकता, नाविन्यपूर्ण आविष्कार आणि आर्थिक विकास या तत्त्वांच्या आधारे ही संघटना काम करणार आहे. त्यातून देशात आणि जागतिक पातळीवरही अत्याधुनिक संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित विकासकामांना चालना मिळेल. यात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ, देशोदेशींची सरकारे, शैक्षणिक संस्था यांची मोट बांधून काम केले जाईल. विविध वैश्विक आपत्तींवर तोडगा काढण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येईल. सध्याच्या घडीला जागतिक आव्हान ठरत असलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठीही या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केला जात आहे. तसेच अशाप्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवली, तर त्यावेळी ही माहिती साहाय्यभूत ठरु शकते. सोबतच आर्थिक अडचणींवर उत्तरे शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरेल, असे सांगितले जाते. दरम्यान, भारताने चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी एक योजना जाहीर केली आहे. तसेच त्यासाठीचे www.indiaai.in' हे संकेतस्थळही सुरु केले. नव्या योजनेनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित सर्व माहिती, लेख, गुंतवणुकीसंबंधीची माहिती, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांची माहिती मिळेल. केंद्राच्या योजनेनुसार शिक्षण, कृषी, आरोग्य, अर्थ, दुरसंचार, ई-कॉमर्स या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

 


एकूण भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीने आश्वासक पावले उचलल्याचे यातून दिसते. ‘जीपीएआय’ संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात चीनचा समावेश केलेला नाही. सध्या चीन व भारतात सीमावादावरुन तणाव आहे आणि भारतात चिनी उत्पादनांवर बहिष्काराची चळवळही जोर धरत आहे. बहिष्काराचे अस्त्र जिते उत्तम तितकेच बहिष्कृत वस्तू व उत्पादनांनी देशी पर्याय निर्माण करणेही अत्यावश्यक असते. मात्र, त्यासंबंधीचे मूलभूत संशोधन, नवतंत्रज्ञान अजूनतरी देशात होताना दिसत नाही. तथापि, ‘जीपीएआय’ संघटनेतील सहभाग आणि केंद्र सरकारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित योजनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मूलभूत संशोधन, नवतंत्रज्ञान निर्मिती आदी बाबतीत ठोस धोरण आखले तर भारत चीनकडून आयात केल्या जाणार्‍या अनेक वस्तू-उत्पादनांची निर्मिती स्वतः करु शकेल. देशातील अनेक स्टार्टअप यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तरीही कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी रोजगारावर विपरीत परिणाम होईल का, असा एक प्रश्न अन्य देशांप्रमाणे इथेही उपस्थित केला जाईल. तो खराही आहे आणि त्याचे उत्तर येणारा काळच अधिक चांगल्याप्रकारे देईल.

 

 
Powered By Sangraha 9.0