पालिका प्रकल्प विकासकामे रखडली

17 Jun 2020 20:13:54
MCGM_1  H x W:
 
 


मुंबई : इमारती आणि प्रकल्प उभारण्याची कौशल्याची कामे अभियंत्यांकडे देण्यात येतात. मात्र मुंबई महापालिकेत कोरोनाग्रस्त भागातील इमारती सील करण्याची कामे अभियंत्यांकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे विकासकामे रखडली आहेत. मुंबई महापालिकेच्या सुमारे ६०० अभियंत्यांना इमारती सील करण्याचे काम देण्यात आले आहे.
 
 
इमारती सील करणे, रुग्ण शोधणे, कंटेन्मेंट झोन तयार करणे, रुग्णांचे अहवाल तयार करणे आदी कामे महापालिकेच्या अभियंत्यांकडे सोपविण्यात आले आहे. परिणामी प्रकल्पांची कामे रखडली आहेत. त्यामुळे अभियंत्यांना अभियांत्रिकी कामे करण्यासाठी परत बोलवा, अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स असोशिएशनने पालिका आयुक्तांकडे केली आहे.
मुंबईत सर्वच भागात कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला आहे.
 
 
कोरोनाचा वाढत असल्याचे लक्षात येताच पालिकेच्या अभियंत्यांना कोरोनावर नियंत्रण आणण्याच्या बिगर अभियांत्रिकी कामाला लावले आहे. हातातली कामे सोडून कोरोनाचा रुग्ण आढळलेल्या इमारती सील करणे, रुग्ण शोधणे, कंटेन्मेंट झोन तयार करणे, रुग्णांचे अहवाल तयार करणे, बेघर आणि मजुरांना अन्न वाटप करणे आदी कामे त्यांना करावी लागत आहेत. पालिकेच्या अभियांत्रिकी, उपप्रमुख अभियंता, वास्तुविशारद, आर्किटेक्ट आदी विभागाचे सुमारे ६०० अभियंते कोरोनाच्या कामासाठी जुंपण्यात आले आहेत.
अभियंत्यांच्या जागी त्याच खात्यातील बदली कामगार द्यावा, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, दुय्यम अभियंता, कनिष्ठ अभियंता आदी श्रेणीतील अभियंते हे उच्च शिक्षित आहेत. त्यांना कोरोनाची कामे लावण्यापेक्षा कारकून श्रेणीतील कामगारांना ही कामे द्यावीत, त्यांना अडीच महिने सुट्ट्याही मिळालेल्या नाहीत, अभियंत्यांचे अवमूल्यन करू नये अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.



Powered By Sangraha 9.0