उरले फक्त भुंकाभुंकीचे काम...

    दिनांक  18-Jun-2020 20:26:25
|


uddhav thackeray_1 &


बळकावलेले राज्य तर सुरळीत चालवता येत नाही, अशा स्थितीत भाजपच्या नावाने खडे फोडणे हे एकच काम उरते. मोदी व भाजपविरोधी भुंकाभुंकी करुन आपल्यासारखे काविळग्रस्त ‘नमोरुग्ण’ तरी आपल्यामागे येतील आणि आपल्या विचित्रपणाला ‘वाक्बाण’, ‘तोफा’, ‘टोला’ म्हणून पेश करतील, असे शिवसेनेला वाटते.

“कोणतेही हत्यार, बंदुका, क्षेपणास्त्रे, रणगाडे न चालवता दोन्ही बाजूंनी इतकी प्रचंड सैन्यहानी होत असेल, तर मग संरक्षण उत्पादने, अणुबॉम्ब बनवायचे कशाला? आपण अश्मयुगातील दगड-धोंड्यांच्या लढाईत एकमेकांचे जीव घेत आहोत,” आणि “भारताच्या सीमेवरील एकाही राष्ट्राशी आपले सलोख्याचे संबंध नाही व आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघाले, याचे आश्चर्य वाटते,” अशा शब्दांत मुंबईतही पाया डळमळू लागलेल्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. सोमवारी गलवान खोर्‍यात भारतीय व चिनी सैनिकांतील संघर्ष आणि २० जवानांच्या हौतात्म्याचा कळवळा दाटून आल्याने शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसाळ्यात मुंबईतील नद्या-नालेही ज्यांना सांभाळता येत नाहीत, एरवी आणि कोरोना काळातही ज्यांना नागरिकांना पुरेशा आरोग्यसुविधा देत येत नाहीत, रस्त्यांवरील खड्डेही ज्यांना बुजवता येत नाहीत आणि तोच गलथान कारभार करण्यासाठी जे राज्यातल्या सत्तेवर येतात, त्यांनी थेट पंतप्रधानांना आंतरराष्ट्रीय संबंध हाताळण्यावरुन दुषणे देणे म्हणजे पायरी सोडल्यासारखेच. अर्थात, भारतविरोधी विधाने करणार्‍या काँग्रेसच्या कुरकरणार्‍या खाटेशी संधान बांधणार्‍यांना तिचा वाण नाही, पण गुण लागणारच आणि या गुणापायी ते बरळणारचए! तत्पूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जवानांच्या बलिदानानंतर भारताच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लावणारे आणि त्याच्याही आधी चीनने भूमी बळकावल्याचे सांगणारे ट्विट केले होते. तसेच काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी व त्यांच्या युवक संघटनेनेही अशाप्रकारची विधाने केली होती. पण, आज देशाच्या सार्वभौमत्वाच्या, एकता-अखंडतेच्या बाता झोडणार्‍या व त्यावरुन मोदींना बोल लावणार्‍या शिवसेनेने राहुल गांधींच्या व काँग्रेसच्या पूर्वजांनी सीमेबाबत केलेल्या ऐतिहासिक कांडांची आठवणही काढली नव्हती. कारण, तसे न करणे ही शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाचवण्यासाठीची अगतिकता, लाचारी होती. तीच शिवसेना आता दगड-धोंड्यांनीच लढायचे असेल तर बंदुका, रणगाडे, क्षेपणास्त्रे तयार करायची कशाला, असे विचारताना दिसते. मात्र, अक्साई चीनचा तुकडा चीनला गिळू देणार्‍या काँग्रेस सरकारांनीच वेळोवेळी केलेल्या करारांत याचे मूळ आहे. १९९३, १९९६ आणि २०१३ साली देशातील काँग्रेसी सरकारांनी चीनबरोबर करार केले आणि भारतीय सैन्य व चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन किमी क्षेत्रात गोळीबार किंवा बॉम्बवर्षाव करणार नाही, असे ठरले. उल्लेखनीय म्हणजे, यातल्या पहिल्या करारावेळी आताच्या राज्य सरकारचे आधारवड शरद पवार संरक्षणमंत्री होते, नंतर पी. व्ही. नरसिंह राव आणि सात वर्षांपूर्वी ए. के. अ‍ॅण्टोनी या पदावर होते. आता ‘सामना’ आपल्या या नव्या मालकांना त्यांनी केलेल्या करारांबद्दल की चुकांबद्दल खडसावणार का?
 
