शाळकरी मुलांना उद्योजकतेसाठी घडविणारा तरुण

    दिनांक  18-Jun-2020 21:21:12   
|

sushil mungekar_1 &nशालेय जीवनापासून मुलांना उद्योजकतेची मानसिकता घडविण्याच्या ध्यासाने सुशील याने ‘एनपॉवर‘ नावाची कंपनी सुरु केली. उद्योजकीय कौशल्य शिकवलं जात नाही. हे कौशल्य विशेषत: लहान मुलांमध्ये रुजावे हादेखील त्यांचा उद्देश होता. भारतातील ४३ शाळांमध्ये हा प्रकल्प सध्या राबविला जात आहे.कोरोनामुळे सगळीकडेच ‘लॉकडाऊन’ सुरु आहे. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. अनेक मजूर आपापल्या राज्यात गेले. मग अनेकांनी मराठी तरुणांना सल्ले देण्यास सुरुवात केली. ‘वडापावच्या गाड्या टाका’, ‘पाणीपुरीचा गाडा लावा’, ‘भाज्या विका’ सांगायला लागले. म्हणजे लहानपणापासून नोकरीची मानसिकता रुजवायची आणि वेळ आली की उद्योग करायला सांगायचं. त्यामुळे तो तरुण ना उद्योजक बनत ना नोकरदार. त्याच्याकडे पाहून मग नवीन पिढी उद्योगाकडे वळत नाही. ही शोकांतिका दूर करायची असल्यास आपल्याला मुलांना शालेय वयातच उद्योजकतेचे धडे देणं गरजेचं आहे. ही काळाची गरज त्या तरुणाने कधीच ओळखली. त्याने शाळेत शिकणार्‍या मुलांमधून उद्योजक घडविण्याचा ध्यास घेतला. हा नवीन भारत घडवू पाहणारा तरुण म्हणजे सुशील भालचंद्र मुणगेकर.
 

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा सुशील हा चिरंजीव. सुशीलच्या आई लीना मुणगेकर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होत्या. सुशीलला दोन बहिणी. दोघीही डॉक्टर. सुशीलचं बालपण आशियातील सर्वांत मोठी कामगारांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणार्‍या विक्रोळीच्या कन्नमवार नगरात गेले. कन्नमवार नगरच्याच विकास हायस्कूलमध्ये तो नववीपर्यंत शिकला. १९८९ साली खारच्या बीपीएम स्कूलमध्ये सुशील दहावीच्या परीक्षेत त्या परिसरात पहिला आला होता. मराठी माध्यमात शिकूनदेखील त्याने इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले. चांगले गुण मिळाल्याने त्याला रुपारेल महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला. ‘युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ अर्थात ‘युडीसीटी’मध्ये सुशीलने केमिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या- चौथ्या वर्षाला त्याला उमजलं की हा आपला पिंड नाही. सुशीलला परफॉर्मिंग आर्ट, कला, लिखाण अशा कलेच्या प्रांतात रुची होती. पण, त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्यानंतर भारत पेट्रोलियममध्ये एक वर्ष इंटर्नशिप केली. इंटर्नशिपनंतर त्याने ‘जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज’मधून ‘फायनान्स’ विषयामध्ये ‘एमएमएस’ ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. यानंतर सुशीलला टाटा मोटर्समध्ये नोकरी मिळाली. ‘कॉर्पोरेट फायनान्स’, ‘कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी’, ‘मर्जर्स अ‍ॅण्ड अ‍ॅक्विझिशन’, ‘रिटेलिंग अ‍ॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस’ आदी विभागांत त्याने उच्चपदावर काम केले. टाटा समूहामध्ये ही एक चांगली प्रथा आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये कामाची चुणूक दिसली की, त्याला सर्व विभागाची कामे देऊन त्यास ‘सीईओ’च्या दर्जाचं बनवलं जातं. कंपनीच्या कामानिमित्ताने तो एकदा अमेरिकेलाही गेला होता. तिथे त्याला एका महान वक्त्याचं भाषण ऐकण्याचं भाग्य मिळालं. “पैशासाठी काम करु नका. समाधानासाठी काम करा. त्या कामामुळे कोणाच्या आयुष्यात आपण सकारात्मक बदल आणू शकतो का, हे लक्षात घ्या.” त्या वक्त्याचं भाषण ऐकून सुशील विचारात पडला की, आपण का नोकरी करतो? आपण आपल्या देशाच्या भावी पिढीला घडवलं पाहिजे. त्यातून मग सुशीलने ठरवलं आणि त्याने टाटा मोटर्सचा राजीनामा दिला.
 

यानंतर सुशील नोकरी न करता उद्योजकतेकडे वळला. त्याने ‘इंडेक्स मनी’ची सुरुवात केली. त्याचवेळी जागतिक आर्थिक मंदी आल्याने व्यवसायात मंदी आली. पुन्हा कॉर्पोरेट्सकडे वळायचं का, हे द्वंद्व सुरु झाले. जवळच्या मंडळींनी पण कॉर्पोरेट्समध्ये जाण्याचा सल्ला दिला. परंतु, त्या महान वक्त्याच्या वक्तव्याचं त्याला पुन्हा स्मरण झालं. आपण एकदा व्यवसायात उतरलोय, आता नोकरीकडे परत वळायचं नाही, हे त्याने मनाशी पक्क केलं. मित्रांसोबत त्याने ‘इंडेक्स अ‍ॅडव्हायजरी’ ही कन्सल्टिंग कंपनी सुरु केली. त्या माध्यमातून त्यांनी ‘आरोग्य फायनान्स’ नावाची कंपनी सुरु केली. कोणत्याही गरजू रुग्णास त्याच्या उपचाराकरिता अर्ध्या तासात आरोग्य कर्जाची सुविधा ही कंपनी देते. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासत नाही. फक्त नातेवाईकांची सायकोमॅट्रिक टेस्ट होते. भारतातील ३२ शहरांतील १६०० रुग्णालये ‘आरोग्य फायनान्स’सोबत जोडली गेली आहेत. यानंतर सुशील मुणगेकर याने ‘चमक लॉण्ड्री सर्व्हिसेस’ हे स्टार्टअप २०११ रोजी सुरु केले. आधुनिक साधनांचा वापर करुन अत्यंत माफक दरांत कपडे धुवून घरपोच मिळण्याची संधी यामध्ये होती. २०१५ पर्यंत हे स्टार्टअप चालविले. ‘हार्वर्ड बिझनेस रिविव्ह’ या जागतिक ख्यातीच्या नियतकालिकाने ‘अत्यंत कमी खर्चातील स्टार्टअप’ या श्रेणीत ‘चमक‘ची केस स्टडी म्हणून दखल घेतली होती. हे सगळं करत असताना एक बाब त्यांच्या ध्यानी आली की, भारतात कल्पनांची काही कमतरता नाही. परंतु, उद्योग करण्यासाठी मानसिकतेच्या अभावाने लाखो स्टार्टअप बहरु शकत नाहीत. याची सुरुवात शालेय शिक्षणातून व्हायला हवी. शालेय जीवनापासून मुलांना उद्योजकतेची मानसिकता घडविण्याच्या ध्यासाने सुशील याने ‘एनपॉवर‘ नावाची कंपनी सुरु केली. उद्योजकीय कौशल्य शिकवलं जात नाही. हे कौशल्य विशेषत: लहान मुलांमध्ये रुजावे हादेखील त्यांचा उद्देश होता. भारतातील ४३ शाळांमध्ये हा प्रकल्प सध्या राबविला जात आहे. संयुक्त राष्ट्र संघटना आणि ‘अटल इनोवेशन मिशन’ यांसारख्या संस्था यामध्ये सहकार्य देत आहेत.
 
‘एनपॉवर’ संस्थेने आपल्या कल्पनाशक्तीला चालना देऊन सामाजिक संकटावर मात करणारी ‘स्टार्टअप आयडिया‘ यासाठी शाळकरी मुलांना ‘इंडियाज फ्युचर टायकून‘ असे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. संपूर्ण भारतातून १३२ शहरांतील ३३० शाळेतील मुलांनी यास प्रतिसाद दिला. सर्वोत्कृष्ट तीन संकल्पना या कोणत्याही महानगरातील मुलांनी मांडल्या नव्हत्या, तर अगदी छोट्या शहरांतील मुलांनी मांडल्या होत्या. कर्नाटकातील म्हैसूर, कर्नाटकमधीलच चित्रदुर्ग आणि पश्चिम बंगाल येथील दुर्गापूर येथील मुलांनी पाण्याविषयी उत्कृष्ट उद्योजकीय संकल्पना मांडल्या होत्या. तिथे आता उपक्रमदेखील सुरु झाले. सध्या २५०० मुलं या चळवळीशी जोडली गेलेली आहेत. २०२५ पर्यंत १० लाख मुलांना उद्योजकतेचे धडे देण्याचा ‘एनपॉवर’चा मानस आहे. सुशील मुणगेकरचा १९९८ साली श्रद्धा या उच्चशिक्षित तरुणीशी विवाह झाला. हिंदुजा महाविद्यालयात त्या ‘अर्थशास्त्र’ विषयाच्या व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. तन्वीर आणि इरा अशी दोन अपत्ये या दाम्पत्याला आहेत. शालेय जीवनात आपण जे शिकतो, तेच आयुष्यभर लक्षात राहतं. तो खर्‍या अर्थाने आपल्या आयुष्याचा पाया ठरतो. उद्योजकता याच वयात शिकवली तर आपण एक सशक्त उद्योजकीय समाज घडवू शकतो, याचा सुशील मुणगेकर याला विश्वास आहे. शाळकरी मुलांना उद्योजक म्हणून घडविणारा अशा तरुणाची आज देशाला गरज आहे.
 
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.