पुढचा मुद्दा म्हणजे, शेजार्‍यांशी सलोख्याचे संबंध नसण्याचा. वस्तुतः राडा करणे आणि शब्दांचे बुडबुडे उडवणे म्हणजेच कर्तृत्व, इतकीच समज असणार्‍या शिवसेनेला आंतरराष्ट्रीय राजकारणातली बाराखडी तरी कळत असेल का, हीच एक शंका. कारण ते समजत असते तर शिवसेनेने हा मुद्दा उपस्थित केलाच नसता. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासूनच ‘नेबरहूड फर्स्ट’ हे धोरण राबवले. त्याअंतर्गत शेजारच्या प्रत्येक देशाशी शांतता आणि सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिथल्या राज्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. ‘वसुधैव कुटुम्बकम’ या भारतीय संस्कृतीनुसार मोदींनी शेजार्‍यांनाही आपलेच मानले. मात्र, शेजार्‍यांच्याच विचारांत खोट असेल तर? भाजपने शिवसेनेला २५ वर्षे मित्रत्वाची वागणूक दिली. शिवसेनेसारखा दृढसंबंधी दुरावू नये म्हणून काही वेळा, काही ठिकाणी माघारही घेतली. हिंदुत्वाचे आणि राज्यातील जनतेचे नुकसान होऊ नये, म्हणून मतभेदाला जागा ठेवली नाही. तरीही शिवसेनेने स्वतःच्या स्वार्थासाठी, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी भाजपशी दगाबाजी केलीच की! धक्कादायक म्हणजे, सत्तेच्या मोहापायी शिवसेना थेट बाळासाहेब ठाकरेंनी अखेरपर्यंत ज्यांच्याशी संघर्ष केला, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली. म्हणजेच स्वतःचा मतलब साधण्यासाठी शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. अशी अप्पलपोटी राजकारणी मंडळी शेजारी देशांतही आहेत, त्यांनाही आपापली सत्ता टिकवायची आहे, वर्चस्व अबाधित ठेवायचे आहे आणि हे सर्व करण्यासाठी त्यांना भारताशी संघर्ष करणे अत्यावश्यक वाटते, त्यात मोदींची काय चूक?
 


शिवसेनेला मात्र, हे समजणार नाही, कारण दिल्लीत रात्रीच्या वेळी अंधारात चिनी राजदूताची गुपचूप भेट घेणार्‍या आणि त्यावरुन देशभरात गदारोळ होऊनही ठोस स्पष्टीकरण देऊ न शकणार्‍या राहुल गांधींच्या पक्षासोबत ते सत्तेत बसले आहेत. त्यामुळे काहीही समजून-उमजून न घेता रोज एक नवीन खुसपट काढून नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करायचा धंदा म्हणजे शिवसेना, असे समीकरण तयार झाले आहे. शिवसेनेने तसे न केले तर ती अस्तित्वात असल्याचे कोणालाही समजणार नाही. कारण, बळकावलेले राज्य तर सुरळीत चालवता येत नाही, कोरोना महामारीवर नियंत्रण राखता येत नाही, जमिनी स्तरावरील जनतेशी संपर्क तुटला आहे, सर्वसामान्यांच्या समस्या सोडवता येत नाहीत, अशा स्थितीत भाजपच्या नावाने खडे फोडणे हे एकच काम उरते. मोदी व भाजपविरोधी भुंकाभुंकी करुन आपल्यासारखे काविळग्रस्त नमोरुग्ण तरी आपल्यामागे येतील आणि आपल्या विचित्रपणाला ‘वाक्बाण’, ‘तोफा’, ‘टोला’ म्हणून पेश करतील, असे शिवसेनेला वाटते. मोदीविरोधकांचा कंडू शमवण्याचे कष्ट आपण घेत असल्याने ते तरी आपले कौतुक करतील, राज्यकारभारात तर आपण अपयशी आहोतच, पण निदान केंद्र सरकारवरील टीकेचे यश तरी ते आपल्या झोळीत टाकतील, असा शिवसेनेचा यामागचा हेतू असू शकेल. पण, भाजप आणि भारत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आपली काहीही चूक नसताना एखाद्या राष्ट्राकडून काही आगळीक होत असेलस, तर शिवसेनेने आपल्या सर्वोच्च नेत्यावर आरोप करण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. तसे न केले तर या विरोधापायी विरोध करण्याच्या घाणेरड्या मानसिकतेमुळे शिवसेनाच जनतेच्या मनातून उतरत जाईल, यात कसलाही संशय नाही.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.